
वेळास गावातून दक्षिणेला निघालं की रस्ता एका टेकडीवर येतो.. अचानक गर्द वनराईतून आपण पार होतो आणि डोंगर उतारावरून रस्ता खाली उतरू लागतो. आणि आपल्याला दर्शन होते भारजा नदीच्या मुखाचे आणि नदीपलीकडे केळशीच्या पुळणीचे उत्तर टोकही आपल्याला दिसते. सुरूचे बन, काळसर रंगाची वाळू.. पुळणीच्या मागे गेलेली खाडी. नदीच्या निळाईचे समुद्राच्या निळाईत होणारे मिश्रण असा निसर्गचित्राचा अनुभव इथं आपण घेत थबकतो. आपल्या बाजूच्या किनाऱ्यावर लालसर माती आणि घसारा दिसतो आणि या सगळ्या चित्राला धक्का लागेल अशी एखादी खाणकामाची बोट दृष्टीस पडते. इथं पूल बांधणीचे कामही सुरु आहेच. पण आत्ता तरी वाहन घेऊन पुढं जाता येत नाही. नदीच्या उत्तर तीरावरून जाणाऱ्या रस्त्याने जवळजवळ १५ किमी प्रवास करून आपण मांदीवली चिंचघरला येतो. आणि पुलावरून पलीकडे वेळवी केळशी रस्त्याला लागतो. आता नदीच्या दक्षिण तीरावरून १२ किलोमीटर पश्चिमेला आलो की आपण केळशी गावात येऊन पोहोचतो.

भारजा ही तशी छोटीशीच नदी. मंडणगड येथे कडवण गावाजवळ उगम पावते आणि केळशीजवळ सिंधुसागरात विलीन होते. देवडोंगर ते केळशी हा प्रवास सुमारे ४२-४५ किमी आहे. देवडोंगराजवळच गावमुख नावाची दुसरी छोटीशी नदी उगम पावते आणि सोनारवाडीला भारजा नदीला मिळते. भारजेचे पाणलोट क्षेत्र २८३ वर्ग किलोमीटरचे असून २१८ दशलक्ष घन मीटरची जलसंपत्ती या नदीत आहे.

नदीच्या दोन्ही काठांवर शेते आहेत. मांदिवली पुलावर उभे राहून नदीचं जे दृश्य दिसतं ते सुद्धा अगदी चित्रकाराने कंपोझ करावं तसंच दिसतं. सकाळच्या वेळेला तिथं शांतता असते पश्चिमेकडे सगळं सूर्याच्या प्रकाशात न्हाऊन निघालेलं असतं. गावातील लगबग सुरु असते. नदीच्या पात्रात सभोवतालच्या आसमंताचे प्रतिबिंब दिसत असते. दूर कुठं किलबिलणारे पक्षी ओरडत असतात. गाडी किंवा बाईक जे काही असेल ते पार्क करून तिथं काही काळ बसून राहायचं. गरम चहा मिळाला तर फारच मस्त.

भारजा नदीच्या मुखाशी आलं की मग समुद्रकिनाऱ्याच्या खाऱ्या आसमंताची चाहूल लागते. काळसर चिखल असलेली वाळू, स्वच्छ पण उथळ प्रवाह, नदीचं खाडीत मिसळून जाणं, कांदळवनाची हिरवळ असा देखावा आपलं लक्ष वेधून घेतो. क्षितिजरेषेपाशी समुद्र दिसायला लागलेला असतो.
कोकणात अनेक समुद्र किनाऱ्यावर वाळूच्या टेकड्या आहेत. भौगोलिक परिभाषेत त्यांना कोस्टल ड्यून्स असं नाव आहे. प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन स्तरांमध्ये या वाळूच्या टेकड्या दिसतात. केळशीच्या वाळू टेकडीची एक विशेष गंमत आहे. तिथं संशोधन करणाऱ्या प्राध्यापक श्रीकांत कार्लेकर आणि त्यांच्या टीमला हाडांचे सांगाडे, जुन्या विहिरीचे अवशेष, मडकी आणि खापरांचे तुकडे, टेकडीच्या माथ्यावर जमलेले शंख-शिंपले इत्यादी गोष्टी सापडल्या. तिथं पुरातन नाणी सापडतात असेही गावकरी सांगतात.
पुढे प्राध्यापक अशोक मराठे आणि इतर संशोधकांनी केलेल्या संशोधनातून सुमारे ७०० वर्षांपूर्वी जागृत असलेली वस्ती ६-७ सप्टेंबर १५२४ ला आलेल्या सुनामीत नष्ट होऊन इथं इतकी उंच वाळूची टेकडी निर्माण झाली असा निष्कर्ष निघाला जो अतिशय महत्वाचा आहे.
इथं जवळच पूल बांधला जाणार असून त्याचा या टेकडीवर परिणाम होईल का अशी शंका पर्यावरणवादी व्यक्त करत आहेत. प्राध्यापक मराठे यांनी २०११ ला प्रकाशित केलेल्या पेपर प्रमाणे इथले वाळूचे थर २० मीटर जाड असून इसवीसन १५२४ नंतर इथं ३ स्तरांचे बदल झालेले दिसतात. या ठिकाणी सापडलेली नाणी अहमदशाह वली बहामनी (१४२२-३६) च्या काळातील आहेत असं लक्षात येतं. केळशी गाव पाहिलं की टुमदार या शब्दाचा अर्थ नुसता कळतच नाही तर जाणवतोही. त्याबद्दल स्वतंत्र लेख पुन्हा कधीतरी