Darya Firasti

मांदाड नदीच्या परिसरात

रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनारा आणि राजपुरीजवळ समुद्रात असलेला जंजिरा किल्ला ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे. तिथं अगदी जवळच असलेल्या कुडे-मांदाड लेण्यांकडे मात्र मुसाफिर मंडळींचे दुर्लक्ष होते. खरंतर कोकणच्या इतिहासाच्या दृष्टीने हा परिसर फार महत्वाचा आहे. खाडीच्या उत्तरेला राजपुरी-आगरदांडा आणि दक्षिणेला नानवली-दिघी असा परिसर राजपुरीच्या खाडीशी आहे. हे 1.8 नॉटिकल मैलांचे म्हणजे 3.34 किमी अंतर फेरीबोटीने पार करता येते. मी अनेक वर्षं इथं नदी नसून ही फक्त खाडीच आहे असे समजत होतो. पण इथं दोन प्रवाह येऊन खाडीला मिळतात त्यांना मांदाड नदी असे म्हंटले जाते.

अनेक ऐतिहासिक साधनांमध्ये या ठिकाणचे उल्लेख आहेत. मांदव नगरातील दानशूर लोकांनी कुडे-मांदाड लेण्यांना आश्रय दिला असावा. महाभोज मांदव स्कंदपालीत हा इथला सातवाहनकालीन शासक होता (रायगड गॅझेट) या ठिकाणाला टॉलेमी मंदगारा असे म्हणतो (इसवीसन १५०) तर पेरिप्लस मांदागोर असा उल्लेख करतो (इसवीसन २४७) या बंदरात गोवा, बलसाड आणि हबसाण (इथिओपिया) येथून ५०-१०० टन वजनाची जहाजे व्यापारी जलवाहतूक करत असत. कमी प्रतीचे कापड, तांदूळ, मोहरी, तंबाखू आणि जनावरे यांची इथून निर्यात होत असे तर चांगल्या प्रतीचे कापड, औषधे, नारळ, कॉफी, मसाले, साखर, लोखंड वगैरे वस्तू आयात होत असत.

ही नदी दोन शाखांनी बनलेली आहे. चांद आणि कुंड या नावाचे सुमारे १५ किलोमीटर अंतराचे प्रवाह मांदाड गावाजवळ एकत्र येतात आणि मांदाड नदी पश्चिमेकडे वाहू लागते. ४ किमी प्रवास करून ही राजपुरीच्या खाडीला जंजिऱ्याच्या पूर्व दिशेला १० किमी अंतरावर घोडवाडी येथे मिळते. इथं जवळच म्हसळा येथून जनसी नावाचा एक प्रवाह येतो आणि सुमारे १३ किमी प्रवास करून नरवटणे येथे राजपुरीच्या खाडीला मिळतो.

२०१३ साली मार्च महिन्यात मी इथं लाँचमधून केलेला प्रवास अगदी ठळकपणे लक्षात आहे. आम्ही दिघी ते आगरदांडा असा प्रवास करत होतो. तेव्हा चारचाकी नेऊ शकणाऱ्या मोठ्या बोटी इथं सुरु झाल्या नव्हत्या. लॉंचमध्ये माझी मोटरसायकल भरून आम्ही निघालो होतो. त्यादिवशी प्रचंड गर्दी होती आणि बोट क्षमतेपेक्षा जास्त भरली आहे की काय अशी शंका माझ्या मनात डोकावत होती. बोट जवळपास तुडुंब भरलेली आणि आता माझी बाईक कशी नेणार असा प्रश्न मला पडला. रिकाम्या जागेत एका खांबाला दोरखंड बांधून नावाड्याने माझी बाईक ठेवली. तिचं एक चाक बोटीबाहेर हवेत तरंगत होतं. या प्रवासाला २०-२५ मिनिटे लागतात. भरती असेल तर समुद्राच्या लाटा नावेला खूप हेलकावे देतात.. हे मी यापूर्वी सुद्धा अनुभवलं होतं.

पण आज मात्र बोट नेहमीपेक्षा जरा जास्तच हेलकावे घेत होती. आम्ही खाडीच्या मध्यभागी आलो तेव्हा पाण्याचा जोर अजून वाढला. लाटांचे तुषार आता बोटीच्या आत आम्हाला भिजवू लागले.. लाटांची उंची आता वाढली होती. दोन लाटा थेट आतवर आल्या आणि आम्ही सगळे चिंब भिजलो. खलाशी लोकांच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव होते. पण आता नेहमी प्रवास करणारे ग्रामस्थ सुद्धा देवाचा धावा करू लागले. ते पाहिल्यानंतर मात्र माझी आणि माझा मित्र अमोल याची पाचावर धारण बसली. आमच्या कोंबून भरलेल्या बोटीत लाईफ जॅकेट असतील असं मला काही दिसलं नाही. मला तर अजिबात पोहता येत नाही. पण मजेची गोष्ट म्हणजे मला माझे सर्व कॅमेरा आणि माझी बाईक यांची काळजी जास्त वाटत होती. हे असे हिंदकळणे १० मिनिटे सुरु होते. आता आम्ही थोडे उजवीकडे वळलो आणि लाटांवर तिरकस स्वार होऊन आगरदांडा जेटीकडे निघालो. बोट धक्क्याला ४-५ मिनिटांनी लागली आणि हुश्श झालं. जीव भांड्यात पडला.

अजून एक लक्षात राहणारा प्रवास म्हणजे २०१८ साली कुडे लेण्याला जाताना सकाळच्या शांत वेळेला अनुभवलेला हा परिसर. मुरुड ते कुडे या प्रवासात मला रिक्षाने भटकंती करणारी विदेशी पर्यटकांची एक जोडी दिसली होती. कुडे-मांदाड रस्त्याजवळ मराठा दफनभूमीत काही सरदारांच्या स्मरणशिळा आहेत असा उल्लेख रायगड गॅझेटमध्ये आहे. याबद्दल मी काही इतर ऐकले वाचलेले नाही. पुन्हा जेव्हा त्या परिसरात जाईन तेव्हा शोध घ्यावा लागेल.

२०१९ साली दिवेआगरला जाताना मी रोह्यापर्यंत गोवा-महामार्गाने आलो आणि मग घोसाळगड मार्गे आगरदांड्याला आलो. वाटेत मला हिरवळीने आच्छादलेला घाटरस्ता लागला. खाडीच्या किनारी वसलेली शेते दिसली. इथं मिठागरेही आहेत त्यांचेही दर्शन झाले. आगरदांड्याला येण्याऐवजी मी सरळ कुडे पार करून तळा म्हसळा रस्त्याने पाभरे ला आलो असतो तर दिवेआगर जवळ पडले असते. वाशी-हवेलीला म्हसळे नदीचे दर्शनही झाले असते. बघूया पुढल्या खेपेला त्या रस्त्याने जाऊ!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: