कोकणातील पर्यटन म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हे समीकरण अगदी पक्के मानले जाते. इथले समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे हे सगळं तर सुंदर आहेच.. परंतु केरळच्या बॅकवॉटर्स शी बरोबरी करू शकतील अशी नदीची खोरी आणि खाड्याही इथं आहेत. इथल्या नद्यांच्या प्रवाहातून प्रवास करत असताना निसर्गाचा अविष्कार आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतो. पण अजूनही या ठेव्याची किंमत पर्यटकच काय स्थानिक जनतेलाही पूर्णतः पटलेली नाही. लांबीच्या बाबतीत फार मोठ्या नसलेल्या या नद्या वर्षभर शांत निवांत प्रवाहाच्या स्वरूपात वाहत असतात. पण पावसाळा आला रे आला की कोकणातील नद्यांचे प्रवाह रौद्र रूप धारण करतात आणि वेगाने समुद्राकडे झेपावतात.

सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर उगम पावणाऱ्या या नद्या अनेक उपनद्यांना सोबत घेत अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि मुखापाशी अद्भुत सौंदर्य पाहण्याची आपल्याला संधी देतात. मालवण तालुक्यातील अशीच एक महत्वाची नदी म्हणजे गड नदी. भुदरगड येथे उगम पावलेली गड नदी 84 किमी चा प्रवास करून तळाशील येथे समुद्राला मिळते. नदीचे पाणलोट क्षेत्र 1036 वर्ग किलोमीटर आहे.

नदीच्या स्वच्छ प्रवाहातून तळ स्पष्ट दिसतो. दोन्ही बाजूला हिरवी वनराई सावली धरून असते. कसाल आणि जानवली या दोन मोठ्या उपनद्या गड नदीत येऊन मिळतात. जानवलीचा परिसर फारच सुंदर आहे.

कसाल नदीची लांबी सुमारे 30 किलोमीटर आहे तर जानवली नदीची लांबी 33 किलोमीटर आहे. कणकवलीहून आचऱ्याकडे जाणारा रस्ता गड नदीला समांतर वाहतो. या प्रदेशात मसुरे, बांदिवडे अशी नितांतसुंदर गावे आहेत. भरतगड आणि भगवंतगड असे दोन किल्लेही आहेत.

रामगड नावाचा एक महत्त्वाचा किल्ला गड नदीच्या काठावर एका टेकडीवर बांधलेला आहे. जांभा दगडातील तटबंदी, जुन्या तोफा, गणपतीची सुंदर मूर्ती, की स्टोन ने बांधलेल्या कमानींचे दरवाजे असं इथं खूप काही पाहण्याजोगे आहे ते या ब्लॉगवर वाचा

भूदरगड वन्यजीव उद्यान परिसरात उगम पावलेली गड नदी नारडवे येथील धरण पार करून कणकवली मार्गे पश्चिमेला वळते. मसुरे नंतर प्रवाह नैऋत्य दिशेला वळतो आणि कालावल खाडी पुलाजवळ येतो. तिथं एक अतिशय सुंदर गाव आहे.. त्याचं नाव हडी गाव.. विविध पर्यावरणपूरक कल्पना इथल्या ग्रामपंचायतीने राबवल्या आहेत. त्या या दुव्यावर पाहता येतील. इथेच गड नदीच्या पात्रात पाणखोल जुवा आणि खोत-जुवा नावाची बेटे आहेत. या बेटांवर वस्ती आहे नदीतील ग्रामजीवन अनुभवायला इथं नक्की यायला हवं.

गड नदीच्या मुखाशी जो उथळ भाग आहे तिथं जवळजवळ ९ किमी लांब वाळूचा दांडा आहे. त्यामुळे या परिसराचे निसर्गसौंदर्य अद्वितीय आहे. पश्चिमेला अथांग सागर आणि पूर्वेला गड नदीचे पात्र यांच्यामध्ये तोंडवळी आणि तळाशील चे समुद्रकिनारे आहेत. तोंडवळीला सुरु आणि इतर झाडांचे वन आहे. या घनदाट वनराईत वाघही येतो असे स्थानिक सांगतात. तिथलं व्याघ्रमंदिर आवर्जून पाहायला हवं असं आहे. मुखाच्या दक्षिण बाजूला सर्जेकोट बंदर आहे आणि सर्जेकोट किल्लाही इथं पाहता येतो. केरळच्या बॅकवॉटर टूर्स प्रसिद्ध आहेत. तशी भ्रमंती गड नदीच्या पात्रातूनही करायला हवी.
Sir it will be nice if you can keep the translation options open for English & Hindi so we could forward it to the friends living atlarge beyond the borders of Maharashtra & Marathi…
Next phase will be English version
खूपच छान माहिती दिलीत..मी या गोष्टींपासून अजूनपर्यंत अनभिज्ञ होते…
खूपच छान माहिती दिलीत..गड नदीबद्दलच्या या माहितीबद्दल मी आजवर अनभिज्ञ होते…