
अथांग निळ्या सागराला हजारो वर्षे सोबत देत उभा असलेला दोन अडीचशे फूट उंच डोंगर आणि त्या डोंगराच्या माथ्यावर असलेलं शिवालय. मंदिरांच्या बाबतीत स्थानमाहात्म्य हा शब्द आपण अनेकदा ऐकला असेल.. त्याची प्रचिती घ्यायला इथं म्हणजे कऱ्हाटेश्वराला यायला हवं. कोकणातील एखाद्या साध्याभोळ्या माणसाचं घर असावं तसं दिसणारं हे छोटंसं कौलारू मंदिर आणि त्याच्यापुढं उभी असलेली आखीव रेखीव दीपमाळ. मंदिराच्या परिसरात असलेल्या चाफ्याच्या फुलांचा दरवळ एक सुखद अनुभव देत असतो. आणि सभामंडपात गेलं की गुरवाने लावलेल्या उदबत्तीचाही सुगंध आपलं लक्ष वेधून घेतो.

इथं बसून ध्यान करत काही क्षण लोटले की मग शांततेचंही अस्तित्व जाणवायला लागतं. आणि एरव्ही सहज ऐकू न येणारे आवाजही कानावर पडू लागतात. मग तो स्वतःच्या श्वासाचा आवाज असेल नाहीतर धडकणाऱ्या हृदयाचा नाद. घरी परतणाऱ्या पाखरांची किलबिल आणि दूर खाली समुद्रकिनाऱ्यापाशी लाटांनी खडकांवर धरलेल्या एका वेगळ्याच लयीचा आवाज. हे सगळं कसं अगदी स्पष्ट ऐकू यायला लागतं.

ध्यानमग्न होण्यासाठी इथं काही वेगळं संगीत किंवा मंत्रोच्चार करावेच लागत नाहीत. ती सोय निसर्गानेच करून ठेवलेली आहे. पश्चिमेला सिंधुसागराचा गहिरा निळा पोत आता मावळतीला आलेल्या सूर्याने सोनेरी झळाळी धारण करतो. भरती ओहोटीच्या गणिताप्रमाणे पाणी अलगद खळाळत असते किंवा फेसाळते श्वेतवस्त्र धारण करून किनाऱ्याला भिडत असते.

मंदिराच्या पूर्वेला किल्ले जयगड आणि शास्त्री नदीच्या मुखाचा परिसर दिसत असतो. त्या दिशेने शंभर दगडी पायऱ्या उतरून गेले की अचानक एक गोमुख आणि त्यातून निरंतर खळाळत वाहणारा झरा दृष्टीस पडतो. पर्यटकांचा गोंधळ नसेल तर या झऱ्याची लयकारी आणि किनाऱ्याजवळच्या झाडांतून वाऱ्याने घातलेली शीळसुद्धा स्पष्ट ऐकू येते. जोडीला खाडीत येऊन शांत झालेल्या लाटांची गाजही ऐकू येते. गोमुखातून वाहणाऱ्या पाण्याची चव चाखायला मिळणे ही एक पर्वणीच. निसर्गनिर्मित खरेखुरे मिनिरल वाटर पिऊन आपण ताजेतवाने झालेले असतो.

इथं शिलाहारकालीन मंदिर असले पाहिजे. त्यानंतर इसवीसन १६००, १७६४, १९२१ आणि १९७० अशा जीर्णोद्धार केल्याच्या नोंदी आहेत. हे मंदिर म्हणजे जवळच नांदिवडे येथे राहणाऱ्या जोग मंडळींचे हे कुलदैवत. जवळच असलेला जयगड किल्ला तर आवर्जून पाहावा असाच आहे. आणि इथल्या दीपगृहातून खूप दूरवरचा परिसर सहज न्याहाळता येतो.

या परिसरात रीळ, उंडी, अंबुवाडी, कचरे अशा अनेक सुंदर अस्पर्श किनाऱ्यांची रांग आहे.. आणि थोडं पुढे दक्षिणेला गेलं की मालगुंड आणि गणपतीपुळे. पण इथं पर्यटकांच्या गर्दीचा उच्छाद फारसा नसतो. नांदिवडेच्या जोग मंडळींपैकी गौरव जोग हा माझा अगदी जिव्हाळ्याचा मित्र. समर्थ रामदासांनी सांगितलेच आहे की सृष्टीमध्ये बहू लोक, परिभ्रमणे कळे कौतुक. याचा अनुभव मला जवळजवळ प्रत्येक प्रवासात येत असतो. दर्या फिरस्तीबद्दल अत्यंत आत्मीयता असलेला हा दोस्त आपल्या ऑफिसच्या वेळापत्रकातून वेळ काढून मला भेटायला आला होता आणि आम्ही दोघांनी हा पूर्ण परिसर पालथा घातला. या ठिकाणी कोनच्या आकारातील काही स्तंभ पाहता येतात पण त्यामागचे प्रयोजन मात्र समजत नाही.

नारायणभाऊ जोग रामदासी यांनी अगदी समर्पकपणे कऱ्हाटेश्वराचे स्थानमाहात्म्य निश्चित केलेले दिसते
एकांतस्थळी हा सुरम्य विलसे नाम कऱ्हाटेश्वर,
पायी सागर हा नित्य वसतसे गर्जोनिया गंभीर
सुरेख!
Pingback: कहाणी शास्त्री नदीची | Darya Firasti