

एखादं ठिकाण पाहून आपण भारावून जातो… तिथल्या आसमंतात भान हरपून जातं… आयुष्यभर स्मरणात राहतील असे क्षण अनुभवतो.. पण तिथंच जवळ पुढं असलेलं काहीतरी पाहायचं राहून गेलेलं असतं आणि त्या ठिकाणी परतण्याची ओढ आपल्याला लागून राहते.. कोकणातील नितांत सुंदर समुद्र किनाऱ्यांपैकी एक म्हणजे बुधल.. तिथं जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा किनाऱ्यावरील या छोट्याशा गावाच्या अद्वितीय निसर्ग सौंदर्याने भुरळ घातली.. आपल्याला मिठीत घेणारा चंद्रकोरीच्या आकाराचा छोटासाच किनारा.. कोळी बांधवांचे गाव आणि समुद्राच्या लाटांना जाऊन भिडणारा कातळाचा कडा.. हे सगळं मनसोक्त अनुभवायचं म्हणजे किमान ४-५ तास तरी हवेतच.. बुधलला आलो तेव्हा या सगळ्याचा आनंद घेतलाच.. फक्त गावाच्या दक्षिणेला असलेल्या डोंगरावरील दुर्गा देवीचे दर्शन घेतले नव्हते.. याखेपेला मात्र दुर्गेचा डोंगर चढून जायचंच असं ठरवलं होतं.


अगदी समुद्राला जाऊन भिडलेल्या डोंगररांगा हे कोकण किनाऱ्याचे, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.. इथं केवळ समुद्रकिनारेच नाहीत तर सागराला कवेत घेणारे कातळसडे सुद्धा आहेत.. कशेळी, आंबोळगड, अंजनवेल कातळवाडी आणि बुधलचा हा डोंगर.. सुमारे ३०० फूट उंच असलेली ही टेकडी कदाचित किनाऱ्यालगतचे सर्वात उंच ठिकाण असेल असं मला वाटतं. नारळी पौर्णिमेच्या नंतरची सकाळ.. देवीचा उत्सव असतो तो दिवस.. सकाळी लवकर पायऱ्या चढायला लागलो तेव्हा फारसे लोक तिथं पोहोचले नव्हते.. पहिले सव्वाशे फूट पायऱ्यांची वाट आहे ती चढून डोंगराच्या माथ्याजवळ पोहोचलो.

पायवाटेने पुढे १० मिनिटे चालत गेलो आणि देवळापाशी पोहोचलो.. या वाटेवरून ट्रॅक्टर सुद्धा वरपर्यंत येतो त्यामुळे चुकण्याची शक्यता नाहीच.. थोडंसं थांबून जरी चढलं तरीही साधारण १५ ते २० मिनिटांत देवळाच्या परिसरात पोहोचता येतं.. थोडं दमायला होतं खरं पण वर पोहोचलं की दिसणारे दृश्य सगळा थकवा क्षणार्धात घालवणारे असते.. थंडगार वारा वाहत असतो.. हातपाय धुवून घोटभर पाणी प्यायलं की पुन्हा ताजेतवाने झालेले असतो.


दुर्गादेवीला नमस्कार केला आणि पश्चिमेकडील अथांग सागरनिळाई अनुभवत बसलो.. गावातून वर आलेल्या मंडळींची उत्सवाच्या तयारीची लगबग सुरु होती. एका आजींनी अगत्याने मला चहा आणून दिला. तिथं जमलेली मंडळी मंदिर सजवत होती..गावातील एका नवविवाहित जोडप्याने दुर्गादेवीची पूजा केली.. हारांचा साज चढवला, दिवे लागले.. उदबत्तीचा मंद सुगंध दरवळायला लागला.. पुन्हा एकदा दुर्गादेवी समोर नतमस्तक झालो

दरवर्षीची उत्सव परंपरा मध्यंतरी कोविडच्या लाटेमुळे खंडित झाली होती त्यामुळे यावेळेला उत्साह दुप्पट होता.. अनिल दादा, दत्ता भाऊ वगैरे मंडळींनी अगत्याने पाहुणचार केला.. प्रसादाचे जेवण तयार व्हायला अजून वेळ होता आणि मला शूट साठी वेळणेश्वर गाठायचे होते.. त्यामुळे बुंदीच्या लाडवांचा रुचकर नैवेद्य त्यांनी दाखवला आणि मला लाडू बांधून दिले..

सूर्य आता बराच वर आला होता तरीही किनाऱ्यावरचे कातळ अजूनही डोंगराच्या छायेतच होते.. गडद निळ्या समुद्राच्या सोबतीला टेकाडावर उगवलेले गवत पावसाळ्याच्या कृपेने हिरवेगार झाले होते.. इथं मागच्या बाजूनेही गावातून टेकडी चढता येते पण या वाटेने माहितगार व्यक्ती सोबत असल्याशिवाय येऊ नये. लाटांच्या ऊर्जेने वीजनिर्मिती करण्याचा प्रयोग बुधल येथे करण्यात आला त्याच्या टाक्या माथ्यावर दिसत होत्या पण पाण्याखालचे बांधकाम कदाचित व्यवस्थित न झाल्याने हा प्रयोग यशस्वी झाला नाही असे स्थानिकांनी सांगितले.

मंदिराच्या दक्षिण बाजूला असलेला सडा पुढं करूळ पर्यंत जातो.. या लांबलचक पट्ट्यात मला कुठं वस्ती दिसली नाही.. तिथं नाचणी वगैरे सारखी पिकं होतात असं स्थानिकांनी सांगितलं.. समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याने इथल्या नाचणीला खास स्वाद येतो असं मला गोखलेकाका म्हणाले.

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभि-धीयते। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
देवी म्हणजे चैत्यन्य दायिनी.. इथल्या निसर्ग चेतनेत तिचाच अधिवास जाणवत होता..

गुहागर गावातही दुर्गादेवीचे मंदिर आहे.. ते गजबजलेले देवस्थान.. कोकणस्थ ब्राम्हण मंडळींची कुलदेवता श्री योगेश्वरी अंबेजोगाईची.. परंतु ते दुर्गादेवीचेच रूप असल्याने दुर्गापूजन तितकेच महत्वाचे मानले जाते. हर्णे-मुरूडचे आणि आंजर्ल्याचे दुर्गा मंदिरही सुंदर आहे.. लाकडी बांधकाम आणि कौलारू छत.. पण बुधलच्या दुर्गादेवी चा परिसर वेगळी अनुभूती देणारा.. निसर्गसंपन्न आविष्कारातून आध्यात्मिक अनुभव देणारा..

इथून पुढं दक्षिणेला वेळणेश्वर हेदवी नरवण तवसाळ मार्गे जयगड आणि पुढं गणपतीपुळे.. या संपूर्ण टप्प्यात अनेक सुंदर मंदिरे आहेत.. सागरतीरावर स्थानापन्न झालेला वेळणेश्वर.. हेदवीचा दशभुज गणपती.. नरवण ची व्याघ्राम्बरी देवी.. ही सगळीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.. आणि दर्या फिरस्तीच्या प्रवासात आपण या सगळ्या जागांना भेट देणार आहोत..
Wah, khoop sunder varnan. Kokan cha nisarga chan rangawlat
खुप छांन ठिकाण आहेत कोकणातील, कोकण म्हणजे देवांनी मानसाला दिलेली अनमोल भेट आहे.