
कोकण आणि श्री गणेशाचे अतूट नाते आहे. वेंगुर्ला तालुक्यात रेडी किनाऱ्याला खाणकाम चालते. तिथं सदाशिव कांबळी नामक एका गणेश भक्ताला खाणीच्या भागात श्री गणेशाची मूर्ती पुरलेली आहे असा दृष्टांत झाला आणि मग खरोखरच तिथं खोदकाम केल्यानंतर अशी मूर्ती सापडली व समुद्र किनाऱ्याला लागून असलेले हे गणपतीचे स्थान निर्माण झाले असे स्थानिक लोक सांगतात. मूर्ती मिळाल्यानंतर दोन महिन्यांनी मूषक मूर्ती सुद्धा सापडली.

जवळपास सहा फूट उंची असलेली ही भव्य मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण साधारणपणे गणेश मूर्तीला चार हात असतात तर या मूर्तीला दोनच हात आहेत. ही बसलेल्या अवस्थेतील द्विभुज मूर्ती आहे. श्रीगणेशाचे वाहन असलेल्या उंदीराची मूर्तीही मोठी आहे. मी नोव्हेंबर २०१९ मध्ये इथं गेलो तेव्हा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत होता. हे मंदिर प्रथम १९७६ मध्ये बांधले गेले असं स्थानिक सांगतात.

मंदिराच्या मागे चालत समुद्राकडे गेले की तांबूस माती असलेला समुद्रकिनारा आणि त्यावर उभे असलेले माड दिसतात. भरती असेल तेव्हा इथं लाटांचं नृत्यही पाहायला मिळते. इथली माती खनिजांनी भरलेली असल्याने तिला असा तांबडा रंग आलेला आहे. निसर्गाचं हे देखणं रूप आणि तिथेच बाजूला माणसाने केलेली खाणकामाची गर्दी पाहून आत्मपरीक्षण करावंसं वाटतं. पण केवळ उद्योग धंद्यांना विरोध करणे पुरेसे नाही. आपली जीवनशैली पर्यावरण पूरक आहे का याचा आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.
दर्या फिरस्ती प्रकल्पात कोकणातील अशाच विलक्षण ठिकाणांची चित्रभ्रमंती आणि डॉक्युमेंटेशन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आमच्या ब्लॉग ला भेट देत रहा, तुमच्या मित्रांना, कोकणवेड्या दोस्तांना जरूर सांगा. फेसबुक, व्हाट्सअप सारख्या माध्यमातून हा ब्लॉग जगभर पोहोचवायला आम्हाला मदत करा ही अगत्याची विनंती.