Darya Firasti

देवगड तालुक्यातील 16 समुद्रकिनारे

देवगड तालुक्याच्या दक्षिण टोकाला आहे आडबंदर खाडी आणि तिच्या आसपास असलेले प्रचंड असे कांदळवन. कधीतरी इथं बोट सफारीला जायचं आहे. थोडं उत्तरेकडे आलं मी मुणगे समुद्रकिनारा लागतो. हमरस्त्यापासून एक गाडीवाट आपल्याला इथं घेऊन येते… किनारा प्रशस्त असला तरीही विशेष गर्दी नाही आणि भेळेच्या गाड्याही नाहीत त्यामुळे काही शांत क्षण इथं अनुभवता येतात.

तांबळडेग … कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक.. एखाद्या सोनसळी सकाळी या स्वच्छ किनाऱ्यावर चालता चालता रोजच्या आयुष्यातील कटकटींपासून मनाला काही क्षण का होईना सुटका मिळते.. स्वच्छ पांढऱ्या वाळूची मखमली दुलई आणि गडद निळ्या रंगाचं पाणी.. गर्दी नाही.. गोंधळ नाही.. सख्या सागराशी मनसोक्त गप्पा मारता येतील असं हे ठिकाण..

किनाऱ्याला भेटायला येणाऱ्या फेसाळत्या लाटांचा आवेग पाहून मंत्रमुग्ध व्हायला होतं .. अथांग निळाईच्या सोबतीला असलेली पांढरी शुभ्र वाळू सकाळच्या नारिंगी किरणांच्या साजाने नटलेली असते.. किनाऱ्यावर पडलेल्या फिकट सावल्या भरतीच्या लाटांची चादर पांघरत असतात.. समुद्र वेडा माणूस इथं भान हरपून तासंतास बसू शकेल..  वाळूची ही दांडी तीन साडेतीन किलोमीटर लांब आहे..  किनाऱ्याच्या दक्षिण टोकाला आहे नारिंग्रे नदीचे मुख.. आणि पलीकडे मोरवे ची पुळण.. भरती टिपेकडे पोहोचू लागते आणि लाटांचा अवखळ दंगा वाढायला लागतो.. 


तांबळडेग च्या दुसऱ्या टोकाला आहे मिठबाव.. गजबा देवीच्या आशीर्वादाने पावन झालेला सागरतीर.. इथं संध्याकाळच्या वेळेला मंदिरापाशी जाऊन बसायचं आणि खळाळत्या लाटांचं किनाऱ्याला जाऊन भिडणं पाहत बसायचं.. मावळतीच्या वेळेला दगडांवर गर्जत वर्षत आदळणाऱ्या लाटांनी मांडलेला गोंधळ ऐकायचा.. 

ओहोटीच्या लाटांचा विलंबित ताल आणि लपंडाव खेळणारं चंदेरी प्रतिबिंब एकीकडे चैतन्यपूर्ण समुद्र तर दुसऱ्या बाजूला नारिंग्रे नदीचं शांत गंभीर पात्र या दोहोंच्या मध्ये निवांत मिठबांव आपलं स्वागत करायला सदैव तयार असतं  सागराचा आलाप ऐकता ऐकता चालत चालत आपण मिठबावच्या उत्तर टोकाला पोहोचतो.. गजबा देवीला नमन करून पुढच्या फिरस्तीसाठी निघतो.. 

कोकण आणि शिव तत्त्वाचं एक खास नातं आहे.. इथल्या प्रत्येक शिवालयाचे एक आगळं सौंदर्य आहे.. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर म्हणजे समुद्र किनाऱ्यावरच अनेक शतके उभे असलेले शिवाचे लाडके स्थान.. आज इथं दिसणारं देऊळ जरी मध्ययुगीन असलं तरीही या ठिकाणाला खूप प्राचीन इतिहास आहे..कधीकधी किनाऱ्यावर कोळी बांधव रापणाची तयारी करताना दिसतात.. रात्री मासेमारी करून परतलेल्या होड्या नांगरलेल्या दिसतात.. समुद्राच्या या रूपावर शिव कैलासा इतकाच भाळला असावा .. इथल्या खडकांवर कोरलेली शिवलिंगे पूर्ण किनाऱ्यालाच देवत्व बहाल करतात.. ओहोटीच्या वेळेला ही खडकांमध्ये कोरलेली शिवलिंगे आपण पाहू शकतो. लाटांचा या शिवलिंगांवर अभिषेक अव्याहत सुरु असतो.

 इथं जवळच असलेल्या गुहेतील या दगडी प्रतिमा कैक वर्षे इथं एकांतात जगत आहेत. हे ठिकाण चालुक्य कालीन आहे असं इतिहासकार मानतात.. आपल्या देवांचा मूर्ती भंजकांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी भक्तांनी त्यांना या सुरक्षित स्थळी आणून प्रतिष्ठापना केली.. 

कुणकेश्वर मंदिरापासून उत्तरेकडे आपण समुद्रकिनाऱ्याला समांतर जाणाऱ्या रस्त्याने देवगडच्या दिशेने निघतो.. कुणकेश्वर डोंगराचा उतार संपला की डाव्या बाजूला एक स्वच्छ पुळण आपले लक्ष वेधून घेते.. रस्त्याच्या उजव्या बाजूला सुरुच्या गर्द बन दिसते.. त्या बनातूनच हा रस्ता पुढं जातो.. सकाळच्या वेळेला पूर्वेकडून वर येणाऱ्या सूर्याची किरणे या बनातून झिरपत असतात.. वाळूत ऊन सावलीची नक्षी रेखत असतात..

आसमंत जर धुक्याने भरलेले नसेल तर विविध रंगांची उधळण इथं आपण पाहू शकतो.. वाळू अगदी पांढरी शुभ्र नसून थोडीशी कॅरॅमल रंगाची आठवण करून देणाऱ्या छटेने नटलेली आहे.. समुद्राच्या पाण्याचा रंग कसा वर्णावा? निळ्या हिरव्या रंगाच्या हजारो गडद फिकट छटा आणि फेसाळलेल्या लाटांच्या सफेदीची किनार.. आणि त्या रंगांना बदलत जाणारी लाटांची आवर्तने.. अशा ठिकाणी अनवाणी चालता चालता मखमली वाळूची ऊब आणि थंडगार पाण्याचा निववणारा स्पर्श अनुभवत तासभर कसा जातो कळतही नाही.. किनाऱ्याच्या उत्तर टोकाला देवगडचा डोंगर आणि त्यावर बांधलेल्या पवनचक्क्या आपल्याला खुणावत असतात.

मिठमुंबरी किनाऱ्याच्या सोबतीला आता नवनवीन रिझॉर्टस येऊ घातली आहेत त्यामुळे इथली शांतता कितपत शाबूत राहील कल्पना नाही.. पण स्थानिकांना रोजगार आणि अतिरिक्त उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने पर्यटन वाढणेही महत्वाचे आहे हे नाकारता येत नाही.. दोन्हीचा समतोल साधून इथल्या नीरव निवांत वातावरणाला गालबोट लागणार नाही असे जबाबदार आणि डोळस पर्यटन वाढेल अशी आशा करूयात. मिठमुंबरी ची खाडी ओलांडली की देवगडच्या दिशेने रस्ता वर चढतो.. पण इथं डावीकडे जाणाऱ्या रस्त्याने आपल्याला अजून एक सुंदर समुद्र किनारा पाहायला जायचं आहे.

हा किनारा आहे तारामुंबरी चा. रस्ता जिथं संपतो तिथं हल्लीच एक मत्स्यालय झाले आहे. पुढच्या वेळेला ते पाहायला हवं. किनारा अगदी छोटासाच आहे. खाडीच्या टोकाला काहीसा खडकाळ.. मागे नारळाची बाग आहे.

निवांत आणि निर्मनुष्य असे किनारे पाहून झाल्यावर आता आपण कोकणी लगबग आणि चैतन्याने भारलेल्या देवगड नगरात आलो आहोत. देवगड हापूस ही या नगराची ओळख. निसर्गाची श्रीमंती आणि सोबत आवश्यक त्या शहरी सुखसोयी अशा दोन्ही गुणांनी युक्त असे हे ठिकाण. पवनचक्कीच्या सड्यावर चारू सोमणांच्या गॅलॅक्सी रिझॉर्ट मध्ये राहिलो होतो तेव्हा त्यांचे अगत्य आणि आपुलकी अनुभवली होती. पुढच्या खेपेला तिथं समोरच असलेल्या वेदा रिझॉर्ट मध्येही आरामदायी आणि रास्त दरात मुक्काम झाला होता.. माझी वीजेवर चालणारी गाडीही चार्ज करता आली होती.

देवगड समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर .. पवनचक्कीचे पठार आणि देवगड किल्ल्याचा डोंगर यांच्या मध्ये सामावलेला हा किनारा. स्थानिक प्रशासनाने इथं सोयी केल्या आहेत. हल्ली इथं झिपलाईन सुद्धा सुरु झाली आहे. गर्दीची वेळ टाळून आलं तर इथेही समुद्राशी गप्पा मारत काही तास मनसोक्त सागरातिथ्य अनुभवता येते.. सागरातिथ्य हा मला इथंच सुचलेला शब्द.. व्याकरण दृष्टीने चूक आहे की बरोबर मला ठाऊक नाही.. पण इथं समुद्रच आदरातिथ्य करतोय असं वाटतं खरं!

देवगड किल्ल्याच्या बुरुजावर बसून पश्चिमेकडे समुद्राची जादू पाहत बसणं हेही खासच. मासेमारी साठी हे महत्वाचं बंदर.. पूर्वी प्रवासी वाहतुकीसाठी सुद्धा प्रसिद्ध होतं. खाडीच्या मुखावर असलेल्या टेकडीवरचा हा दुर्ग इथून होणाऱ्या व्यापारी, नागरी, लष्करी वाहतुकीवर नजर ठेवायला उपयुक्त होता. किल्ल्याचे बुरुज अन खंदक वगळता इथं खूप जुने अवशेष आता शिल्लक नाहीत. देवगडला माझा डॉक्टर मित्र मनोज श्रीरंग होगळे सुद्धा राहतो! दर्या फिरस्तीच्या पोस्ट तो आवर्जून वाचत असतो. आई आणि मी २०२१ साली त्याच्या क्लिनिकमध्ये डोकावलो होतो. पुढच्या वेळेला आडबंदर आणि आचरा लाईटहाऊस ची सफर त्याच्याबरोबर करायची असं ठरलं आहे.

वाडातर ची खाडी ओलांडून आपण विजयदुर्गाच्या दिशेने निघतो. खाडी ओलांडल्यावर विमलेश्वर मंदिर फाट्याहून दोन सुंदर किनारे पाहायला जाता येते. त्यापैकी दक्षिणेकडे असलेला पडवणे-पालये चा किनारा आपण गाडीवाटेने सहज गाठू शकतो. खडकाळ किनाऱ्यावर चालताना अवखळ लाटांशी खेळता येते..

तिथून परत विमलेश्वराच्या दिशेने परत यायचे. थोड्या अलीकडे फणसे गावाला जाणारा रस्ता आहे. गाडी गावातून अगदी खाडीच्या टोकापर्यंत जाते. पण समुद्राकडे जाणारा रस्ता नीट दिसत नाही. सुरूचे बन इतके दाट झुडुपांनी भरलेले आहे की ते पार करून किनाऱ्यावर जाणारी पायवाट सहजासहजी सापडत नाही. पण ओहोटी असताना खाडीचे पात्र जवळजवळ रिकामे होते आणि १५ मिनिटे चालून आपण सहज किनाऱ्यावर पोहोचतो.

सुमारे 20 मिनिटे कांदळवन आणि खाडीच्या ओलसर वाळूतून चालत गेलो आणि इथं पोहोचलो! कोकणातील स्वर्गीय सौंदर्य अनुभवायला थोडीशी वाट वाकडी करावी लागते! अर्थात स्थानिकांना विचारून, भरती ओहोटीच्या वेळा नीट तपासून मगच अशा गोष्टी कराव्यात आणि निसर्गाच्या शिस्तबद्ध वेळेचे भान ठेवावे. सामान भरले, गाडी काढली रिसॉर्ट बुक केलं की सगळीकडं जीवाची प्रति मुंबई करायला धावले म्हणजे पर्यटन सार्थक झाले असे नव्हे. थोडा वेळ, थोडं कुतूहल आणि थोडीशी मेहनत सुद्धा हवी..

इथून पुढं सरळ जायचं.. महादेवश्रम नावाच्या उपहारगृहात मस्त मिसळ किंवा गरमागरम बटाटेवडे खाऊन तृप्त व्हायचं आणि पडेल तिठ्याला डावीकडे वळून विजयदुर्गाचा रस्ता पकडायचा. इथं पुढं हुर्शी च्या उत्तरेला गिर्ये कोठारवाडीचा समुद्र किनारा आहे.

सरखेल कान्होजी आंग्रेंच्या काळात इथं कोठार होते त्यामुळे धान्य किंवा दारुगोळा वगैरे साठवायला किल्लेवजा गढी होती. त्याचे पडझड झालेले बुरुज आणि तोफा इथं पाहता येतात. डाव्या बाजूला खाडी आणि उजव्या बाजूला आमराई यातून वाट काढत आपण किनाऱ्याला लागतो. किनारा तसा छोटासाच पण स्वच्छ आणि सुंदर. स्थानिक प्रशासनाने तिथं बसण्याची आणि गाडी पार्क करण्याची सोय केली आहे. पण दोन्ही वेळेला मी गेलो तेव्हा एखादाच कोणी गावकरी तिथं दिसला. स्थानिक रिक्षावाले सुद्धा पटकन इथं येण्याची वाट सांगू शकले नाहीत.

त्यानंतरचा किनारा आपल्याला शोधावा लागतो. हा आहे कालवशी चा किनारा. इथं गाडी आणता येत नाही. चौंडेश्वरी मंदिरानंतर डावीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने दोन किलोमीटर ची पायपीट करून आपण जांभा खडकातील पायऱ्यांपर्यंत पोहोचतो. तिथून अडीचशे फूट खाली उतरलो की आपण दोन किमी लांब समुद्रकिनाऱ्यावर येतो.

पुढील समुद्रकिनारा आहे तो म्हणजे गिर्ये समुद्रकिनारा .. रामेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला प्रचंड मोठा असा कातळाचा सडा आहे. त्या सड्यावरून किनाऱ्याकडे अनेक कच्चे रस्ते जातात.. त्यापैकी एक बैलगाडीची वाट थेट पुळणीपर्यंत जाऊन पोहोचते. घडीवाडी मार्ग आणि विठ्ठल रखुमाई मंदिर यांच्या मधल्या भागातून हा रस्ता आपल्याला पश्चिमेकडे घेऊन जातो.

इथून घडीवाडी कडे एका टेकाडावरून जाता येते. डोंगराचा उतार जिथं कमी तीव्र आहे असा भाग पकडून वर चढायचे आणि मग अगदी समुद्राला जाऊन भिडलेल्या टेकडीच्या माथ्यावर आपण पोहोचतो. एका बाजूला गिर्येचा किनारा दिसतो तर दुसऱ्या बाजूला घडीवाडीचा विस्तीर्ण तीर. विविध भूगर्भीय अवशेषांनी सजलेल्या या किनाऱ्याचे निरीक्षण म्हणजे एक खास अनुभव असतो.

यानंतरच्या किनाऱ्याचे नाव आहे दामलेमळा. सपाट किनारा आणि त्यावर निवांतपणे वाहणारे पाणी.. एखादा स्थानिक कोळी मासेमारीसाठी आलेला दृष्टीस पडतो.. नाहीतर आपण एकटेच आणि समोर समुद्र देवता. इथं बाजूलाच आशा-रमा निवास नावाचा होम स्टे आहे. मी तिथं राहिलो नाही.. थोडा आडबाजूला असला तरीही लोकेशन अगदी मस्त आहे.

या खडकाळ किनाऱ्याच्या अगदी जवळ म्हणजे सुमारे मीटर पर्यंत गाडी येते. इथूनच पुढं आपण हत्ती महाल बंधारा पाहू शकतो जो शिवकालीन आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याबद्दल अधिक माहिती घेऊन पुन्हा केव्हातरी सविस्तर ब्लॉग लिहीन. आता आपण पाहणार आहोत विजयदुर्ग किल्ल्याचा समुद्रकिनारा.. इथं उभं राहून घेरियाची दक्षिण तटबंदी पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग वैज्ञानिक दृष्टीची महती कळते.

आंगरे घराण्यानंतर आरमारी परंपरेत उदयाला आलेलं महत्वाचं घराणं म्हणजे धुळप घराणं.. त्यांचा वाडा इथेच जवळ आहे. त्या वाड्यात अतिशय सुंदर अशी भित्तिचित्रे आहेत. मी खूप विनंती करूनही ती मला पाहायला मिळाली नाहीत हे दुर्दैव. असा पुरातन ठेवा डॉक्युमेंट न होता नष्ट होऊ नये इतकीच इच्छा. तशीच भित्तिचित्रे गिर्येच्या रामेश्वर देवळाच्या भिंतीवरही आहेत. मंदिर दर्शनाला जाऊ तेव्हा ती पाहू.

देवगड तालुक्याच्या उत्तर टोकाला आता आपण येऊन पोहोचलो आहोत. ब्रिटिश कालीन बांधकामाच्या टोकावरून समोर अथांग अरबी महासागर दिसतोय.. वाघोटण नदी आणि समुद्राचा संगम. माडबन आणि बाकाळेच्या किनाऱ्यांची पांढरी पुळण सुद्धा नजरेस पडते आहे. नदीपलीकडं आहे तो रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका. तिथेही अतिशय सुंदर असे गूढ रम्य किनारे आहेत. त्यांची भ्रमंती पुढल्या वेळेला.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: