मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी स्थापन केलेले भगवती देवीचे सुमारे तीनशे वर्षे जुने मंदिर देवगड तालुक्यातील कोटकामते गावात आहे. गावाभोवती तटबंदी असल्याने कोट कामते असे नामकरण झाले असावे. किल्ल्याचे आता अवशेष मात्र उरले असले तरीही देवीचे मंदिर सुबक आणि मांगल्यपूर्ण भाव जागृत करणारे आहे. मंदिर परिसर किल्ल्यापासून २ फर्लांग अंतरावर आहे असं गॅझेट सांगते. अश्विन महिन्यात इथं होणाऱ्या यात्रेला ३ हजार लोक येतात अशी गॅझेटमधील नोंद आहे.

गावातील भातशेती आता किल्ल्याच्या खंदकातही केली जाते. गावात एकच बुरुज पाहता येतो. दुर्दैवाने मी तिथं सूर्यास्तानंतर पोहोचलो त्यामुळे बुरुजाचा फोटो मिळाला नाही. पण मंदिराच्या सभामंडपातील समांतर लाकडी खांबांची रचना आणि त्यावरील कोरीवकाम आकर्षक वाटते. असे लाकडी बांधकाम टिकवणे आणि देवळाचा जीर्णोद्धार होत असताना त्याचे हे वैशिष्ट्य जतन करणे ही महत्वाची गोष्ट ठरणार आहे. याबाबतीत ग्रामस्थांचे प्रशिक्षण आणि आवश्यक निधीचा पुरवठा या बाबी अत्यंत गरजेच्या आहेत.

मंदिराच्या भिंतीवर असलेला शिलालेख त्याची निर्मिती सरखेल कान्होजी आंग्रेंनी केली याची ग्वाही देतो.
श्रीभगवति श्रीमछकेषोड
श शत सप्तचत्वारिशं नमः
धिकं सवछर विश्वावसुन्ना
मा शुभे तस्मिन्वछरे आंगरे
कान्होजी सरखेल श्रीमत्काम
च देवी देवालय करोदिती
जानातुजनो भविष्यमाणः
||1|| 1647
म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रेंनी शके १६४७ म्हणजे इसवीसन १७२५ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला असे ही नोंद सांगते. बाजूला श्री रवळनाथ, हनुमान, पावणाई अशी मंदिरे आहेत. इथं आतमध्ये छायाचित्रणावर निर्बंध असल्याने कोरीवकामांचा तपशील मला टिपता आला नाही. पुढल्या वेळेला परवानगी मिळाली तर ब्लॉग अपडेट करता येईल. इतले वतनदार श्री डॉ मुरलीधर प्रभुदेसाई हे शुद्ध आयुर्वेद उपचार करणारे वैद्य. त्यांच्या संग्रहात दगडी भांडी असल्याचे मी प्राध्यापक प्र. के. घाणेकरांच्या कोकणातील पर्यटन या पुस्तकात वाचले. थोडक्यात कोटकामतेला पुन्हा जायला हवं.