Darya Firasti

नानवेल ची बत्ती

मुरुड-जंजिरा आणि दिवेआगर ही उत्तर कोकणातील दोन अतिशय लोकप्रिय ठिकाणे.. त्या दोहोंच्या मध्ये आहे मांदाडची खाडी आणि आता मोठ्या प्रमाणात विकसित करण्यात येत असलेलं दिघी बंदर. कॉलेजमध्ये असताना मी बजाज एम८० ही मोपेड वापरत असे. विलेपार्ले ते चेंबूर असा रोजचा प्रवास माझ्या मोपेडवर पार पडायचा. जेव्हा मला माझी मोपेड मुंबई बाहेर घेऊन जाऊ शकू हा आत्मविश्वास आला तेव्हा मी पनवेल-पेण-अलिबाग मार्गे मुरुड जंजिऱ्याला माझी मोपेड घेऊन गेलो होतो.. नंतर ताम्हिणी घाटातून पुणे मुरुड, परत येताना नागोठणे खोपोली पुणे असा मोपेड प्रवास झाला.. या साधारणपणे २००२-२००५ च्या आठवणी आहेत.

मुरुड जंजिऱ्याच्या किनाऱ्यावर असलेल्या गोल्डन स्वान रिझॉर्ट ला आम्ही कॉलेजच्या ट्रिप साठी राहिलो होतो.. तेव्हा रात्रभर समुद्रकिनाऱ्यावरच गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळेला क्षितिजावर एका डोंगराच्या माथ्यावर असलेल्या दीपगृहातून येणारा झोत पाहिला होता.. नानवेल च्या बत्तीशी झालेली ही माझी ओळख. त्यावेळी कॅमेरा ट्रायपॉड वर लावून काढलेला एक धुरकट फोटो अजूनही माझ्याकडे आहे. फोटो यथातथाच आहे.. पण त्या क्षणाची आठवण कैद झाली आहे इतकंच.. त्याच वेळेला दुसऱ्या टोकाला असलेला सिद्दीचा राजवाडाही टिपला होता.. आणि सकाळी तेच ठिकाण खुणावताना दिसलं होतं

तेव्हापासून नक्की केलं होतं की एक दिवस हे दीपगृह पाहायला जायचंच.. त्यानंतर दर्या फिरस्तीच्या निमित्ताने कोकणात अनेक फेऱ्या झाल्या.. पण इथं पोहोचायला २०२२ उजाडावं लागलं. याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी सहज जाता येत नाही. दिघीहून समुद्रमार्गे सर्वे-आदगाव-वेळास आगर रस्त्याने दिवेआगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर सर्वेच्या अलीकडेच नानवली-मणेरी गाव लागते .. कोणी नानवेल म्हणते तर कोणी नानवली.. तिथून २किमी किंवा पाऊण तासाची पायपीट करून आपण लाईटहाऊसच्या डोंगरावर पोहोचू शकतो. २०१९ ला मी हा प्रयत्न केला होता पण रानात वाट हरवलो आणि संध्याकाळ होऊ लागल्याने परतलो होतो. नंतर लक्षात आलं की तिथं जाण्यासाठी गावातून जाण्यापेक्षा पुढच्या फाट्यावरून चांगली पायवाट आहे.. पण दीपगृह पाहण्याची वेळ दुपार नंतरची त्यामुळे मुंबईतून एक दिवसाचा प्लॅन करून येणंही जमेना.. शेवटी तीन डिसेंबर ला योग आला.. हर्षल मराठे या मित्राची सोबतही मिळाली होती.

नानवेल गाव पार करून त्याच डोंगराच्या पठारावर पुढं गेलं की दक्षिण पूर्वेला सिद्दीचा बलाढ्य जलदुर्ग असलेल्या जंजिऱ्याचे दर्शन होते.. मांदाड ची खाडी बरीच रुंद आहे.. दिघी बंदरापासून जंजिऱ्याचे बेत ७-८ किमी तरी दूर असावे.. मागे मुरुडच्या परिसरातील डोंगरही दिसतात.. इथून दीपगृहाकडं टेकडी उतरून जाता येत असले तरीही तो सोयीचा रस्ता नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

इथं कॅक्ट्स च्या रानातून वाट काढत टेकाडाच्या पश्चिम टोकाला पोहोचले की तिथून समोरच्या टेकडीवरील दीपगृह आणि मागे चमचमणारा अथांग समुद्र असं विलोभनीय दृश्य दिसतं. दुपारची वेळ असेल तर सूर्यनारायण मावळतीला कललेला असतो आणि चंदेरी पाणी आकाशाच्या निळाईत कुठं मिसळून जातं ते समजत नाही. दीपगृह पाहण्याची वेळ संध्याकाळी ४-५ आहे असं आम्हाला कळलं. तिथं सध्या इंद्रकुमार नावाचे कर्मचारी तैनात आहेत आणि दर्या फिरस्ती – चिन्मय भावे असा संदर्भ देऊन आपण त्यांना कॉल करून पाहू शकता जाण्यापूर्वी त्यांचा संपर्क क्रमांक +९१ ८१२८४ ४७५८१ असा आहे. अशा एकलकोंडया ठिकाणी २-३ वर्षे ड्युटी करायची म्हणजे आव्हानच म्हंटले पाहिजे.. परंतु जलवाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने दीपगृह चालवणे अत्यावश्यक आहे. २०१९ च्या सुमारास हे दीपगृह बंद होते त्यामुळे मच्छिमार बोटी भरकटत असत अशा बातम्या वृत्तपत्रांत वाचल्याचे आठवते.

मी, माझी बायको मानसी, आमची मैत्रीण मानसी सोमण मराठे, तिचा नवरा हर्षल आणि त्यांची दोन गोंडस जुळी मुले आशुतोष आणि अंशुमान असे दिवेआगर सहल करून आलो. त्या सहलीचा दुसरा दिवस नानवेल च्या बत्ती साठी राखीव होता. अरविंद केळकरांच्याकडे शाकाहारी थाळी खाऊन आणि शाही मोदक चापून जरा आळसावलोच होतो पण दुपारी तीन च्या सुमारास हर्षल आणि मी नानवेल च्या दिशेने निघालो. जिथं गाडी पार्क करून चालत जावे लागते तिथंच रस्त्याच्या बाजूला ऐसपैस जागा असल्याने कार पार्क केली आणि पायवाटेने टेकडी उतरून समुद्राच्या दिशेने निघालो.

साधारण २.१७ किमी अंतर ४० मिनिटांत पार करून दीपगृह गाठले. शेवटचा थोडासा भाग तीव्र चढाचा असल्याने टेकाडाला वळसा घालून रुंद वाटेने लाईटहाऊस गाठले.. पण परत येताना मात्र तीव्र उताराच्या शॉर्ट कटने परत आलो.. जरी उतार जास्त असला तरीही पाऊलवाट अरुंद नाही.. तीन फूट रुंद आहे आणि समुद्राच्या बाजूला दगडाच्या नैसर्गिक कठड्याचे संरक्षण आहे त्यामुळे या मार्गाने जायला काहीच हरकत नाही

पायवाटेने निघाल्यानंतर एक घर आणि त्याचे कुंपण दिसते.. त्याला वळसा घालून पुढं जायचं.. एका ठिकाणी डावीकडे रुंद रस्ता फुटतो पण तिथं न वळता टेकडीवरून खाली उतरणारी वाट धरून ओढ्यापर्यंत उतरायचे.. ओढा पार केला की आपण डावीकडे वळतो.. उजवीकडे शेतांच्या दिशेने जाणाऱ्या पायवाटांकडं दुर्लक्ष करत समुद्राच्या दिशेने पुढं जायचं आणि मग एका पडलेल्या खोपटानंतर उजवीकडे वळायचं.. हा रस्ता एका खडकाळ किनाऱ्यापाशी येतो.. तिथून गवताळ पायवाटेने पुढं जात राहायचं.. इथवर दोनचाकी गाड्या येऊ शकतात (खूप खडकाळ आणि तीव्र उताराचा रस्ता आहे त्यामुळे पुरेसे कौशल्य असल्याशिवाय हा प्रयत्न करू नये) आम्ही गेलो तेव्हा आम्हाला मासेमारी साठी आलेली काही मंडळी इथं भेटली

तिथं खाली उतरून जाण्याइतका वेळ आमच्याकडं नव्हता त्यामुळे आम्ही दीपगृहाच्या दिशेने पुढं जात राहिलो. लोखंडी दारे उघडून आवारात पोहोचलो आणि मग तिथले कर्मचारी श्री इंद्र कुमार आम्हाला दीपगृहात घेऊन गेले. लाईट हाऊसची उंची समुद्र सपाटी पासून सुमारे ६६ मीटर किंवा २१६ फूट इतकी आहे. हे दीपगृह प्रथम १८६४ साली बांधले गेले आणि त्यानंतर १८९५, १९३०, १९९४, १९९६, १९९९ आणि २००६ साली त्याची दुरुस्ती करण्यात आली.

लाल पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेल्या या दगडी दीपगृहावर १५० वॅट चा दिवा आहे. दर पंधरा सेकंदाला पांढऱ्या रंगाचे तीन झोत लगोलग मारणारा पॅटर्न इथं वापरला जातो. प्रत्येक दीपगृहाचा आपला स्वतःचा वेगळा असा पॅटर्न असतो.. दीपगृहाची रंगरंगोटी वेगळी असते त्यामुळे दिवसाही स्थान निश्चिती करायला कोणतीही अडचण येत नाही. पश्चिम दिशेला पाण्यात खडक आहेत, तिथं बोटी आदळून फुटण्याचा धोका असल्याने एक वेगळी लाल रंगाची बीकन इथं लावण्यात आली आहे जिच्या प्रकाश झोतात खडकांची जागा बोट चालकांना कळते.

दीपगृहाच्या माथ्यावरून दिसणारे दृश्य आठवणीत साठवून ठेवावे असे असते. पश्चिमेकडे अथांग समुद्र आणि नारिंगी छटांनी सजलेलं पाणी.. पूर्वेकडे नानवलीची टेकडी आणि दक्षिणेला दिवेआगरच्या दिशेने जाणारा समुद्र किनारा. तिथं लाल माकडांच्या मोठ्या टोळ्या मला दिसल्या त्यामुळे सामान जरा सांभाळून राहिलेलेच बरे अशा ठिकाणी.

दीपगृहाची टेकडी उतरून समुद्राजवळ आलो तेव्हा सूर्यास्ताला काही मिनिटे शिल्लक होती.. समुद्राला ओहोटी लागलेली असल्याने खडकाळ किनाऱ्यावर लाटा अगदी अलगद येत होत्या.. त्यांच्या मंजुळ आवाजाच्या तालावर सूर्याचे निरोप घेणे अनुभवत आम्ही तिथं थांबलो.. सुदैवाने क्षितिजापाशी ढगांची गर्दी नसल्याने सूर्यास्ताचा विलक्षण अनुभव आम्हाला घेता आला.

संध्याकाळचे ६ वाजून गेले होते.. आम्हाला रस्त्याकडं नेणारी टेकडी चढून परत गाडी गाठायची होती.. पण सूर्यास्त झाला तरीही काही वेळ तांबड्या नारिंगी रंगांची आकाशातील उधळण पाहत आम्ही रेंगाळलो होतो. अजूनही पूर्ण अंधार झाला नव्हता.. संधी प्रकाशाच्या विविध छटा आकाश सजवीत होत्या… आसमंतात अंधार डोकावायला लागला आणि दीपगृहाच्या पांढऱ्या झोताचा प्रकाश त्याच्या नियमाप्रमाणे दर १५ सेकंदाला तीनदा लख्ख उजळू लागला. रायगड जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये मला मणेरी गावाबद्दल रोचक माहिती मिळाली. शिलाहार राजा मुम्मुणि यांच्याकाळातील दोन ताम्रपटांच्या आधारे मणेरी गाव म्हणजे मंदरज प्रदेश असावा असा कयास संशोधक मांडतात. इतिहासकार वा. वि. मिराशी यांचे तसे आकलन आहे. संवत ९७१ विरोधी संवत्सर, भाद्रपद पौर्णिमेस चंद्रग्रहण असा उल्लेख असल्याने ताम्रपटाची तारीख संशोधक मंगळवार १५ ऑगस्ट १०४९ अशी नक्की करतात. मुम्मुणिराजा कडून १२ गावे ब्राह्मण कुटुंबांना दान करण्यात आली असा आशय ताम्रपटावरील लेखात आहे. दान स्वीकारणारे ब्राह्मण आणि त्यांच्या पित्याची नावे ताम्रपटावर कोरलेली आहेत.. त्यांची मूळ गावेही आहेत, गौड, मध्यदेश, भृगूकच्छ, लाट देश अशी विविध नावे आपण वाचतो तेव्हा लक्षात येते की हे ठिकाण भारतातील विविध ठिकाणांशी संलग्न असावे. भ्रमंती करत असताना त्या त्या ठिकाणच्या इतिहासाची माहिती जर आपण मूळ कागदपत्रांच्या आधारे घेतली तर अधिक डोळसपणे प्रवास होतो असे मला तरी वाटते. दर्या फिरस्ती प्रकल्पात आपण कोकणातील सर्वच दीपगृहांची माहिती घेणार आहोत.. खान्देरी, कोर्लई, आंजर्ले, टाळकेश्वर, जयगड, रत्नागिरी, देवगड, वेंगुर्ला अशी कैक दीपगृहे आपण पाहणार आहोत.. तेव्हा या ब्लॉग साईटला भेट देत राहा आणि तुमच्या कोकणवेड्या मित्रांना, स्नेह्यांनाही सांगा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: