Darya Firasti

किल्ले रामगड

कणकवलीजवळच वागदे येथे देवी आर्या दुर्गेचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले आणि मसुरे-बांदिवडेच्या दिशेने निघालो. माझ्या आजीचे आजोळ बांदिवडे.. गड नदीच्या काठी असलेला, शेती बागायतीने समृद्ध असा हा गाव.. तिथं आईच्या मामाचे जुने घर शोधून मग लगेचच कोटकामते दर्शन घेऊन मिठबावच्या दिशेने जायचे होते. त्यामुळे जेवण न करताच आम्ही पुढं निघालो. आचरा रोड अगदी उत्तम स्थितीत होता आणि गाडी पळवत होतो. तेव्हा अचानकपणे एक पूल लागला आणि अतिशय शांत आणि रम्य नदीचे दर्शन झाले. हिरवळीची चादर पांघरून अगदी निवांतपणे पश्चिमेकडे निघालेली एक छोटीशीच नदी. ही होती गड नदीची उपनदी असलेली जानवली नदी.

वाटेत रामगड गाव दिसले. इथं जवळच रामगड किल्ला आहे हे नकाशात स्पष्ट दिसत होते. दुपारचे तीन वाजले असावेत. सहापर्यंत मिठबांव गाठायचे असल्याने डोंगरी किल्ला पाहायला कितपत वेळ आहे कळेना. मग गावातील एका मुलाला विचारले. तो म्हणाला दहा पंधरा मिनिटात सहज किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत पोहोचाल. आईला म्हंटलं तू गाडीत बसून आराम कर निवांत. मी अर्ध्या पाऊण तासात किल्ला पाहून येतो.

रामगड किल्ल्याचा हा दरवाजा साधारणपणे ८ फूट उंच असेल आणि बुरुजांची उंची सुमारे १८ फूट असेल. किल्ल्याला एकंदर १५ बुरुज आहेत.. जर या तटबंदीबरून गडफेरी केली तर अर्ध्या किलोमीटरहून जास्त अंतर होईल. इथं दरवाजाची बांधणी, पहारेकऱ्यांसाठी असलेल्या देवड्या आणि विशेषतः दरवाजाच्या कमानीत असलेला ट्रू आर्च चा की स्टोन स्पष्टपणे दिसतो. इथं जवळच दुसरा दरवाजा आणि चोर दरवाजा सुद्धा आहे.

गड नदीचा उगम रांगणा किल्ल्याजवळ होतो आणि तोंडवळी येथे ही नदी समुद्रात विलीन होते. या नदीतून होणाऱ्या व्यापारी आणि सामरिक वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी रामगड बांधला गेला. विविध पुस्तकांमध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतला असे उल्लेख आहेत पण त्यासाठी नेमका संदर्भ मला मिळाला नाही. किल्ल्याला अर्धगोलाकार बुरुज आहेत आणि तोफांचा मारा करण्यासाठी त्यात झरोके आहेत. गावकऱ्यांनी स्वच्छ केलेल्या बुरुजावर भगवा झेंडा पाहून समाधान वाटले.

किल्ल्याच्या आत होळीचा माळ नावाचा मोकळा भाग आहे, तिथून पुढं चालत गेलं की बालेकिल्ला दिसतो. गॅझेटमध्ये याचा उल्लेख किल्लेदाराचा वाडा असाही केलेला दिसतो. किल्ल्यात पाण्याची सोय नाही अशीही नोंद आहे. या बालेकिल्ल्याचा दरवाजा दिसला नाही पण पायऱ्या चढून तटबंदीत दाखल होणे शक्य आहे. दुसऱ्या बाजूने भिंत ढासळलेली असल्याने तसेच आत जाता येते.

पडझड झालेल्या किल्ल्यांमध्ये किंवा ऐतिहासिक वास्तूंमध्ये काय पाहत उगाचच हिंडायचे असं अनेकांना वाटते. मुख्य तटबंदी वगैरे पाहून पर्यटक मंडळी घाईघाईत बाहेरही पडतात. इथं बालेकिल्ल्यात एक अतिशय सुंदर आणि वेगळीच भासणारी गणेशमूर्ती आहे. या मूर्तीचा काळ काय, शैली कोणती मला कल्पना नाही. परंतु विघ्नहर्त्याच्या वरदहस्ताने इथला प्रदेश पुनित झालाय हे खरं. अशावेळी त्या शांत गूढ वातावरणात अथर्वशीर्ष म्हणण्याचा मोह मला आवरला नाही.

या गडाबद्दल अतिशय त्रोटक ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे. पेशवे – तुळाजी आंगरे संघर्षात रामगड तुळाजींनी जिंकला पुढं फेब्रुवारी १७९६ मध्ये रामगड कृष्णाजी महादेव आणि सावंतवाडीकर खंडाजी मानकराने जिंकला. पुढे ६ एप्रिल १८१८ ला इंग्लिशांच्या ताब्यात रामगड आला तेव्हा २१ तोफा आणि १०६ गोळे इथं सापडले अशी नोंद गॅझेटमध्ये आहे. वॉरदिंगटन नामक अधिकाऱ्याने १८६२ ला काही टिपणे केलेली दिसतात आणि किल्ल्यातील मंदिर ढासळलेल्या अवस्थेत असल्याचं तो सांगतो. आज इथं उभ्या पुरलेल्या ७ तोफा दिसतात. तिथेच एक प्रचंड मोठं तुळशी वृंदावन सुद्धा आहे. बहुतेक ही कोण्या सरदाराची किंवा कुटुंबातील कोणाची समाधी असू शकेल.

जुन्या बांधकामाचे अवशेष पाहत थोडं पुढं गेलं की होळीवाडीच्या दिशेने उतरणारा दरवाजा दिसतो. किल्ल्याच्या या बाजूला गड नदीचा प्रवाह आहे. तिथून उतरणारी वाट मात्र ढासळून गेलेली आहे. गोमुख रचनेच्या या दरवाजाचे अवशेष मात्र पाहण्याजोगे आहेत.

लॅटेराइट दगड त्याचं टेक्सचर आणि तांबूस काळा रंग यामुळे या बांधकामाला एक वेगळं राकट रांगडं सौंदर्य प्राप्त होतं. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काळे चिरे रचून केलेल्या तटबंदीचे सागरी दुर्ग आहेत. पण इथं, यशवंतगड रेडीला वगैरे दगडाचा पोत स्पष्टपणे वेगळा दिसतो.

योजना नसूनही अर्ध्या पाऊण तासात हे किल्ले दर्शन अगदीच छान पार पडलं. तिथं पाहिलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती मनात घर करून राहिली होती. झाडीत लपलेल्या तटबंदीच्या कोंदणातील ही ऐतिहासिक जागा.. दुपारनंतर पश्चिमेकडे कळणाऱ्या सूर्याची तिरपी पण ऊबदार किरणं.. रानातील पक्षांचे अपरिचित आवाज आणि ओलसर मातीत मिसळलेला तिथल्या वनश्रीचा गंध असं सगळं आठवणींच्या कप्प्यात बंद करून मी बांदिवडेच्या दिशेने निघालो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: