Darya Firasti

पद्मगड, सिंधुदुर्गाचा पहारेकरी

मालवणच्या किनाऱ्यावरून क्षितिजावर पसरलेला बेलाग आणि प्रचंड सिंधुदुर्ग आपलं लक्ष वेधून घेत असतो. सिंधुदुर्ग आणि मालवणची किनारपट्टी यांच्या मधल्या भागात समुद्राचा खडकाळ भाग आपल्याला दिसतो. या खडकांना टाळून वळसा घालून नावाडी बोट सिंधुदुर्गाच्या जेटीवर नेतो. किल्ल्याच्या पूर्वेला जो विस्तृत खडक आहे तिथं आपल्याला तटबंदी आणि दरवाजाही दिसू लागतो. हा आहे सिंधुदुर्गाचा पहारेकरी म्हणून बांधला गेलेला पद्मगड. (जंजिऱ्याजवळ समुद्रात बांधलेला कांसा किल्ला किंवा पद्मदुर्ग हा वेगळा किल्ला आहे त्याच्याशी नामसाधर्म्यातून गल्लत करू नये)

किल्ल्याच्या दरवाजाचे अवशेष आजही पाहता येतात. तिथं मला कोणतीही द्वारशिल्पे वगैरे दिसली नाहीत. किल्ल्याचा परिसर एक एकरापेक्षाही कमी क्षेत्रफळाचा असावा. अलिबागच्या कुलाबा किल्ल्याला जसा संरक्षणासाठी सर्जेकोट किल्ला बांधलेला आहे तसाच सिंधुदुर्गाचा राखणदार असलेला हा पद्मगड. सिंधुदुर्गाला सर्जेकोट आणि राजकोट असे दोन उपदुर्ग आहेत. त्यापैकी सर्जेकोट कोळंब जवळ गड नदीच्या मुखाशी असून राजकोट रॉक गार्डनजवळ आहे. तिथं मला तटबंदीचे अवशेष मात्र दिसले नाहीत.

किल्ल्यात बांधकामाची जोती आहेत आणि वेताळाचे मंदिर आहे. इथं बहुतेक वेळेला पुजारी असतो. त्याची परवानगी घेऊन तटावर चढून परिसर न्याहाळता येतो. पूर्वी तर किमान १०-१२ फूट तरी उंच असावा. आता तो ढासळून ४-६ फूट उरला आहे.

या किल्ल्यावर ओहोटीच्या वेळेला चालत जाता येत असले तरीही तसा धोका पत्करू नये अशी सूचना मी काही पुस्तकांमध्ये वाचली. पण ओहोटी सुरु होत असताना जर पटकन चालत गेलं आणि १०-१२ मिनिटात हा छोटासा किल्ला पाहून परतलं तर ओहोटी संपायच्या आत अगदी सुरक्षितपणे मालवण किनाऱ्यावर परत पोहोचता येते असा माझा अनुभव आहे. नाहीतर बोट ठरवून जाणेही शक्य आहे पण त्यासाठी स्वतंत्र भाडे भरून वेगळी बोट ठरवावी लागते. सिंधुदुर्ग आणि सर्जेकोट किल्ल्यांबद्दल तुम्हाला इथं वाचता येईल –

शिवलंका सिंधुदुर्ग
किल्ले सर्जेकोट – कोळंब

छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीवर सहा ठिकाणी जलदुर्ग बांधले. ही मालिका दक्षिणेत सिंधुदुर्गाने सुरु होते आणि विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा असा उत्तरेकडे प्रवास करत मुंबई पासून ३० किलोमीटर अंतरावर खांदेरीला संपते. ऐन पावसाळ्यात शिवरायांच्या आरमाराने चिवटपणाने इंग्लिशांचा विरोध मोडून काढत बांधलेल्या खांदेरी किल्ल्याची गोष्ट या ब्लॉगवर वाचा. कोकणातील ऐतिहासिक स्थळांची ससंदर्भ माहिती आणि चित्र भ्रमंती करण्यासाठी आमच्या दर्या फिरस्ती ब्लॉगला नियमितपणे भेट देत रहा आणि तुमच्या कोकणवेड्या मित्रांबरोबरही हा ब्लॉग शेयर करा ही विनंती.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: