Darya Firasti

कोठारवाडीचा सागरी दुर्ग

छत्रपती शिवरायांचा आणि मराठा आरमाराचा महत्त्वाचा जलदुर्ग म्हणजे विजयदुर्ग किंवा घेरिया. तिथून पुढं दक्षिणेला देवगड किल्ला आहे. यांच्यामध्ये ऐतिहासिक महत्व असलेलं लष्करी बांधकाम असल्याचं कुठं वाचलं नव्हतं. दर्या फिरस्ती करत असताना महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सगळेच समुद्रकिनारे कव्हर करायचे म्हणून फील्डवर्क करत असताना, गिर्ये आणि पुरळ च्या मध्ये कोठारवाडी नावाचा समुद्रकिनारा मला सापडला. वाघोटण नदीच्या मुखाजवळ खाडीचे अनेक फाटे पसरले आहेत. त्यापैकी एक शाखा पुरळच्या दिशेने येते. तिथून कोठारवाडी कडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याला लागून मला एक बुरुजाची भिंत सापडली. हे कोणते दुर्ग अवशेष म्हणून मी शोधाशोध सुरु केली. त्याचीच ही गोष्ट.

स्वच्छ आणि शुभ्र वाळू, तितकेच स्वच्छ पाणी आणि भन्नाट वारा ही माझी कोठारवाडी किनाऱ्याची आठवण. इथं दुपारच्या वेळेला आलो होतो त्यामुळे किनाऱ्यालगत निळसर दिसणारे पाणी क्षितिजाकडे सोनेरी रुपेरी झळाळीने उजळलेले दिसत होते. इथं पर्यटकांची गर्दी नसते. मुद्दाम वाट वाकडी करून येणारे समुद्र स्नेही आले तरच.

गाडीरस्ता किनाऱ्याच्या एका टोकाला येतो. तिथं वाळूची पुळण संपून दगडांच्या राशींची सुरुवात होते. तालबद्ध पद्धतीने या खडकांवर येऊन आदळणाऱ्या फेसाळत्या लाटांचं आवर्तन सुरूच असतो. आणि परत जाणारं पाणी अलगद खळखळत जाताना समांतर गजर धरतं. किनाऱ्यावर मला शक्यतो अनवाणी चालायला आवडतं. एकतर चप्पल बूट वाळूने भरून खराब होत नाहीत.. शिवाय दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला समुद्र जसा वेगळा दिसतो.. तसाच वाळूचा स्पर्शही वेगळा भासतो. कधी मखमली.. कधी पायांना मसाज व्हावा असा खरखरीत.. कधी उबदार तर कधी थंड.. वाऱ्याची झुळूक आली आणि थोडं श्रमपरिहार झाल्याचं फिलिंग आलं आणि मी परत विजयदुर्गाच्या दिशेने निघालो.

किनाऱ्यावरून परतत असताना मला किल्ल्याची भिंत दिसली. मी फोटो काढले. जीपीएस लोकेशन घेतले. त्यावेळी तिथं कोणी नव्हतं त्यामुळे फारशी चौकशी करता आली नाही. हे फोटो दुर्ग अभ्यासक सचिन जोशींना पाठवले अन त्यांना काही ठाऊक आहे का हे विचारलं. पण त्यांचं उत्तर आलं नाही. पुढे भगवान चिले आणि सतीश अक्कलकोट यांनी कोठारवाडीच्या दुर्गाचा उल्लेख केलेला सापडला. इथल्या खाडीचे रक्षण करण्यासाठी तसेच अन्नधान्य आणि दारूगोळ्याचा साठा करण्यासाठी कोठारवाडीला दुर्ग बांधला गेला असं मला दुसऱ्या खेपेला स्थानिकांनी सांगितलं.

या बुरुजांमागे तोफा पुरलेल्या आहेत असं मी श्री सतीश अक्कलकोट यांच्या पुस्तकात वाचलं होतं म्हणून शोधाशोध केली पण मला त्या सापडल्या नाहीत. नंतर असं कळलं की तोफा गावकऱ्यांनी आता गावात आणून ठेवल्या आहेत. रस्त्याच्या बाजूलाच त्या दिसतात. गावात आंब्याची बागायत आहे. दुर्गावशेष आहेत तिथं अधिक उत्खनन केल्यास कदाचित महत्वाची माहिती मिळू शकेल. गिर्ये गावातच रामेश्वर मंदिरामागे शिवकालीन बंधारा आहे. त्याबद्दलही मला ऐतिहासिक माहिती मिळालेली नाही. आंगरे किंवा धुळपांच्या कागदपत्रात यापैकी काही माहिती मिळाली तर या ठिकाणांचा इतिहास प्रकाशात येऊ शकेल.

4 comments

  1. छान वेचक वेधक माहिती. अशाच प्रकारचं एक पुस्तक “विश्वस्त” (लेखक वसंत वसंत लिमयांचे)वाचलं होतं आणि तेही असंच रोचक होते

  2. Prajak

    ऐतिहासिक शिवकालीन हत्तिमहाल बंधारा.

    इतिहासात आजपर्यंत अनेक राजे महाराजे होऊन गेले पण आपण आदराने आठवण काढतो ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली ती रयतेला न्याय मिळवून देण्यासाठी. अशा या लोक कल्ल्याणकारी राजाचा सहवास एकेकाळी आमच्या गावाला लाभला यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिवरायांच्या पराक्रमाची व लोक कल्ल्याणकारी राज्याची साक्ष देणारे इतिहासाचे साक्षीदार आजही आपल्या गावात अस्तित्वात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे *शिवकालीन हत्तिमहाल बंधारा*

    छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्याचा विस्तार व दुरुस्ती केली त्याच दरम्यान हा बंधारा बांधला असावा असा अंदाज आहे. विजयदुर्ग किल्ल्यावर गोड्या पाण्याची विहीर आहे. पण तरीही पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून शिवाजी महाराजांनी हा बंधारा बांधला. विजयदुर्ग किल्ल्यावरचे हत्ती व घोडे येथे अंघोळीला आणले जायचे. म्हणून हा बंधारा शिवकालीन हत्तिमहाल बंधारा या नावाने ओळखला जातो. जवळच असलेल्या दामले मळा येथे पुर्वी शेती पिकवली जायची. दामले मळा येथिल शेती याच हत्तिमहाल बंधाऱ्याच्या पाण्याचा वापर करून पिकवली जायची. पुढे इंग्रजी राजवटीत येथिल स्थानिक शेतकऱ्यांनी इंग्रज सरकारला कर देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना धडा शिकविण्याच्या उद्देशाने इंग्रज सरकारने हा बंधारा पाडला असे जुने लोक सांगतात. त्यावेळ पासून आजपर्यंत हा बंधारा तसाच तुटलेल्या अवस्थेत उभा आहे. एकेकाळी राजेशाही थाट जवळून अनुभवलेला हा बंथारा आज वाळीत टाकल्या सारखा दुर्लक्षित राहिला आहे. हा एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाचा अपमानच आहे आणि यासाठी ग्रामस्थांच्या मनात दु:ख आहे पण असे असले तरी परीस्थिती जशी आहे तशीच आहे.

    अशा प्रतिकूल परिस्थितीतही हा बंथारा (तुटलेला असला तरी) खंबीरपणे उभा आहे. त्याला अजूनही आशा आहे की लोकं त्याला कधीतरी आपला समजतील, माझी त्याची विचारपूस करतील, साफसफाई करतील, कोणीतरी नवीन पीढितील मुलं येऊन “सेल्फी वीथ हत्तिमहाल बंधारा” घेतील वगेरे आणि स्टेटसला ठेवतील, उशीराने का असेना पण कधीतरी ग्रामस्थ या विषयावर एकत्र येऊन बंधाऱ्याच्या विकासावर चर्चा करतील या वेड्या आशेवर तो अजूनही उभा आहे….

    प्रजाक सहदेव सुके

    • नमस्कार, कृपया या माहितीचा संदर्भ देऊ शकाल का? आणि आपला संपर्क सुद्धा. हत्ती महाल बंधारा मी पाहिला आहे आणि त्यावरही एक ब्लॉग टाकणार आहे त्यासाठी संदर्भ उपयुक्त ठरेल. धन्यवाद

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: