
चौल नाक्याहून दोन अडीच किमी अंतरावर भोवाळे तलावापाशी डोंगर आहे. फूट उंचीच्या या डोंगरावर उत्तर बाजूला दत्ताचे मंदिर आहे तर दक्षिणेच्या खांद्यावर हिंगुलजा मातेचे देऊळ आहे. सुमारे साडेसातशे पायऱ्या चढून आपण जाऊ शकतो किंवा गाडी रस्ता आपल्याला स्वामी समर्थांच्या मठापाशी नेतो. तिथून सुमारे २०० पायऱ्यांची चढण आहे. ती चढायला सुरुवात केली की अतिशय सुबक असे तुळशी वृंदावन आपले लक्ष वेधून घेते.

1810 साली इथं एक दत्त भक्त गोसावी पादुका घेऊन आला आणि त्यांचे पूजन सुरु झाले. 1831 साली इथं एक दगडी दीपमाळ बांधली गेली आणि नंतर श्री गोविंद वाडकर नामक गृहस्थाने इथं दगडी प्रदक्षिणा तसेच मंदिरावर कळस मार्ग बांधला. वर पोहोचल्यानंतर मी रामाच्या देवळात जाऊन नमस्कार केला. वातावरणात अजूनही छानसा थंडावा होता. राम, लक्ष्मण आणि सीतेच्या सुबक मूर्ती, सोबतीला महादेवाची पिंडी आणि गणपती बाप्पा आणि रामासमोर लीन झालेला हनुमान असे इथले दृश्य होते.

१८४३ ते १८५२ या काळात इथं गणेशभट गुजराथी प्रभासकर यांनी मंडप आणि घर बांधून घेतले तर इथं चढून येणे कठीण असल्याने नारायण रामचंद्र खात्री यांनी १८५७ साली ७५०-८०० पायऱ्यांचा मार्ग बांधून घेतला. पाषाणात घडवलेली त्रिमुखी दत्ताची सहा हात असलेली सुंदर मूर्ती आपण इथं पाहू शकतो. तिथेच बाजूला सुबक अशा पादुका असून मूर्तीच्या मागे चांदीचे कोंदण आहे.

पाठारे क्षत्रिय पांचकळशी समाजासाठी हे महत्वाचे ठिकाण असून इथं दत्त जयंतीचा उत्सवही मोठ्या जोमाने साजरा होतो, यात्राही निघते. थेरोंदा येथे असलेला चांदीचा मुखवटा आणून यावेळी दत्त प्रतिमा सजवली जाते. या डोंगराच्या दक्षिण खांद्यावर उतरले की आपण चौल लेणी आणि हिंगुलजा माता मंदिर परिसरात येतो. इथं जवळपास एकविरा भगवती मंदिर, शितळादेवी, सोमेश्वर, कलावंतिणीचा वाडा, राजकोटाचे अवशेष अशी अनेक ठिकाणे पाहण्याजोगी आहेत.. मात्र यासाठी कुतूहल आणि वेळ हवा. इस्लामी बांधकामांमध्ये इथं आग्राव च्या दिशेने हमामखाना व आसा मशीद पाहता येते.