श्री कोळेश्वर विष्णुरुद्र विधी हा लोकत्रयीं वर्ततो
भक्तांचे निज पूर्ण काम करितो अब्धी तिरीं राहतो
ज्याचे नाम अर्धे हरी जड मुढां नामेंचि उद्धरी
गंगा वाहत मस्तकी निजवधू नामांकि जो सुंदरी
मंदिराच्या सभामंडपात शांत बसलेलं असताना हे शब्द कानी पडले. श्री कोळेश्वर हे आमचे कौशिक गोत्री भावे मंडळींचे कुलदैवत. आमचं कोकणात घर नसल्याने कोळथरे गावात येणं हेच गावाला जाणं. अतिशय सुंदर समुद्र किनारा, एका बाजूला पंचनदीचे मुख आणि परिसरातील हिरवळ असा इथला टुमदार थाटमाट असतो.

परशुरामांनी सारी भूमी महर्षी कश्यपांना दान केल्यानंतर त्यांना आश्रमासाठी जमीन हवी होती. मठाला पुरेल इतकी जमीन त्यांनी सागराकडे मागितली.. परंतु सागराने अतिशय गुर्मीत एक रेसभर जमीनही मिळणार नाही असे सांगितले.. या उत्तराने क्रुद्ध झालेल्या श्री परशुरामांनी बाण मारून १०० योजने लांब आणि ६ योजने रुंद अशी जमीन मिळवली. बाण पडून घडलेली म्हणून इषुपातभूमी असे नाव तिला पडले. या भूमीच्या एका भागाला कोंकण असे नाव पडले. बागलाणातील साल्हेर किल्ल्यावरून हा बाण मारला अशी अनेकांची श्रद्धा आहे.

कुकणाद् वर्धितम यस्माद् जातं तत् कोकणाभिदम् – इथल्या भूमीच्या कणाकणाची मशागत करून, मेहनत करून हा प्रदेश शेतीला लागवडीला योग्य केला म्हणून त्याचे कोकण असे नाव पडले. उत्तरेकडून हिमालयातून विद्वान बुद्धिमान वेदांतवादरत, आचार संपन्न असे चौदा गोत्रांचे ब्राम्हण इथं आणले गेले आणि त्याला आर्यावर्त असे नाव दिले गेले.

शास्त्र्या उत्तरतो याव त्सावित्र्या सिंधुसंगमः
आर्यावर्तो नाम देशस्तत्र मे चित्तपूरणम् – गुहागर माहात्म्य
शास्त्री नदीच्या उत्तरेला ते सावित्री नदी जिथं सागराला मिळते त्यांमधील प्रदेश म्हणजे आर्यावर्त. इथले विद्वान ब्राम्हण पाहून माझे चित्त प्रसन्न झाले असं श्री परशुराम सांगतात आणि त्यांना चित्तपावन अशी संज्ञा देतात.अशा या कोकणभूमीत भ्रमंती करत असताना इथल्या शिवालयांचे दर्शन घेणे ही खास पर्वणीच असते. कारण प्रत्येक ठिकाणचा आसमंत निराळा, सौंदर्य निराळे.
आख्यायिका– इथं भातासाठी शेत नांगरत असताना एका कोळ्याला पाणी लाल झालेलं दिसलं, नांगराच्या फाळालाही रक्त लागले होते. या घटनेचा अर्थ न कळल्याने त्याने गाव गोळा केले परंतु सर्वांना काहीही लक्षात आले नाही आणि मग ते परत गेले. रात्री झोपेत या कोळ्याला भगवान शंकराने स्वप्नात येऊन दर्शन दिले आणि आपण प्रगट झाल्याचे सांगितले. कोळी सकाळी लवकर उठून गावकऱ्यांना घेऊन तिथेच गेला तेव्हा त्याला तिथं स्वयंभू शिवलिंग दिसले. तिथेच सर्वांनी साष्टांग नमस्कार करून छोटेसे शिवालय उभारले. कोळ्याचा ईश्वर म्हणजे कोळेश्वर या नावाने सर्व संबोधू लागले. या कोळी घराण्यातील व्यक्ती इथं बुरोंडीहून दर फाल्गुनमासी बळी घेऊन येते आणि ग्रामस्थ तिचा सन्मान करतात अशी नोंद मी देवालयाच्या पुस्तिकेत वाचली.
बर्वे, भावे, मोडक, कोल्हटकर, पिंपळखरे, लाटे, दातार, दातीर, भागवत, जोगदेव, जोगदंड, गद्रे, वाड, लागू आणि बाम या कुटुंबांचे कोळेश्वर हे कुलदैवत. इथले मूळ देवस्थान किमान पाचशे वर्षे तरी जुने असावे असा अंदाज बांधला जातो. शके १४३० (इसवीसन १५०८) च्या सुमारास लिहिल्या गेलेल्या सीताराम भट्ट जोशी यांचेकडील ग्रंथात प्रत्येक पानावर श्री कोळेश्वर अशी नोंद आहे.

आंजर्ले येथील नारायणराव निजसुरे यांच्या संग्रही असलेल्या स्कंद पुराणातील परशुराम खंडात ५५ लेखी अध्याय सापडला त्यात श्री परशुरामांनी स्थापन केलेल्या देवतांचा उल्लेख आहे.
संस्थापयामास, तथा देवं हरिहरेश्वरं
तथाच भैरवं देवं कोळेशं पार्वती तथा
या उल्लेखाप्रमाणे कोळेश्वर देवता पुराणकालीन आहे असे मानायला जागा आहे. कोळेश्वर हा त्रिगुणात्मक देव आहे म्हणजे यात ब्रह्मा विष्णू महेश ही तिन्ही तत्त्वे आहेत.

जवळच असलेल्या पंचनदी गावातील श्री जोशी हे कोळेश्वराचे मोठे भक्त होते आणि त्यांनी इसवीसन १८३७ च्या सुमारास मंदिर बांधायला सुरुवात केली असे दिसते. पुढे लष्करात असलेल्या लाटे (मूळ आडनाव भागवत) यांनी पुढचा भाग बांधला असे लक्षात येते. उत्तर मध्ययुगीन – पेशवेकालीन मराठा शैलीत हे बांधकाम असून मंदिराच्या घुमटांची शैली इस्लामी वास्तुरचनेकडे झुकलेली आहे.

हे बांधकाम इसवीसन १८६० मध्ये पूर्ण झाले असावे. इथे जवळच जाखाई काळेश्री चे देऊळ आहे. तसेच विष्णू-लक्ष्मी, श्री गणेश आणि हनुमानाची देवळेही इथं आहेत. मंदिराला पाच फूट जाड चिरेबंदी जांभ्याची तटबंदी असून जवळच दगडी पुष्करिणी सुद्धा आहे.

मंदिराच्या बाजूला एक ओढा आहे आणि परिसरातील झाडांची शीतल छाया इथं चालताना अनुभवायला मिळते. कोळथरे हे गाव अगदी शांत आणि रम्य आहे. समुद्राला समांतर घरांची रांग, नारळ सुपारीच्या बागा आणि भातशेती असं इथलं चित्र असतं.

अनेकदा तुझं मूळ गाव कोणतं हा प्रश्न विचारला जातो … आम्हाला गाव नाही असं मी सांगायचो! लहानपणी काकाकडे पुण्याला नाहीतर आजोळी बडोद्याला जाणे हाच नेम. पण कुलदैवत कोळेश्वर रत्नागिरी जिल्ह्यात कोळथऱ्याला. तिथं ९-१० वर्षांचा असताना गेलो होतो … ते गाव अगदी चित्रातल्या सुरेख गावासारखं वाटलं होतं. काही शब्द आणि काही चित्र यांची सांगड लहानपणीच अशी एकत्र घातली जाते की त्यांना वेगळं करणं शक्य होत नाही. परवा पुन्हा कोळथरेला जाण्याचा योग आला …

माझी एकंदर सातवी खेप असेल इथं … खूप काही बदललं नाही आहे पण … दापोली आणि दाभोळच्या मध्ये हे गाव … बुरोंडीच्या पुढं … मुख्य रस्त्यापासून खाली समुद्रावर वसलेलं … अगदी छोटंसं पण अठरापगड घरांचं … आगोम आयुर्वेदिक कंपनी इथलीच … इथं उर्दू शाळाही आहे आणि एक सुंदर समुद्रकिनारा … आणि पंचनदी नावाची छोटीशी नदी जिथं समुद्राला मिळते तिथं हिरवाई निळाई पाहत रेंगाळत राहावंसं वाटतं
श्री कोळेश्वर कुलदैवत असलेली कुटुंबे पुढीलप्रमाणे –
गोत्र | आडनाव |
कपि | माईल, लाटे |
काश्यप | छत्रे, जोगदंड, दातार, दातीर |
कौशिक | भावे, बर्वे, बापये, बाम, बोरकर, भागवत, महाजन, लोणकर, वर्तक, वाड, शेठे, शोचे, शेंड्ये, जोशी, जोगदंड, अग्निहोत्री, कोल्हटकर |
गार्ग्य | खंगले, खंडाजे, खाजणे |
बाभ्रव्य | बाळ |
भारद्वाज | लागू |
वासिष्ठ | गानू, पर्वते, मोडक, विनोद |
शांडिल्य | कर्वे, डोंगरे, माटे |
संदर्भ
कोळेश्वर देवस्थानचा संक्षिप्त इतिहास
बुरोंडी गावाहून एक कोळी बळी देण्यासाठी येत असे ही माहित चुकीची आहे.
ही माहिती कोळेश्वर देवस्थानच्या इतिहास पुस्तकात आहे, कदाचित ही प्रथा बंद होऊन ही काळ झाला असेल
ते पुस्तक आपणाकडे उपलब्ध असेल तर नोंद असलेल्या पानाचा प्लीज फोटो काढून पाठवा.