Darya Firasti

रेवदंड्याचा पोर्तुगीज किल्ला

रेवदंड्याचा आगरकोट हे उत्तर फिरंगाणातील पोर्तुगीजांचे पहिले लष्करी ठाणे होते. इसवीसन १६३४ मध्ये अंतोनिओ बोकारो ने लिहून ठेवलेल्या माहितीप्रमाणे २०० पोर्तुगीज आणि ५० स्थानिक ख्रिस्ती लोकांची घरे होती आणि या सर्व घरांमध्ये काम करण्यासाठी प्रत्येकी एक गुलामही होता. किल्ल्यात २ शस्त्रागारे होती. भव्य कॅथेड्रल, रुग्णालय, जेझुइट चर्च, ऑगस्टीनियन चर्च, सेंट सॅबेस्टियन चर्च, सेंट जॉन पॅरिश चर्च, अलिबागहून मुरुडकडे सागरी महामार्गाने भ्रमंती करत जात असताना चौल ओलांडून रेवदंडा गाव गाठले की कुंडलिका नदीच्या उत्तर तीरावर बांधलेला हा पोर्तुगीज दुर्ग पाहता येतो.

डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला हा किल्ला पसरलेला आहे आणि त्याचा तट फोडूनच आजचा मार्ग काढण्यात आला आहे.मदर ऑफ गॉड कॅपुचिन चर्च अशा दहा मोठ्या इमारती होत्या असा बोकारोच्या लेखनात उल्लेख आहे. या सगळ्या बांधकामांच्या देखभालीसाठी वार्षिक रुपये २४४८ रुपयांची तरतूद करण्यात आली होती असे पोर्तुगीज कागदपत्रं सांगतात.

सोळाव्या शतकापासून इथं पोर्तुगीजांनी एक महत्त्वाचे लष्करी ठाणे आणि व्यापारी बंदर वसवले होते. चीन, पर्शियन आखात, लाल समुद्र अशा अनेक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी चौल बंदराचा संपर्क होता. लाकडी वस्तू, रेशीम, कॉटनची वस्त्रे, मलमल अशा अनेक गोष्टींची निर्मिती आणि व्यापार चौलच्या माध्यमातून होत असे. १६२५ ते १६३४ या काळात किल्ल्याचा विस्तार करण्यात आला. १६३५ ला उत्तरेचा तर १६३८ ला दक्षिणेचा दरवाजा दुरुस्त करण्यात आला. १६५६ पर्यंत हे नवे बांधकाम पूर्ण झाल्याचे दिसते.

या दुर्गाचे नामकरण पोर्तुगीजांनी साओ पेद्रो ए साओ पाऊलो दे चौल असे केले होते. उत्तरेचा दरवाजा जमिनीकडील म्हणून त्याचे नाव पोर्टा डे टेरा असे करण्यात आले आणि त्याला संरक्षण देण्यासाठी खंदक खणण्यात आला. दक्षिणेकडील दरवाजा हा बंदराच्या दिशेने उघडत असे म्हणून त्याचे पोर्ट डॉ मार असे बारसे करण्यात आले. इथं एक शिलालेख आहे ज्यात १५७७ मध्ये हे बांधकाम अलिक्सान्द्रे डिसोझा फ्रेयर च्या काळात झाले अशी नोंद वाचता येते.

जमिनीकडील दरवाजाजवळ सापडलेला शिलालेख आता मुंबईच्या संग्रहालयात आहेत त्यात किल्ल्याचा कप्तान जोआओ दे थोबार वॅलेस्को ने १६३५-३६ मध्ये इथं डागडुजी करून किल्ल्याला भक्कम केल्याची नोंद आहे. तिथं आता एक मरीआई देवीचे छोटे मंदिरही दिसते. १७२८ साली या ठिकाणी आढावा घेणाऱ्या आंद्रे रिबेरो कुटिन्हा या अधिकाऱ्याने किल्ल्याला १५ बाजू, ११ बुरुज आणि ५८ तोफा असल्याचे सांगितले आहे.

किल्ल्याच्या पूर्वेला खाजण असून संरक्षक खंदक मात्र इथं तितका स्पष्ट दिसत नाही. उत्तरेकडून या जागेला मराठ्यांचा धोका होता. दक्षिणेकडे पोर्तुगीज नौदल सुसज्ज असायचे.

समुद्राकडील दरवाजावर अशी पोर्तुगीज राजचिन्हे कोरलेली दिसतात. ती पाहून आत असलेलं मॅट्रीज चर्च अवशेषरूपात पाहायचं. मॅट्रिझ चर्चचे बांधकाम १५३४ मध्ये सुरु केले गेले तिथं नोसा सेन्योरा डो मार म्हणजेच अवर लेडी ऑफ द सी या रूपात इथं मेरीची अर्चना केली जाते.

मॅट्रिझ चर्चजवळ एक चौकोनी बुरुज आहे. हा बालेकिल्ल्याचा भाग आहे. त्याच्या दर्शनी भागावर पोर्तुगीज चिन्हे कोरलेली दिसतात.

खाली सेंट पीटर आणि सेंट पॉल या दोन संतांच्या प्रतिमाही आहेत. ज्यांच्यावरून या किल्ल्याला नाव दिले गेले. चौकोनी बुरुजाजवळ १५१६ साली एक छोटी वखार बांधली गेली व पुढे १५२१ ते १५२४ हे बांधकाम पूर्ण झाले.

पोर्तुगीज रोमन कॅथलिक पंथाचे अनुयायी आणि अतिशय धार्मिक वृत्तीचे असल्याने इथं अनेक चर्च आणि मठांचे बांधकाम दिसते. आता बरीच पडझड होऊन नुकसान झालेले असले तरीही मूळ आकाराची भव्यता इथं सहज लक्षात येते. डॉमिनिकन चर्च आणि मठाचे बांधकाम या कोटात १५४९ च्या आसपास झाले.

सेंट झेवियरचे छोटे चॅपल किल्ल्याच्या नैऋत्य भागात आहे. छोटेसेच असले तरीही स्थानिक दगडात केलेले प्रमाणबद्ध बांधकाम आवर्जून पाहण्यासारखे आहे.

जेझुइट या अतिशय कडव्या पंथाच्या साधकांची इमारतही किल्ल्यात आहे. इसवीसन १५७० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीच्या सैन्याने इथं वेढा दिला आणि त्या हल्ल्यात शहरातील अनेक इमारतींचा विध्वंस झाला आणि काहींचे बांधकाम पुन्हा केले गेले. काही इमारतींचे अस्तित्व मात्र अवशेषरूपातच पाहता येते.

रस्त्याच्या दिशेने आलं की आपल्याला ऑगस्टीनियन चर्चचा टॉवर दिसतो. हे बांधकाम १५८८ मध्ये केले गेल्याचं अँटोनियो बोकारो सांगतो.

या ठिकाणी नजरेत भरणारी अशी एक भव्य वास्तू अजूनही टिकून आहे, ती म्हणजे फ्रान्सिस्कन चर्च आणि मठाच्या जागी असलेला २९ मीटर उंच सातखणी बुरुज.

फ्रान्सिस्कन चर्चचे बांधकाम १५३४ साली झाले आणि हा प्रचंड मोठा मनोरा १६८८ च्या सुमारास बांधला गेला. मनोऱ्याच्या आत जाऊन वर पाहिले की त्याची भव्यता अधिकच जाणवते. झरोक्यांतून येणारा प्रकाश अधिकच नाट्य निर्माण करतो.

बोकारोच्या लिखाणात ९ बुरुज आणि त्यांच्यावर तैनात केल्या गेलेल्या तोफांची नावे येतात. नदीकडील पहिल्या बुरुजावर १८ पौंडी कॅमल तोफ आहे. चौथ्या बुरुजावर १८ पौंडी कॅमल तोफेच्या जोडीला ६५ पौंडी लोखंडी गोळे फेकणारी तोफही आहे. पाचव्या बुरुजाचे नाव सॅम पावलो असून त्यावर १६ पौंडी पितळी तोफ होती. सहाव्या बुरुजाचे नाव सॅम डिनीझ त्यावर १४ पौंडी दगड आणि लोखंडी गोळे फेकणारी तोफ होती. सातव्या बुरुजावर ४० पौंडी दोन ईगल तोफा होत्या आणि नवव्या बुरुजावर २४ पौंडांची लोखंडी तोफ होती असे पोर्तुगीज दस्तऐवज सांगतात. सातखणी बुरुजाजवळ काही ऐतिहासिक तोफा पडलेल्या दिसतात.

इथं पूर्वी एक रुग्णालय आणि सेवाभावी संस्था होती, पोर्तुगीजांनी त्याला मिसरीकॉर्डिया असे नाव दिले होते. असे बांधकाम वसईच्या किल्ल्यातही आहे. नकाशावरून त्याच्या अवशेषांच्या स्थानाचा अंदाज येतो.

ओहोटीच्या वेळेला किल्ल्याची समुद्राकडील भिंत पाहायला रेवदंड्याच्या किनाऱ्यावर जायचे. लांबलचक दगडी तटबंदी आणि त्यातून डोकावणारे माड अशा दृश्याचा अनुभव घ्यायचा. ओहोटीची वेळ संध्याकाळची असेल तर पश्चिमेकडून येणाऱ्या सूर्यप्रकाशात ही भिंत उजळून निघते.

रेवदंड्याच्या दक्षिण टोकाला कुंडलिका नदी समुद्राला जाऊन मिळते. तिथून समोरच चौलच्या डोंगरावर दिमाखात उभा असलेला कोर्लई किल्ला दिसतो.

आणि कुंडलिका नदीवरील पूल ओलांडून पलीकडे गेलं की आगरकोटाची भिंत आणि त्यामागचा गर्द हिरवा आसमंत निरखत बसायला मजा येते. मागे चौलची टेकडीही दिसते.

आपल्या लाडक्या कोकणाचा ऐतिहासिक वारसा हा दोन हजार वर्षांपेक्षा जुना आहे आणि चौल-रेवदंडा हे क्षेत्र कोकणातील अनेक प्राचीन क्षेत्रांपैकी एक मानले जाते. वसई आणि गोव्याप्रमाणेच कोर्लई-रेवदंडा ही पोर्तुगीजांची बलाढ्य ठाणी. त्यांची गोष्ट दर्या फिरस्तीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो. कोकणात अशा अनेक ऐतिहासिक ठिकाणाची रेलचेल आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी दर्या फिरस्ती ब्लॉग वाचत राहा आणि तुमच्या कोकणवेड्या मित्रांनाही नक्की सांगा ही विनंती.

संदर्भ –

१) कुलाबा जिल्हा गॅझेट
२) Portuguese Sea Forts Goa with Chaul, Korlai and Vasai – Amita Kanekar – published by Jaico, funded by the Deccan Heritage Foundation
3) Notes on history and antiquities of Chaul & Bassein – Jose Gerson Da Cunha – Notes by Ms Deepti Bapat

One comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: