
एका रखरखत्या दुपारी वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावात भ्रमंती करता करता समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या रानात शिरलो आणि रेडीच्या यशवंतगडाने माझं स्वागत केलं.. हा किल्ला फारसा परिचित जरी नसला तरी इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा इथं आजही स्पष्ट दिसतात. जांभा दगडात बांधलेल्या तटबंदीचे अवशेष.. या भिंतींवर उंच वाढलेल्या झाडांनी सावली धरली होती. आणि त्या झाडांच्या पानांतून झिरपणारा प्रकाश तिथं अद्भुत माहौल निर्माण करत होता.
यशवंतगडाबद्दल दर्या फिरस्तीचा व्हिडीओ नक्की इथं पहा https://youtu.be/goYoau7zLWw

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांचा दिमाखच वेगळा.. गोव्याच्या उत्तरेला असलेला हा महाराष्ट्राचा जिल्हा अतिशय रम्य समुद्रकिनाऱ्यांनी सजलेला आहे. तेरेखोलचा किल्ला पाहून शिरोड्याकडे येत असताना वाटेत रेडीच्या स्वयंभू गणपतीचे दर्शन घेतले आणि मग पुढच्या किनाऱ्याचा शोध घेत उत्तरेला निघालो. स्वच्छ पांढरी वाळू .. उथळ आणि नितळ खारे पाणी.. पश्चिमेला गडद होत जाणारी सागर निळाई आणि तिथंच सागराशी एकरूप होत गेलेलं आकाश आणि उत्तरेला दिसणारी शिरोड्याची पुळण. हा निसर्गाचा अविष्कार पाहत मी हरखून गेलो. तिथं जवळच टेकडी दिसली जी गर्द रानाने व्यापून गेलेली होती. त्या दिशेने माझी पावले वळली.

समुद्राच्या दिशेला एका किल्ल्याची तटबंदी दिसत होती. आणि जसा मी टेकडीच्या दिशेने जाऊ लागलो तसा मला किल्ल्याचा भाग दिसू लागला.

जुन्या ढासळलेल्या जांभा दगडाच्या तटबंदीची डागडुजी करून बांधून काढलेला बुरुज आणि दरवाजा पाहिला.

ग्रँट डफ या इंग्लिश इतिहासकाराच्या मते हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवीसन १६६२ मध्ये बांधला. परंतु बहुतेक हा किल्ला वाडीच्या सावंतांकडे होता आणि त्यांचं विजापूरच्या आदिलशाहीच्या वतीने इथं शासन होतं. छत्रपती शिवरायांनी हा किल्ला दुरुस्त करून भक्कम केला आणि त्याला यशवंतगड नाव दिलं.

तटबंदीची उंची साधारणपणे समुद्रसपाटीपासून तीस मीटर आहे आणि जवळजवळ ३ किलोमीटर परीघात हा किल्ला विस्तारलेला आहे.

किल्ल्याच्या दरवाजातून आत शिरताच पहारेकऱ्यांसाठी बांधलेल्या खोल्या, देवड्या वगैरे दिसतात. इथं वैचित्र्यपूर्ण आकार असलेलं छत दिसतं.

इसवीसन ६१०च्या सुमारास चालुक्य राजा स्वामीराजा हा रेडीचा शासक होता. त्यानंतर १६६२ मध्ये किल्ला स्वराज्यात आला. मग वाडीच्या सावंतांकडे किल्ला असताना १८१८ ला पोर्तुगीजांनी हल्ला केला पण त्यांना यश मिळाले नाही. पुढे १८१९ मध्ये इंग्लिशांनी हा किल्ला संभाजी सावंतांकडून जिंकून घेतला.

किल्ल्याच्या सभोवताली असलेला खंदक आता जवळजवळ बुजला आहे आणि एका वाड्याच्या बांधकामाचे अवशेष आणि काही स्तंभ इथं दिसतात. जुन्या पडक्या विहिरी, मंदिर असे अवशेष इथं पाहता येतात.

किल्ल्यात मी गेलो असताना बराच झाडोरा माजला होता त्यामुळे रेडीच्या खाडीवर नजर ठेवणारा बुरुज काही सापडला नाही. पण वाड्यासारखे बांधकाम, त्याला जोडणाऱ्या भिंती, दरवाजे यातून हिंडताना मन इतिहासाच्या टाइम मशीनची फिरस्ती करत होतं
किल्ल्यात मनसोक्त भटकंती करून परत रेडीच्या किनाऱ्यावर आलो. आणि तिथं दुकान टाकलेल्या मामांकडून मस्त ऑम्लेट पाव घेतला. गोव्याच्या कोलाहलातून सुटका मिळावी म्हणून बरेच विदेशी पर्यटक इथं येतात.

हा किल्ला काही काळ पोर्तुगीजांच्या ताब्यात होता अशी नोंद इंटरनेटवर काही ठिकाणी सापडते. किल्ल्याच्या आतील बांधकामातील काही रचना नक्कीच युरोपियन धाटणीच्या आहेत. परंतु याबद्दल मला रत्नागिरी-सावंतवाडी गॅझेट मध्ये तरी काही नेमकी माहिती सापडली नाही. आशा करतो की काही साधने तपासून याबद्दल अचूक निष्कर्ष देता येईल. इथं जवळच काही अंतरावर निवतीचा किल्ला आहे आणि महाराष्ट्राचे दक्षिण टोक ओलांडताच तेरेखोल किल्लाही पाहता येतो. कोकणातील अशाच भन्नाट ठिकाणांची चित्रभ्रमंती करण्यासाठी आमच्या दर्या फिरस्ती ब्लॉगला नेहमी भेट द्या हे अगत्याचे आमंत्रण.
👌👌👌