आवडतो मज अफाट सागर,
अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात
केशर सायंकाळी मिळे
कविवर्य कुसुमाग्रज

कधीकधी वाचलेली एखादी कविता अनुभवायला मिळते ती अशी. रत्नागिरीहून विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशेने सागरी महामार्गाने जात असताना दांडेवाडीचे दर्शन होते. वाघोटन खाडीवरील पूल ओलांडण्यापूर्वी रस्त्याच्या उजवीकडे काळसर वाळूची पुळण आणि समुद्राचा किनाऱ्याकडे डोकावणारा भाग दिसतो. क्षितिजरेषेवर विजयदुर्ग किल्ल्याचे दर्शन होते.

दांडेवाडीच्या पुलाला तडे गेले असल्याने इथं मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद आहे. पण गाडी किंवा दुचाकी घेऊन आपण सहज जाऊ शकतो. या बाजूने विजयदुर्ग आणि आंबोळगड या बिंदूमधील अंतर खूप कमी झालं आहे. असाच एकदा संध्याकाळचा निघालो होतो. मुक्काम विजयदुर्ग किल्ल्याजवळ केळकरांच्या निवासात होता. सूर्यास्त खुणावत असताना तसेच पुढे जावे असं वाटलं नाही.

दांडेवाडीच्या नाक्यावर गरमागरम चहा घेतला आणि गाडी पार्क करून सूर्यनारायणाची समुद्रभेट पाहत तिथेच थांबलो. शिवरायांनी बांधलेल्या विजयदुर्गाच्या म्हणजेच घेरीयाच्या साक्षीने होणारा सूर्यास्त मी मनसोक्त पाहिला. तिथं स्वल्पविराम घेतला नसता तर या अनुभवाला मुकलो असतो. म्हणूनच वाटतं. कुठेतरी पोहोचण्याच्या लगबगीपेक्षा प्रवास अनुभवणे जास्त महत्त्वाचे. बाकाळे आणि माडबन हे समुद्रकिनारे इथं जवळच आहेत. नजीकच्या मीठगव्हाणे नावाच्या गावात अंजनेश्वर मंदिर सुद्धा आवर्जून पाहावं असं आहे.