
चौल रेवदंडा परिसरात पर्यटनाला येणाऱ्या मंडळींचे लक्ष जास्त करून समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने असलेल्या भागांमध्ये असते पण चौल वावे बायपास रस्त्याने निघाले की आपण आग्राव आणि भोवाळे परिसरातील अनेक ठिकाणे पाहू शकतो. हिंगुळजा माता, दत्त मंदिर, सराई गावातील कलावंतिणीचा वाडा अशा अनेक जागा आहेत. अष्टागाराचा इतिहास आणि सरखेल कान्होजी आंग्रेंच्या घराण्याचा इतिहास एकमेकांशी गेली ३०० वर्षे तरी जोडला गेलेला आहे. या भागातील एकविरा भगवतीचे मंदिर ही अशीच एक महत्वाची जागा

पूर्वाभिमुख असलेल्या एकविरा भगवती आईचे हे देऊळ लाकडी बांधकाम आणि कौलारू छप्पराने साकारलेले आहे. 5 लाकडी खांबांच्या रांगांवर उभा असलेला सभामंडप आणि नगारखान्याला लाभलेले किल्ल्यासारखे रुपडे हे याचे वैशिष्ट्य. आंगरे घराण्याच्या उत्तर काळात ज्या यादवी आणि रक्तपात झाला तेव्हा या देवळाचा वापर किल्ल्यासारखा केला गेला असे दिसते. जयसिंगराव आंगरे आणि मानाजी आंगरे यांच्यात 1796 साली झालेल्या लढाया या परिसरात झाल्या व त्यात जयसिंगरावांचा विजय झालेला दिसतो.

मंदिराचे यजमानपद पूर्वी नित्सुरे व मोदगी कुटुंबांकडे होते तर पुराणिक पद जोशी मंडळींना लाभले अशी नोंद आवळस्करांच्या आंग्रेकालीन अष्टागर ग्रंथात दिसते. 1752 साली या शिवकालीन देवळाचा जीर्णोद्धार झाला आणि त्यांनंतर आज दिसणारे बांधकाम 1852 साली रामजी वल्लद मल्हार प्रभू कुलकर्णी यांनी केल्याचे दिसते. देवीच्या शांत-प्रसन्न मुद्रेला उत्सव काळात सुंदर मुखवट्याने सजवले जाते. गुगल मॅप्स वर श्री भार्गव पाटील यांनी अपलोड केलेला एक सुंदर फोटो मला सापडला.

लाकडी खांबांचे बांधकाम व आजच्या काळातील उत्सवात त्याला लाभलेली पताकांची जोड हे दृश्य कोकणात अनेक मंदिरांमध्ये पाहायला मिळते. देवळासमोर असलेली दीपमाळ, पुष्करिणी आणीन सभोवताली असलेल्या नारळ सुपारीच्या बागा असा इथला कोकणी आसमंत. एरवी रिकामा आणि शांत परंतु उत्सव असला की चैतन्याने आणि उत्साहाने भारून टाकणारा .. हिंदू धर्मात शैव, वैष्णव, शाक्त असे विविध पंथ आहेत खरे.. पण कोकणात मात्र मुख्य देवतेच्या जोडीला इतर देवता पंचायतन स्वरूपात तरी असतात किंवा गर्भगृहाजवळ त्यांना पूजास्थान लाभलेले असते. इथंही श्री विष्णू आणि गणेश आहेतच.



देवीचे दर्शन घेण्यासाठी एक कुटुंब आले होते.. दोन तीन पिढ्या एकत्र पाहून छानच वाटले. मंडळींनी साग्रसंगीत पूजा केली आणि मग आरती सुरु झाली. कोकणातील दर्यावर्दी शूर वीरांच्या या आराध्य देवीच्या पूजेत मी सुद्धा सामावून सामावून गेलो होतो हे मला कळलेही नाही.
भगवती एकविरा, देवी देई मजवरा,
शरणे मी तुजला गे देई दर्शन पामरा
चौलग्रामी वास तुझा, भक्त दर्याकिनारी
कूर्म दृष्टीने पाहून, सांभाळीसी लवलाही
अश्विन शुद्धपक्षी, नवरात्री उत्सव होई
भक्तगण मेळताती, पालखी ती मिरविती
दर्यावरचे शूरवीर, तुझ्या पायीचे चाकर
तवकृपा त्यांसि तारी, त्यांना एकचि आधार
हस्त नक्षत्राचा वारा, उठे जीवा नाही थारा
क्षण तुज आठविता त्यांसी तारिसी तू माता
तव पूजनी जे रमती, मनोभावे स्मरुनी जाती
तया संकटाचे वेळी, कडाडून प्रकट होसी
शांत तृप्त होई, सेवा मान्य करी आई
अभयाचा देई वरा, ठेवितो चरणीं मी शिरा