
मुंबई हे एक जागतिक महत्त्व असलेलं शहर. अपरान्तभूमीतील या शहराला ब्रिटिशांच्या सत्तेखाली असताना जास्त महत्व आले. पण या शहराचा इतिहास दोन अडीच हजार वर्षे तरी मागे जातो. इथं जवळच घारापुरी बेटावर अतिशय उत्कृष्ट कोरीव शैव लेणे आहे.. जे एलिफंटा या नावाने प्रसिद्ध आहे आणि भारतातील विश्व वारसा स्मारकांपैकी एक आहे… मुंबईचे छत्रपती शिवाजी रेल्वे महाराज टर्मिनस जे एकेकाळी व्हिक्टोरिया टर्मिनस होते ते सुद्धा एक विश्व वारसा स्थळ आहे. यात हल्लीच भर पडली ती चर्चगेट परिसरात एकत्र असलेल्या व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको इमारतींची. या सर्व बांधकामांना एकत्र विश्व वारसा स्मारकांचा दर्जा मिळाला आहे. दर्या फिरस्तीच्या भ्रमंतीत आज आपण यापैकी काही इमारती पाहणार आहोत.

आर्ट डेको ही कलात्मक चळवळ फ्रान्समध्ये पहिल्या महायुद्धानंतर सुरु झाली. या शैलीत घरे, बंगले, जहाजे, गाड्या, रोजच्या वापरातील रेडियोसारखी उपकरणे अशा विविध गोष्टी डिझाईन केल्या जाऊ लागल्या. या शैलीवर क्युबिझम, फौविझम आणि व्हिएन्ना सेसेशन अशा विविध शैलींचा प्रभाव होता. पॅरिस, न्यूयॉर्क अशा शहरांमध्ये ही चळवळ विशेष लोकप्रिय झाली. आणि मुंबईतही येऊन पोहोचली. १९२९ च्या आसपास भारतीय वास्तूविशारदांच्या परिषदेने मुंबईत संमेलन भरवले आणि तिथून हा चळवळ वाढत गेली. ओव्हल मैदान, मरीन ड्राइव्ह, मरीन लाईन्स, दादर शिवाजी पार्क, विलेपार्ले अशा विविध ठिकाणी या शैलीतील बांधकामे केली जाऊ लागली. यापैकी अगदी प्रसिद्ध आणि माझी आवडती इमारत म्हणजे सूना महल. इसवीसन १९३७ मध्ये कावसजी फकीरजी सिधवा यांनी आपली आजी सुनाबाई सिधवा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही इमारत बांधली. श्री गजानन म्हात्रे या इमारतीचे वास्तुरचनाकार होते. त्यांनी या भागात मुनलाइट सारख्या इतरही आर्ट डेको इमारती बांधल्या.

या इमारतींच्या खिडक्या, त्यांची ग्रिल, काचांची तावदाने यात विशिष्ट भौमितीय आकार दिसतात आणि उठावदार रंगांचा सढळ हस्ते वापर केलेला दिसतो. श्री मेरवानजी बाना यांच्या कंपनीने बांधलेल्या रजब महल इमारतीत ही वैशिष्ट्ये ठळकपणे दिसतात.

शिव शांती भवन ही ओव्हल मैदानासमोरील एक आर्ट डेको इमारत. मेरवान बाना कंपनीनेच या इमारतीचीही संरचना केली. इथली बाल्कनी, उभ्या रेषांनी निर्माण केलेला परिणाम, दोन रंगांची रंगसंगती विशेष परिणाम निर्माण करते.

१० फेब्रुवारी १९३८ ला मुंबईच्या कदाचित सर्वात आरामदायी चित्रपटगृहाचं लोकार्पण झालं. हे म्हणजे चर्चगेट स्टेशनसमोर असलेलं इरॉस थिएटर. शावक्स कावसजी खंबाटा हे सिनेमागृहाचे मालक होते त्यांनी ५ वर्षे मेहनत करून इरॉसला सर्वोत्कृष्ट बनवण्याचा प्रयत्न केला. गोल आकाराच्या लॉबी असलेल्या या सिनेमागृहात ५० वादकांच्या ऑर्केस्ट्राला वादन करण्याची सोयही होती. जरी ही शैली पश्चिमेतून आली असली तरीही इथं केलेल्या रचना भारतीय वास्तूविशारदांच्या आहेत. इरॉसचे आर्किटेक्ट होते सोहराबजी भेडवार… मिनोचर मिस्त्री, पेरीन मिस्त्री, चिमणलाल मास्टर, मगनलाल वोहरा अशी अनेक नावे या यादीत येतील.
या इमारतींचे सौंदर्य जर पूर्णतः अनुभवायचे असेल तर केवळ इमारतींचा आकारच नव्हे तर खिडक्यांच्या जाळ्या, कंपाउंड भिंती, नावे देण्यासाठी केलेली अक्षर योजना अशा विविध गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. या बांधकामांना विश्व वारसा दर्जा मिळण्याच्या बाबतीत स्थानिक नागरिकांची भूमिका मोठी होती. आजही अतुल कुमार, सायरस गजधर, आभा नरेन लांबा असे अनेक लोक या वास्तूंच्या संवर्धनाच्या बाबतीत जागरूक आहेत.
या शैलीत बांधलेल्या इमारती फक्त दक्षिण मुंबईत चर्चगेटजवळच आहेत असं नाही. मुंबई परिसरात पाचशेहून अधिक अशा इमारतींची नोंदणी करण्यात आली आहे. माटुंगा, शिवाजी पार्क, विलेपार्ले, सायन अशा अनेक ठिकाणी आर्ट डेको बांधकामे आहेत. काही मुंबईबाहेरही आहेत. मी तर आर्ट डेको शैलीतील बांधकाम वेळास आणि रेवदंडा अशा ठिकाणीही पाहिले आहे.
काही इमारतींचे वैशिष्ट्य म्हणजे तिथं असलेली शिल्पं. जरी यांच्या मागची प्रेरणा पाश्चिमात्य असली तरीही इथल्या सौंदर्य दृष्टीने भारतीय वेष धारण केलेला दिसतो. न्यू इंडिया अश्युरन्स इमारत हे एक ठळक उदाहरण मानता येईल. या शिल्पांची रचना श्री नारायण गणेश पानसरे या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रतिभावंत मुंबईकर शिल्पमहर्षीने केली.
पानसरेंनी या शिल्पांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या समाजघटकांना प्रेरणा मानून रचना केली आहे. नारायण गणेश पानसरेंचा जन्म उरण येथे १९१० साली झाला आणि जेजे स्कूल ऑफ आर्ट तसेच लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट चे ते स्नातक.

मुंबईमधील आर्ट डेकोच्या प्रवासाचा वेध एका ब्लॉग मध्ये घेणे अशक्य आहे. इरॉस प्रमाणे मुंबईत अनेक सिनेमागृहं आहेत जी आर्ट डेको शैलीत बांधली गेली. रिगल हे दक्षिण मुंबईतील एक विशेष उदाहरण. मुंबईच्या विविध भागातील आर्ट डेको बांधकामांचा वेध आपण दर्या फिरस्तीत घेत राहणार आहोत. त्यांनी भारतीय रूपात सजून इंडो डेको अशी नवीन शैली निर्माण केली ज्याचे अनेक पैलू आपल्याला अजून पाहायचे आहेत. कोकणातील दृश्य संस्कृतीबद्दल जाणून घेण्यासाठी दर्या फिरस्ती ब्लॉगला भेट देत रहा.