
रत्नागिरी शहराच्या पश्चिम टोकाला असलेल्या डोंगरावर आहे किल्ले रत्नदुर्ग. या किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून त्याला तीन टोकं आहेत. हा किल्ला शिलाहारकालीन असावा असं काही इतिहासकारांचे मत आहे. १२०५च्या सुमारास राजा भोजाने याची निर्मिती केली असे म्हंटले जाते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२० एकर असून एका बाजूला पेठ किल्ला, दुसऱ्या बाजूला दीपस्तंभ असलेला डोंगर आणि तिसऱ्या टोकाला २०० फूट उंचीच्या डोंगरावर असलेला बालेकिल्ला असं रत्नदुर्गाचं स्वरूप आहे.

किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर आहे. या देवीच्या वास्तव्यामुळे किल्ल्याला भगवती किल्ला या नावानेही ओळखले जाते. हे मूळ मंदिर जरी जुने असले तरी आज आपण त्याचे जीर्णोद्धारीत स्वरूप पाहतो. रत्नासूर नावाच्या राक्षसाचा वध करणारी भगवती देवी कोल्हापूरच्या अंबाबाईची बहीण मानली जाते. हे मंदिर सरखेल सेखोजी आंग्रे यांनी एकेकाळी बांधले. त्यांचे वडील आणि मराठी आरमाराचे कर्तृत्ववान सरखेल कान्होजी आंग्रे यांचा पुतळा किल्ल्यावर आहे.

किल्ल्याची आज दिसणारी तटबंदी बांधायला बहामनी काळात सुरुवात झाली (१३४३-१५००) असं काही इतिहासकार सांगतात तर काहींच्या मते हे काम विजापूर काळात सुरु झालं (१५००-१६६०) किल्ला १६७० साली छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात आणला. तेव्हा तटबंदी अधिक मजबूत करण्यात आली आणि तिचा विस्तार पूर्वेकडे तसेच दीपस्तंभाकडील भागात करण्यात आला. १६८० साली छत्रपती संभाजी महाराजांनी रत्नदुर्गावर बांधकाम केले. आंग्रेंच्या ताब्यात हा किल्ला १७१० साली आला तेव्हाही इथं डागडुजी करण्यात आली. १७९० च्या आसपास भोरच्या धोंडो भास्कर उत्तरेची बंदराजवळची तटबंदी बांधली असे रत्नागिरी गॅझेट सांगते.

रत्नागिरी किल्ल्यात गाव होते ज्यात तेव्हा सुमारे चाळीस कुटुंबं होती असे गॅझेटमध्ये नमूद केले गेले आहे. ब्राम्हण, मराठा, गुरव, प्रभू, भंडारी, मुस्लिम, कुणबी, दालदी, सुतार, तेली, न्हावी अशा सर्व समाजांचे लोक वस्तीला होते असं कागदपत्र सांगतात. दीपगृहाच्या टोकाला किल्ल्याची उंची सुमारे ३०० फूट आहे. तिथून एका बाजूला काळा समुद्र दिसतो तर दुसऱ्या बाजूला बालेकिल्ला. संपूर्ण रत्नागिरी शहराचेच दर्शन इथून उगवतीच्या दिशेला घडते. आणि मावळतीच्या दिशेला सूर्यास्ताचा अविष्कारही दिसतो.
दीपगृहाकडून बालेकिल्ल्याकडे उतरत जाताना टकमक टोक दिसते आणि समुद्राच्या नितळ पाण्यावर फेसाळणाऱ्या लाटाही दिसतात. बालेकिल्ल्याच्या कड्याखाली एक पाणभुयार दिसते जे बालेकिल्ल्यात पोहोचते असे जाणकार मानतात.. हे भुयार आता बंद केले गेले आहे.
बालेकिल्ल्याच्या दरवाजावर हत्तीचे शिल्प आहे. किल्ल्यातील बुरुजांना खमक्या, मारठ्या, बसक्या, वेताळ, रेडे अशी नावे आहेत. त्यापैकी रेडे बुरुजावर एक स्तंभ बांधलेला दिसतो.
बालेकिल्ल्याला फेरी मारून प्रत्येक बुरुज आणि आजूबाजूला असलेला आसमंत पाहता येतो. उत्तरेकडील तटबंदीपाशी रत्नागिरी बंदर दिसते.

रत्नागिरी बंदरातून मुंबई व वेंगुर्ल्याच्या दिशेने प्रवासाची वाहतूक होत असे. पाणी उथळ असल्याने जहाजे आतवर येत नसत आणि कधीकधी प्रवाशांना कंबरभर पाण्यातून छोट्या होडीकडे जावे लागत असे. ही कटकट कमी करण्यासाठी इथं जेट्टी बांधली गेली. या जेट्टीचा प्रस्ताव आधी १८६९ मध्ये लेफ्टनंट ट्रेमलो कडून आला होता. शेवटी हे बांधकाम १९३२ मध्ये ९६००० रुपये खर्चून झाले असं गॅझेट सांगते. किल्ल्याच्या पूर्व भागात हनुमान मंदिर आणि इतर काही अवशेष आहेत. पेठ किल्ला भागातून इथं जाता येते. रत्नदुर्गाचा मुख्य दरवाजा इथं आहे. सुमारे ४०० मीटर लांबीची तटबंदी इथं उत्तर दक्षिण अक्षात बांधलेली दिसते.

किल्ल्यात भागोजीशेठ कीर यांनी बांधलेले भागेश्वर मंदिर आहे. दीपगृहाच्या दिशेने एक चढणीचा रस्ता जातो. तो अतिशय अरुंद आहे आणि नवख्या चारचाकी चालकांनी तो शक्यतो टाळावा.

मी टाटा नॅनो घेऊन गेलो होतो. पण समोरून दुसरे वाहन आले तर खूप अडचण होते. दुचाकीने मात्र अगदी सहज दीपगृह गाठता येऊ शकेल. बालेकिल्ल्याच्या तटबंदीपर्यंत मोठा डांबरी रस्ता आहे आणि पार्किंगची सोयही आहे. दर्या फिरस्तीच्या प्रवासात आम्ही कोकणातील विविध ठिकाणांची चित्रभ्रमंती घेऊन येत आहोत. हा ब्लॉग आवर्जून वाचा आणि तुमच्या मित्रांनाही दर्या फिरस्तीच्या प्रवासाचे आमंत्रण द्या ही अगत्याची विनंती.