
वसिष्ठी नदीच्या मुखाजवळ उत्तर बाजूला वसलेलं एक प्राचीन बंदर म्हणजे दाभोळ. अंजनवेल चा गोपाळगड पाहून फेरीने आपण दाभोळ जेट्टीला येतो. नदी पार करण्यापूर्वीच दाभोळ गावातील माडाच्या बागा आणि घरे दिसायला लागतात. त्यातून वर आलेला एक पांढरा घुमट स्पष्ट दिसायला लागतो. तीच दाभोळची मशीद. अंडा मस्जिद किंवा मांसाहेबांची मशीद या नावाने ही ओळखली जाते. कोकण किनाऱ्याच्या प्राचीनतेचा मागोवा घेत असताना दाभोळ मध्ये येणं हे टाईम मशीनमध्ये बसण्यासारखं आहे. विविध काळातील विविध शासकांच्या पाऊलखुणांतून कोकणचा इतिहास उलगडत जायला इथं मदत मिळते.

नदी आणि उंच टेकडीच्या मधील चिंचोळ्या पट्टीत दाभोळ नगरी वसलेली आहे. त्यामुळे नदी किनाऱ्याच्या भागात शहराचा आडवा विस्तार झालेला दिसतो. एका स्थानिक बखरीप्रमाणे ११ व्या शतकात इथं एका समृद्ध जैन राजाची राजधानी होती. टॉलेमीच्या जुन्या नकाशात दाभोळ बंदर आहे. या ठिकाणाला दालभ्यपुरी, दालभ्यवती, हामजाबाद, मैमुनाबाद अशी नावे विविध काळांत होती. एकेकाळी मक्केला जाणारे यात्रेकरू दाभोळ बंदरातून निघत असत त्यामुळे दाभोळला मक्केचा दरवाजा किंबा बाबुल-ए-हिंद असेही नाव होते.

दाभोळला तलम कापडाची मोठीच बाजारपेठ होती. दाभोळचे कौतुक करत असताना युसूफ आदिल खान म्हणजेच विजापूरच्या आदिलशाही घराण्याचा संस्थापक म्हणतो की इथं सारी स्वर्गीय सुखं आहेत. काहींच्या मते हा इस्तंबूल चा सुलतान मुराद दुसरा याचा मुलगा होता तर काही इतिहासकार जॉर्जियन गुलाम मानतात. अफनासी निकीतीन या रशियन प्रवाशाच्या वर्णात इथं एक उकृष्ट बंदर आणि भव्य शहर होतं असा उल्लेख येतो. इजिप्त, खोरासान, निगोस्तान, अरबस्तान, इथियोपिया अशा ठिकाणांहून इथं घोडे आयात केले जात होते असा उल्लेख करतो. इथं बहामनी सुलतान महमूद दुसरा याचे शासन होते. त्यानंतर गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने दाभोळ जिंकले.

नंतर दाभोळवर विजापूर घराण्याची सत्ता आली. १५०८ मध्ये इथल्या किल्ल्यावर पोर्तुगीज व्हाइसरॉय आणि ऍडमिरल डॉम फ्रान्सिस्को दि अल्मिडा याने हल्ला केला आणि दाभोलकरांची दाणादाण उडवली. १५२० साली इस्माईल आदिल शाह दाभोळचा शासक होता.. त्याने पोर्तुगीजांशी तह करून व्यापारी सहकार्य करण्याचा प्रस्ताव मांडला पण पोर्तुगीजांनी तो मान्य केला नाही आणि पुन्हा दोन वर्षांनी दाभोळवर हल्ला झाला. या हल्ल्यातून सावरून १५४० पर्यंत दाभोळ शहराने पुन्हा जुने वैभव प्राप्त केले होते. १५७१ च्या सुमारास पोर्तुगीजांनी अजून एक हल्ला केलेला दिसतो तेव्हा दाभोळचा प्रशासक ख्वाजा अली शिराझी याने पोर्तुगीज आक्रमकांना किनाऱ्यावर उतरू दिले आणि नंतर १५० पोर्तुगीज सैनिकांची कत्तल केली अशी नोंद सापडते

तर या ऐतिहासिक शहरात अनेक वास्तू आहेत. त्यापैकी सुस्थितीत असलेली एक देखणी वस्तू म्हणजे माँसाहेबांची मशीद. दाभोळ जेट्टीहून जवळच नाक्यावर ही मशीद दिसते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या ताब्यातील या मशिदीत गेल्यावर सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतो तो अष्टकोनी रचनेचा हौद आणि त्यामधील कारंजे. ही मशीद विजापूरची राजकन्या आयेशा बीबीने १६५९ साली बांधली.

या राजकन्येला मक्केला तीर्थयात्रेला जायचे होते सोबत २० हजार स्वार आणि १५ लाखांची तरतूद घेऊन ती दाभोळ बंदरात आली होती परंतु वादळी हवामान असल्याने मक्केला जाण्याचा बेत रद्द करावा लागला. या घटनेने आयेशा बीबी अस्वस्थ झाली आणि तिने धर्मगुरूंचे मार्गदर्शन घेतले. तिच्यासोबत आलेल्या काझीनी तिला धार्मिक कार्यासाठी दानधर्म करण्याचा सल्ला दिला म्हणून तिने ही मशीद बांधायला घेतली. हौदासमोरील पायऱ्या चढून चपला काढून आत आलं की मशिदीच्या सुंदर कमानी आणि झरोके लक्ष वेधून घेतात. त्यातील प्रमाणबद्धता आणि रेखीवपणा मोहक आहे.

ही मशीद विजापूरच्या मशिदीची प्रतिकृती आहे असं म्हणतात. ६० फूट लांब आणि ७० फूट रुंद असलेल्या या मशिदीला ७५ फूट उंचीचा घुमटही आहे. कामिल खान नावाच्या वास्तुरचनाकाराने ही मशीद बांधली असे गॅझेटमधील माहितीवरून लक्षात येते. मशिदीच्या चारही बाजूला चार मिनार आहेत.

दगडी पायऱ्यांवरून चिंचोळ्या रस्त्याने आपण पहिल्या मजल्यावर येतो. आणि घुमटाची रचना आपल्याला वेगळ्या कोनातून जवळून पाहता येते. विजापूरच्या जामा मशिदीशी असलेलं साधर्म्य अजूनच जाणवतं

या मशिदीचा खर्च चालवण्यासाठी आयेशा बीबीने भोस्ते, भोपण, बहिरवली, करूळ, इसापूर, मुंढर आणि पांगारी खुर्द ही आठ गावे इनाम दिली होती.
१६६२ मध्ये मुघलांकडून दाभोळ छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतल्यावर हे जुने इनाम सुरु ठेवले असा उल्लेख रत्नागिरी गॅझेटमध्ये आहे. दाभोळ हा व्यापारी भाग असल्याने इथं वापरात असलेल्या चलनी नाण्यांचा आढावा घेणे इष्ट ठरेल. इथं चौल लारी, बसरी लारी, अशर्फी (अर्धा रुपया) अशी नाणी वापरली जात. लारी हे चांदीचे नाणे होते आणि त्याचा आकार मात्र नेहमीप्रमाणे गोल नसून साडीला लावतो त्या पिनेच्या आकाराचा होता. पाच लारी मिळून एक रुपया होत असे. बुरुजकी हे नाणे इथं इस्लामी अंमलात प्रचारात होते आणि त्याची किंमत साधारणतः शिवराई इतकी होती. या सगळ्या नाण्यांची माहिती मला अण्णा शिरगावकरांच्या पुस्तकात मिळाली. कोकणाबद्दल त्यांचे शोध अपरान्ताचा या नावाचे वाचनीय पुस्तक आहे. दाभोळ बद्दल त्यांचा विशेष अभ्यास आहे.
दाभोळ समुद्र किनाऱ्यावर मला शिया पद्धतीचे बांधकाम असलेली एक घुमटयुक्त वास्तू आणि एक बांधकाम दिसले. अण्णा शिरगावकर यांच्या पुस्तकातून मिळालेल्या माहितीप्रमाणे १५५८ साली बांधली गेलेली सादतअली ची मशीद आणि जवळच असलेला खिज्र खानाचा दर्गा या परिसरात आहेत. कदाचित या दोन फोटोतील वास्तू त्याच असाव्यात.
दाभोळ परिसरात खूप भटकंती करणे अजून बाकी आहे. पन्हाळेकाजी लेणी. सप्तेश्वर कोळेश्वर अशी मंदिरे, लोकमान्य टिळकांचे मूळ गाव असलेले चिखलगाव… खूप काही पाहायचं आहे दापोलीला जाता जाता. कोकणातील अशा ठिकाणांची चित्र भ्रमंती करण्यासाठी दर्या फिरस्ती ब्लॉगला नियमितपणे भेट देत रहा. आपल्या मित्रांना सांगा आणि शेयर करा हीच कोकण रसिकांना विनंती.
संदर्भ –
साद सागराची – पराग पिंपळे
शोध अपरान्ताचा – अण्णा शिरगावकर
रत्नागिरी गॅझेट
बाला पीर म्हणून अजून एक जागा आहे दाभोळ जवळ, त्या परिसरातला सर्वात उंच पॉईंट, नक्की visit करा, मी जाऊन आलीये पण तुमच्या लेखणीतून परत फिरायला आवडेल