
रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील स्वप्नवत भासणारे हे गाव.. बुधल .. कोणे एके काळी बुद्धीलदुर्ग म्हणून प्रसिद्ध असलेलं हे गाव.. समुद्रालगतच असलेल्या डोंगरावर स्थानापन्न झालेल्या दुर्गादेवीच्या आशीर्वादाने सुजल सुफल झालेलं हे गाव.. पर्यटनासाठी अगदी आदर्श .. पण अजून तरी पर्यटनाच्या नकाशावर तितकंसं प्रसिद्ध न झालेलं हे गाव.. समुद्राला उधाण आलं की खळाळणाऱ्या लाटा गर्जना करत किनाऱ्याकडे येतात आणि सड्याला आलिंगन देतात. इथं सगळ्यात प्रथम मी २०१३ साली गेलो.. त्यानंतर दोनतीनदा इथं जाणं झालं.. पण आज ८ वर्षांनी इथं खूप काही बदललं आहे असं नाही.. गावाकडं येणारा रस्ता बहुतेक पूर्वी अगदीच कच्चा होता.. आता तिथं डांबरी सडक आहे आणि मोबाईलचं नेटवर्क व्यवस्थित यायला लागलं आहे हाच काय तो बदल.. पण गावकरी तसेच साधे आणि आपुलकीने चौकशी करणारे.. किनारा अजूनही स्वच्छ आणि अस्पर्श.. कोळी बांधवांनी नांगरून ठेवलेल्या बोटींची रांगही अगदी तशीच आणि त्यांच्या मागे उभे असलेलं बाओबाब चं लठ्ठ झाडं सुद्धा तसंच..

गाव तसं छोटंसंच .. एका बाजूला दुर्गादेवीचा डोंगर … तर दुसऱ्या बाजूला सडा … मधल्या उतारावर कोळी समाजाची शंभर दीडशे घरं अन स्वच्छ शुभ्र वाळू असलेला छोटासाच सागरतीर.. पण फोटो काढायला इथं फक्त निसर्गचित्रेच आहेत असं नाही.. समुद्राच्या काठावर मानवी चैतन्याचं अस्तित्व असलेलं हे गाव म्हणजे स्ट्रीट फोटोग्राफीसाठी पर्वणीच.. मित्रवर्य अभय कानविंदे यांनी इथं खूप सुंदर फ्रेम्स टिपल्या होत्या.. त्या सुद्धा इथं शेयर करतोय.




घरात पडल्यापडल्या खिडकीतून बाहेर डोकावलं की समोर मुलायम वाळूची पुळण आणि त्यावर ओहोटीच्या लाटांचं रेंगाळणारं पाणी.. आपल्यासाठी हे दृश्य अगदी exotic असलं तरी या मंडळींसाठी हे सगळं अगदी रोजचं आयुष्य आहे. अभय च्या नजरेने या साधेपणातील सौंदर्य अगदी छान टिपलं आहे. (वरच्या गॅलरीतील इमेजेस अभय कानविंदे यांच्या आहेत)
या वर्षी मी बुधलला गेलो तो दिवस कोळी बांधवांसाठी अगदी खास असा नारळी पौर्णिमेचा दिवस.. दिवस मावळतीला आलेला असताना गावातील महिलांनी सागरदेवतेची पूजा बांधली.. प्रत्येक घरातून एक एक पूजेची थाळी फुलांनी नारळांनी दिव्यांनी सजून किनाऱ्यावर आली.. त्या सर्व थाळ्यांना स्वस्तिक रूपात मांडून गावातील स्त्रियांनी समुद्र देवाची मंत्रपठण करून आराधना केली आणि आरत्या सुद्धा म्हंटल्या.. लहानग्या मुली सुद्धा नववधू च्या वेशात नटून सजून सागराला श्रीफळ अर्पण करायला आल्या होत्या.. समुद्राच्या खाऱ्या वासात उदबत्तीचा घमघमाट दरवळायला लागला..

स्वच्छ शुभ्र पुळणीवर परतणाऱ्या लाटांचे तरंग उमटत होते.. किनाऱ्यावरचे माड वाऱ्यावर डोलत होते.. क्षितीजाच्या जवळ समुद्राची निळाई अधिकच गडद होत गेली होती.. उत्तरेकडे निघालेले ढगांचे पुंजके पांढऱ्या करड्या छटांचं वैविध्य दाखवत होते.. कोळी मंडळी होड्या खेचून आणून किनाऱ्यावर पार्क करत होती.. किनाऱ्याला लागून असलेल्या काळ्या टेकाडावर उभं राहून सूर्यास्त पाहायचं मी ठरवलं

पश्चिमेला सूर्यनारायण अस्ताला जात होता तर पूर्वेकडे संध्याछाया पसरू लागल्या होत्या.. किनाऱ्यावर माडांच्या बागेची गडद हिरवळ नितळ धवल वाळूच्या रंगांशी कॉन्ट्रास्ट मांडत होती.. काही वेळापूर्वी सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेला आसमंत आता रात्रीच्या कृष्ण रंगाकडे निघाला होता.. अशा वेळेला कधीकधी मनात उगाचच उदास भाव दाटून येतात.. एकटेपणात खिन्नता नसावी.. स्वतःशी निसर्गाच्या साक्षीने संवाद साधायला मोक्याचे असे हे क्षण असतात..

मार्च २०१३ मध्ये मी इथं भरतीच्या वेळेला समुद्राचे तांडव पाहिले होते.. आज तसं काही दिसलं नाही.. निसर्गभ्रमंतीची हीच तर खरी गंमत आहे.. प्रत्येक मोसमात, प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन गवसतं.. आणि पूर्वी जे गवसलं होतं ते पुन्हा रिटेक म्हणून पाहता येईल अशी खात्री देता येत नाही.. अंधार व्हायच्या आत मला वेळणेश्वर गाठायचे होते.. गोपाळकृष्ण गोखलेंच्या होम स्टे मध्ये आम्ही राहत होतो.. घरचं साधं सकस पण चविष्ट भोजन वाट पाहत होतं.. दुर्गादेवीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतल्याखेरीज बुधलची गोष्ट पूर्ण होणार नाही.. पण उद्या पुन्हा ताजतवानं होऊन सकाळी इथं यावं लागेल.. दुसऱ्या दिवशीचा बेत नक्की केला आणि मी वेळणेश्वराच्या दिशेने निघालो.