गुहागर-वेळणेश्वर-हेदवी परिसरात भटकंती करत असताना आधी दशभुज गणेशाचे दर्शन घ्यायचे आणि मग हेदवीच्या समुद्रकिनाऱ्यावर जायचा हा नेहमीचा शिरस्ता. दरवेळी किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलं की डाव्या बाजूला एका मंदिराची कमान आणि गर्द झाडीतून दिसणारी शिखरे खुणावत असत. यावेळी मुद्दाम वेळ काढून हे देऊळ पाहायचेच असं ठरवलं.

डावीकडे उतारावरील पायवाटेने सुमारे दीडशे मीटर दक्षिणेकडे गेले की पेशवेकालीन मंदिर स्थापत्य पद्धतीतील शिखरे दिसू लागतात. आखीव रेखीव प्रमाणबद्ध असं देऊळ पाहून आपल्याला कोकणच्या सांस्कृतिक पसाऱ्यातले एक रत्न सापडल्याचा आनंद होतो. कोणाची आराधना इथं होत असेल.. शिव-पार्वती, गणेश की लक्ष्मीनारायण असा विचार करत आपण सभामंडपात पोहोचतो. समोर अतिशय सुंदर अशी एक मूर्ती कोनाड्यात दिसते. गरुडाने खांद्यावर घेतलेले विष्णू-लक्ष्मी..


हेदवीचे गणेशमंदिर बांधून घेणाऱ्या केळकर स्वामींनीच याही देवळाचा जीर्णोद्धार केला असे सांगितले जाते. मूळ मूर्ती पाषाणातील असावी त्यावर नंतर संगमरवरी मूर्ती घडवली गेली. मागे असलेल्या प्रभावळीवर दशावतार तर आहेतच शिवाय कैलासावर असलेल्या शिवाचेही चित्रण आहे त्यामुळे या देवतेला दशावतारी कैलास लक्ष्मीनारायण असे नाव मिळाले असावे.

मूर्तीची उंची सुमारे सव्वा मीटर असून मूर्तीच्या पायाशी लक्ष्मी, हनुमान, गरुड आणि इतर सेवकांच्या आकृती दिसतात. प्रभावळीत ध्यानस्थ शिवाबरोबरच काही युद्ध मुद्रेतील आकृती आणि दोन सिंह प्रतिमा सुद्धा आहेत…देवळातच देवाची पालखीही टांगून ठेवलेली आहे. मंदिराच्या सभामंडपात ओक आणि जोगळेकर या दोन साधकांच्या समाधीची जागा दिसते.


हा परिसर निसर्गाच्या आशीर्वादाने आणि विविध मंदिरांच्या कृपेने समृद्ध झालेला आहे. भर उन्हात भटकंती करण्यापेक्षा सकाळी लवकर आणि सायंकाळी समुद्रकिनारे पाहायचे आणि दुपारच्या वेळात मंदिरे पाहायची अशी योजना केली तर कमी दमणूक होते. हे देऊळही माधवराव पेशव्यांच्या काळातील असेल तर साधारणपणे १८ व्या शतकाच्या उत्तरार्धातील. या काळात कोकणात बांधली गेलेली मंदिरे टुमदार आहेत आणि एका वेगळ्या स्थापत्यशैलीचा वारसा जपून आहेत. या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास आणि संशोधन व्हायला हवे. एखादा कोकणप्रेमी भारतविद्या निष्णात हे शिवधनुष्य उचलेल अशी आशा करूया.