
जैतापूर खाडी पूल ओलांडून नाटे गावातून मुसाकाजी बंदराकडे जात असताना डावीकडे रस्त्याजवळच एका दुर्गाची तटबंदी दिसते. हाच नाटे गावचा यशवंतगड. हे गाव राजापूर बंदराकडे जाणाऱ्या अर्जुना नदीच्या तीरावर वसलेलं आहे आणि हा किल्ला शिवकालात राजापूर बंदरात होणाऱ्या व्यापारी आणि लष्करी नौकानयनावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असावा. किल्ल्याचे नाव सांगताना नाटे गावचा यशवंतगड असं सांगितलं जातं कारण याच नावाचा किल्ला वेंगुर्ल्याच्या दक्षिणेला रेडी गावाजवळही आहे.

हा किल्ला गर्द वनराईने वेढलेला आहे. दोन मी दोनदा या ठिकाणी गेलो परंतु प्रचंड झाडोरा माजलेला असल्याने सगळे गडावशेष पाहता आले नाहीत. मे महिन्यात थोडी मोकळी जागा होती.

कोकणात सापडणाऱ्या जांभा दगडात यशवंतगडाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यातून साकारलेली भक्कम तटबंदी आजही आपली ऐट सांभाळून आहे. लष्करी वास्तुरचनेची वैशिष्ट्ये पाहताना गवतातून जात असाल तर साप विंचू वगैरेबद्दल जागरूक राहून पाऊल टाकले पाहिजे.
पण संध्याकाळी दिवस संपता संपता मी तिथं पोहोचलो होतो त्यामुळे पुरेसा वेळ मिळाला नाही. नंतर नोव्हेंबर महिन्यात गेलो तेव्हा छातीपर्यंत उंच गवत माजलेलं असल्याने किल्ल्याचा संपूर्ण परिसर पाहता आला नाही. आता करोनाचे निर्बंध संपले की पावसाळा येण्यापूर्वी एक फेरी मारता आली तर राजापूर बरोबर यशवंतगडाचेही चित्रण पूर्ण होईल. बुरुजाजवळ खंदक आहे. त्या खंदकात उतरून पलीकडे दरवाजा गाठावा लागतो. दरवाजाची कमान ढासळून गेलेली असली तरीही आतील देवड्यांचे अवशेष दिसतात.

किल्ल्याच्या आत एक सुटा बुरुज आहे. तिथून संपूर्ण परिसरावर टेहेळणी करणे शक्य होत असावे. आज मात्र उंच झाडे असल्याने या बुरुजावरून किल्ल्याचा परिसर नीट दिसत नाही. असा एक बुरुज सिंधुदुर्ग किल्ल्यातही आहे. या बुरुजावर पायऱ्या चढून जाता येते परंतु मी गेलो होतो तेव्हा गवताने ही जागा पूर्ण भरून गेली होती. ड्रोनने काढलेल्या मी महिन्यातील फोटोत मात्र निशाणकाठीचा बुरुज, खंदक, भग्न दरवाजा, आतला बुरुज आणि अर्जुना नदीच्या तीरापर्यंत उतरत गेलेली तटबंदी दिसते. नदीपलीकडे जैतापूर परिसरातील हिरवळ दिसते.

या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सविस्तर माहिती मिळाली नाही. बांधणी पाहता हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला असं काही इतिहासकार मानतात. आधी कदाचित इथं टेहेळणी करण्यासाठी ठाणे किंवा गढी असू शकेल. जनरल औट्रम ही बोट १८७१ साली जैतापूर दीपगृहाच्या उत्तरेला या परिसरात बुडली अशी नोंदही सापडते. ही वाफेच्या इंजिनावर चालणारी बोट ग्लासगो येथे बांधली गेली. तर दर्या फिरस्ती मधील ही गोष्ट तूर्तास अधूरी आहे. धावती भेट देऊन केलेल्या पाहणीला पूर्ण मानता येणार नाही. तेव्हा आशा करतोय की करोनाचे संकट दूर होऊन लवकरच इथली भ्रमंती पूर्ण करायला दर्या फिरस्तीला वाव मिळेल.