Darya Firasti

चंडिका दर्शन दाभोळ

दापोलीहून दाभोळकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंदराकडे जाणारी घाटी उतरण्याआधी डाव्या बाजूला हे ऐतिहासिक मंदिर आहे. स्थानिकांना विचारलं तर ते सांगतात हे पांडवकालीन स्थान आहे.. रत्नागिरी जिल्हा गॅझेटमधील नोंदींप्रमाणे हे चंडिका देवीचे हे स्थान बदामी गुहांना (इसवीसन ५५०-५७८) समकालीन आहे असं स्थानिक बखर सांगते. छत्रपती शिवरायांनी हा प्रदेश १६६०-६१ मध्ये काबीज केला तेव्हा ते इथं आले असं साधने सांगतात. एकसंध खडकातील गुहेत साडेतीन फूट उंचीची काळ्या पाषाणाची शेंदूर लावलेली देवीची मूर्ती इथं आहे. मशालीच्या प्रकाशात देवीचं प्रसन्न रूप पाहून त्या गूढ रम्य वातावरणात हरवून जावं असं वाटतं. तेवत्या दिव्यांच्या प्रकाशात दिसणारी ताजी फुले आणि त्यांचा दरवळणारा सुगंध तिथल्या मांगल्यात भर घालत असतो. स्थानिक इतिहासकार अण्णा शिरगावकरांनी इथं दिसणारी तटबंदी ही दाभोळच्या किल्ल्याचे अवशेष आहेत असं नमूद केलं आहे.

देवीला चार हात असून त्यात तलवार व इतर शस्त्रे आहेत. चांदीच्या पत्र्याने गुहेचे तोंड सुशोभित केलेले आहे… शिवकाळानंतर हे ठिकाण लोक विसरले होते.. जमनापुरी नावाच्या गोरखपंथीय उपासकाला दृष्टांत मिळाला की हे देवीचे ठिकाण विस्मृतीत गेले असून तिथं साधना व्हायला हवी. त्याला अनुसरून शोध घेतला गेला व तिथे पुन्हा पूजा अर्चा साधना सुरु झाली. त्यांनी व पंथातील अजून एका साधकाने तिथं समाधी घेतली. आजही मंदिराची देखभाल पुरी कुटुंबीय करतात.

जमना पुरी यांच्या नंतर बाळ पुरी यांनी इथं पूजा अर्चनेची जबाबदारी घेतली. आज इथं त्यांची ३२वी पिढी कार्यरत आहे. पुरी म्हणजे दशनाम समाजातील गोसावी. भगवान शिवाचे ते कुटुंबीय म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर शिवलिंग घडवले जाते. अशी काही शिवलिंगे इथं दिसतात.

स्थानिकांनी सांगितले की ही देवी शाकाहारी असल्याने इथं मांसाहारी नैवेद्य दाखवला जात नाही किंवा बळी देत नाहीत. नवरात्रीत इथं उत्सव असतो. शिमग्यातही देवीची पालखी निघते.. होलिका दहन देवळाजवळ केले जाते. इथं जवळ बुरोंडीच्या चंडिका देवीची भेट करजगांव च्या भैरीशी खाडीकिनारी शिमग्यात होते जेव्हा दोन्ही पालख्या एकत्र येतात. त्याला भाऊ-बहिणीची भेट मानतात. इथं जवळच दाभोळची ग्रामदेवता असलेल्या श्री दाल्भ्येश्वराचेही दर्शन घ्यायला हवे. दाभोळ हे फार संपन्न असे प्राचीन बंदर होते. टॉलेमीच्या नकाशात दाभोळचा उल्लेख आहे. कधी दालभ्यपुरी, कधी दालभ्यवती, कधी मुस्तफाबाद, कधी हमजाबाद, कधी मैमुनाबाद अशी नावे या नगराने धारण केली. दक्षिण भारतातील मुस्लिम मक्केच्या यात्रेसाठी दाभोळहून पुढे जात म्हणून याला बाबुल-ए-हिंद सुद्धा म्हणत मक्केचा दरवाजा) असे अण्णा शिरगावकर सांगतात. इथं तलम वस्त्रांचे उत्पादन होत असे.. आंब्याचा बागा आजही आहेत. इथं जवळच ८०० फूट उंच डोंगरावर बालापीराचे स्थान आहे. जर कधी तिथं पोहोचलो तर त्याची गोष्ट नक्की सांगीन. दाभोळ बंदरात आदिलशाही राजकन्येने बांधलेली आयेशाबीबीची म्हणजे माँसाहेब मशीद सुद्धा पाहण्याजोगी आहे.. ती ब्लॉग आपण इथं वाचू शकता. वसिष्ठी नदी ओलांडून आपण वेलदूर, अंजनवेल मार्गे गुहागरच्या दिशेने जाऊ शकतो.. तवसाळला जयगड खाडी म्हणजे शास्त्री नदी ओलांडून गणपतीपुळे मार्गे थेट रत्नागिरीपर्यंत सागरी महामार्गाने दर्या फिरस्ती करत जाता येते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: