Darya Firasti

पावसात गवसलेला रायगड

मी इकडेतिकडे हिंडतो, फोटो व्हिडीओ वगैरे टाकतो. पण काही अनुभव खचितच फोटोग्राफच्या पलीकडचे असतात. कदाचित शब्दांच्याही पलीकडचे असतात. काल रायगडावर घेतलेला असाच एक अनुभव… ही माझी किल्ले रायगडावर दहावी खेप. एक फेज अशी होती जेव्हा वर्षाला एकतरी चक्कर रायगडावर होत असे. परत आलं की एकदम रिचार्ज झाल्यासारखं वाटत असे. काल जवळजवळ नऊ वर्षांनी रायगडावर आलो. पावसाळ्यात ही माझी पहिली खेप.

धुक्याने भरून गेलेल्या आसमंतात, शांततेत किल्ला पाहताना खूप असामान्य वाटत होतं. त्या शांततेत बुलबुल, रातकिडे यांची हाक किंवा पावसाच्या सरीने धरलेला ताल हे आवाज.. प्रत्येक आवाज स्पष्ट.. मनात घर करून राहणारा … पोहोचलो तेव्हा अंधारच होता, रोपवेच्या दादांनी केलेली तांदळाची भाकरी, झुणका आणि खमंग चटणी (यातलं काहीही चुलीवर केलं नव्हतं तरीही चविष्ट होतं!) आणि मस्त वाफाळलेला चहा घेतला अन पायपीट करायला सज्ज झालो.

जगदीश्वर मंदिर असेच धुक्याने भरलेलं.. मंदिराच्या उंबरठ्यावर हिरोजी इंदुलकराच्या पायरीवर वाहिलेले कुंकू पाहून वाटले छत्रपती अगदी आत्ताच दर्शनाला आले असतील. समाधीपलीकडे असलेला भवानी कडा दिसतच नव्हता.. दूरवर स्पष्ट दिसणारे राजगड तोरणाही ढगांच्या आड लपले होते.. बाजारपेठ स्तब्ध शांत होती.. भिजलेल्या मातीचा गंध दरवळत होता.. एरवी ज्या भग्न अवशेषांत गवत माजते, तिथं पिवळी, जांभळी व पांढरी रानफुले फुलली होती.. एक दोन नाही..

ताटवेच होते जणू कुशावर्त तलाव आणि समोरचे व्याडेश्वर मंदिर एका क्षणाला स्पष्ट दिसायचे तर दुसऱ्या क्षणी गायब.. तिथून पुढे दरीत वाघ दरवाजा आहे.. पण त्याची वाट मला सापडेना. मागे दोनतीन वेळा दरीत उतरून हा दरवाजा पाहिला होता.. पण ती पायवाट काही सापडेना.. तेवढ्यात म्हशी राखणारे एक आजोबा दिसले.. त्यांना विचारलं तर म्हणाले झाडी आणि शेवाळे माजलं आहे तिकडं एकटा पावसाचा नको उतरू! महादरवाजा गाठला तेव्हा मात्र धुकं नव्हतं.. झऱ्यांचे छोटेछोटे धबधबे झाले होते आणि दगडी पायवाटेला अलगद ओलांडत होते.. थकलेल्या पावलांना तेवढाच गारवा मिळत होता..

समोर पर्वत शिखरांची रांग दिसत होती.. मध्ये दरी आणि कौलारू घरांची गावं.. त्यातून वाहणारी काळ नदीची रुपेरी रेघ.. हिरवी कंच भातशेती ब्रश ने रेखाटलेल्या लँडस्केप सारखी भासत होती.. मागे वळून पाहिलं तर टकमक टोकाचे रौद्र सौंदर्य दिसत होते. किल्ल्यावरून पाहिले तर टकमक टोक स्वर्गात बांधलेल्या पुलासारखे वाटते.. महादरवाज्यातून मात्र हजार फूट उंच टकमक कडा मला अंधकासुराला मारण्यासाठी तलवार उगारलेल्या शिवासारखा भासला..पुन्हा वर चढून गंगासागर तलाव गाठला.. आकाश स्वच्छ निळे आणि उन्हाची ऊब आता सुखावत होती..

बालेकिल्ल्याचे अष्टकोनी मनोरे सुंदर दिसत होते की त्यांचे गंगासागरात दिसणारे प्रतिबिंब जास्त लोभस होते सांगणं कठीण आहे. शिरकाई देवीला रामराम करून होळीचा माळ गाठला.. राणीवसा आणि दरबार आता पुन्हा धुक्याने भरू लागला होता. सिंहासनस्थ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थितप्रज्ञ वाटत होती. हीच ती जागा जिथं राज्याभिषेक झाला, हीच ती जागा जिथं ब्रिटिश वकिलाने आपल्या छत्रपतींना कुर्निसात केला.. मला तीर्थक्षेत्र असावं तसं भासत होतं तिथं..हिंदू असणं आणि मराठी असणं टिकलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचीच कृपा नाही का? पाऊस पडायला लागला, छत्री आणि रेनकव्हर मध्ये कॅमेरा लपवत पुन्हा जगदीश्वर मंदिर गाठले.

भवानी कडा काय तिथं जाणारी पायवाटही दिसेना. मग समाधीजवळ आलो. तिथं डोळे मिटले क्षणभर आणि जगदीश्वराचे दर्शन घेतले अन बाजारपेठेच्या अलीकडे एका उंचवट्यावर बसलो.. समोरची डोंगररांग पुन्हा एकदा ढगांची दुलई पांघरून गायब झाली होती.. मागे पोटल्या डोंगराला ओलांडून ढग नगारखान्याला ओलांडत माझ्या दिशेने येत होते.. खालच्या दरीतूनही आता ढग वर चढून येऊ लागले. विमानाबाहेर खिडकीतून कसं दिसतं ते मी प्रत्यक्ष अनुभवत होतो.. आता जेमतेम तीस फूट अंतरावर दिसत होते.. दोन्ही बाजूंनी ढग आले आणि मिसळून गेले. रात्रीपेक्षा गडद काळोख झाला.. पाऊस नव्हता पण अंगावर अलगद होणारा थंड स्पर्श कसला हे मी पाहू लागलो, पावसाचे थेंब नव्हते, तो ढगांचा स्पर्श होता. जवळजवळ अर्धा तास मी त्या विश्वात हरवून हरखून गेलो होतो.

ढगांची दाटी भवानी टोकावरून पुढे पुण्याकडे सरकली अन पश्चिम क्षितिजावर कोकण दिसू लागले. टकमक टोकाकडे जाणाऱ्या वाटेवर दारुकोठारे आहेत त्यांच्या वर एका उंचवट्यावर बसून सूर्यास्ताची वाट पाहत होतो. सूर्याचं बिंब दिसत नव्हतं उजेडाची दिशा समजत होती इतकंच.. काळ्या आणि पांढऱ्या ढगांची अजून एक सेना पश्चिमेकडून माझ्याकडे येत होती.. मला ओलांडून ते ढग पूर्वेला गेले आणि समोरचा आसमंत अचानक उजळून निघाला.. छोटेसे पण तांबडे नारिंगी सूर्यबिंब क्षितिजावर झळकू लागले.. खाली दरीतले गाव स्पष्ट दिसत होते.. ढगांतून आरपार झालेले किरणांचे कवडसे टेकड्यांच्या हिरव्या पैठणीवर सोनेरी काठ उमटवत होते. हे सगळं अनुभव विश्व मनात जपायचा प्रयत्न करत मी परतीच्या वाटेवर निघालो.

तर मित्रहो, या दिवशी जे काही कॅमेरात टिपू शकलो ते इथं पहा https://m.youtube.com/watch?v=NS0F2n4blTI&feature=youtu.be

2 comments

  1. Pawar Rajaram Laxman

    Apratim energetic inspired innovation writer khup Chan sir good day
    These are advantrwe of traking and taking every photo and best wishes to you

  2. Harashad Vaidya

    Very excellent blog glorifying the real wealth of konkan. I am your regular reader and I would to join your team and would like share my experiences through blogs. Thank you

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: