Darya Firasti

वेंगुर्ला तालुक्यातील समुद्रकिनारे

तेरेखोल नदीच्या मुखाशी महाराष्ट्र गोवा सीमेवर एका टेकडीवर आहे तेरेखोलचा किल्ला.. आणि दक्षिणेला गोव्यातील पहिला समुद्रकिनारा म्हणजे केरी बीच..

Redi beach

पोर्तुगीजांचा अंमल असलेल्या या किल्ल्याने गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. डोंगराच्या पायथ्याशी फेसाळत येणाऱ्या लाटा पाहताना इथं मंत्रमुग्ध व्हायला होतं यशवंतगडाला साथ देणारे रेडी बंदर…

खाडीच्या मुखाशी उथळ पाण्याच्या दुलईतली शुभ्र वाळू आणि तिथल्या किनाऱ्यावरील तांबूस मातीचा आगळा रंग..आणि मग उत्तरेला शिरोड्याचा निर्मळ सागरतीर.. कोवळ्या उन्हात न्हाऊन निघालेली वाळू आणि लाटांनी धरलेल्या तालाचा गजर… ध्यानमग्न करून टाकणारा हा आसमंत … कितीही वेळ इथं उभं राहिलं तरीही आता पुरे असं वाटतच नाही

अर्धा किलोमीटर चालत पुढं गेलं की येतो आरवलीचा मोहक किनारा.. सागरतीर्थ असं याचं अगदी समर्पक नाव आहे.. इथं लालबुंद जांभा खडक समुद्राला सोबत द्यायला वर्षानुवर्षे उभे आहेत.. ओहोटीच्या लाटा रेंगाळत मागे फिरतात आणि भरतीच्या लाटा या खडकांना आलिंगन द्यायला झेपावतात.. इथेच कडोब्याच्या साथीने मोचेमाड नदी समुद्रात विलीन होते…

मोचेमाड नदी ओलांडून आपण मोचेमाड किनाऱ्यावर येतो.. उत्तर टोकाला वाळूची टेकडी हिरवळीच्या साजाने नटलेली दिसते.. वर येऊ लागलेल्या सूर्यनारायणाची प्रतिमा किनाऱ्यावर स्थिरावलेल्या पाण्यात दिसू लागते.. या सखल भागात अगदी निवांतपणे लाटांचे आवर्तन सुरु असते… टेकडीच्या पायथ्याशी मात्र त्याच लाटा किनाऱ्यावरील खडकांशी जोरकस टक्कर घेत असतात.. समुद्र आणि आकाशाने इथं निळ्या रंगाचं शेड कार्डच आपल्यापुढं ठेवलेलं असतं .. वेंगुर्ल्याच्या दिशेने जाताना भरतीचे फेसाळणारे तुषार आपलं स्वागत करतात..

उभा दांडा सागरेश्वरचा किनारा म्हणजे शिवाच्या आशीर्वादाने पावन झालेला रम्य सागरतीर… खरखरीत शिंपल्यांनी आपल्या पायांना छान मसाज होतो.. पण जपून हं … एखाद्या टोकदार तुकड्याने जखमही होऊ शकते .. थंड मखमली वाळू आणि त्यावर उबदार झालेलं पाणी… पलीकडे वेंगुर्ल्याचे दीपगृह दिसायला लागते… पायाखालची वाळू लाटा खेचू लागतात आणि तोल सांभाळत तिथं उभं राहण्याची गंमत आपण अनुभवतो… एकामागोमाग एक अशी लाटांची मालिका आपल्या पायांना अलगद स्पर्श करून जाते.. झाडांच्या जाळीतून वेंगुर्ला बंदर आणि किनाऱ्यावरील पुळण दिसू लागते… खडकांची रास किनाऱ्याचे रक्षण करत असते.. त्यातून लाटा अलगद झिरपत पुढे येतात.. इथं समुद्राची गाज ऐकत आपण क्षणभर विश्रांती घेतो… मासेमारी करून परतलेली होडी नांगरलेली दिसते.. वेंगुर्ला नवाबागची शुभ्र पुळण आपलं लक्ष वेधून घेते…

दाभोळी-वायंगणीला कोळ्यांची लगबग सुरु असते… उतार असलेल्या किनाऱ्यावर लाटांचा गंभीर निनाद अनुभवता येतो…. एखादी होडी वगळली तर बाकी किनारा एकटा निवांत असतो..

आरती प्रभूंच्या लेखणीने अजरामर केलेला कोंडुरा… याचं सौंदर्य मात्र शब्दांच्या आवाक्यात न मावणारे … दोन टेकड्यांच्या ओंजळीत सामावलेला हा किनारा.. नजरेच्या एकाच टप्प्यात मावणारा.. माडांच्या शीतल छायेत विसावलेला .. कोंडूऱ्याची छोटीशी पुळण भरतीच्या पाण्याने कधी चिंब होऊन जाते हे समजतही नाही.. नारळाच्या झावळ्यांतून झिरपणारी किरणे किनाऱ्यावर ऊन-सावलीची नक्षी रेखत होती… अथांग सागराला भरभरून मिठी मारण्याची इच्छा क्षणभर मनात डोकावते.. कोंडूऱ्याची सागरसाद मनात घर करून राहते…

वेंगुर्ला तालुक्यातील या सागरी सौंदर्यावर आम्ही एक व्हिडीओ सुद्धा बनवलाय. तो सुद्धा नक्की पहा.

कालावी चा किनारा एकाकी वाटत नाही… इथल्या गाव आणि बंदराला खळाळणाऱ्या लाटांची सोबत आहे….माडांच्या बागेत बसून कालावी किनाऱ्याचे दृश्य पाहत तासंतास बसता येते… समुद्र भ्रमंतीला इथं छानसा स्वल्पविराम मिळतो..

केळूसची खाडी म्हणजे कोकण किनाऱ्याचे अजून एक लोभस रूप… लॅटेराइट म्हणजे जांभा ही कोकण भूमीची खास ओळख .. खाडीचे समुद्रात विलीन होणे आणि मागे कालावीची पुळण हे दृश्य चित्राप्रमाणे भासते..

आणि खवणे म्हणजे तर अगदी पोस्टकार्ड मटेरियल.. या खडकांना कित्येक शतके लाटांनी तासून झिजवले असेल.. चमकणारे पाणी.. खडकांची नक्षी आणि माडांच्या समृद्ध बागा..यांनी सजवलेला हा किनारा…

दांडेश्वर श्रीरामवाडी किनारा हा कोळीबांधवांचा आश्रयदाता…उत्तरेला निवतीचा सडा समुद्राला जाऊन भिडलेला आणि त्याला लागून हा चंद्रकोरीच्या आकाराचा तीर.. अलगद येणाऱ्या लाटा काहीतरी गुणगुणत असतात… मखमली वाळूला जणू काहीतरी सांगत असतात..

निवती म्हणजे कोकणच्या खजिन्यातील एक अमूल्य रत्न .. या किनाऱ्याचे सौंदर्य आपल्या डोक्यातील चौकटीपेक्षा खूप वेगळे आहे.. ओहोटीच्या वेळी इथं विलक्षण शांततेचा अनुभव मिळतो.. थंडगार पाण्यात पावले बुडवून चालताना या किनाऱ्याने आपल्याला मिठीत घेतल्याचा भास होतो.. इथल्या उथळ पुळणीवर हळुवारपणे अंथरलेल्या लाटा भरतीची चाहूल देतात..

निवती किल्ल्यावर उभं राहून भोगवे किनाऱ्याचा दिमाख पाहत उभं राहायचं.. ब्लू फ्लॅग मानांकन पटकवलेला हा किनारा जिथं कर्ली नदीला भेटतो.. ती जागा म्हणजे वेंगुर्ला तालुक्याची उत्तर सीमा..इथल्या वाळूतली नक्षी पाहता पाहता..

मावळतीची वेळ येते..भोगवे गावात घड्याळाचे काटे थांबले आहेत असं वाटतं .. दूर देवबागचा किनारा मालवणला येण्याचं आमंत्रण देत असतो..आणि शरीर पुढच्या प्रवासाला निघालं तरी मन मात्र दर्या फिरस्तीच्या अनुभवातील या खास क्षणांना घट्ट बिलगून मागे रेंगाळत राहतं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: