भगवान शंकराचा आणि निसर्गाचा विचार करताना डोळ्यासमोर येणारं निसर्गरूप म्हणजे हिमालयाचा मुकुटमणी कैलास पर्वत आणि तिथून वाहत येणारी गंगा. पण कोकण आणि शिवाचा एकत्र विचार केला तर शिवाचे अढळ स्थान म्हणून समोर येतो अथांग सागर आणि त्याला सोबत देणारा किनारा. कितीतरी शिव-पार्वती रूपे कोकणात सागरतीरावर प्रतिष्ठापित झालेली दिसतात.. त्यापैकी सगळ्यात शांत, रम्य आणि समुद्रसान्निध्यात असलेलं ठिकाण म्हणजे हेदवी येथील उमामहेश्वर

हेदवी समुद्र किनाऱ्याच्या उत्तर टोकाला जिथं खडकाळ भाग सुरु होतो तिथं कच्चा रस्ता संपतो आणि आपण देवळाच्या सभामंडपात जाऊन पोहोचतो. या मंदिराची बांधणी पेशवेकालीन आहे परंतु समोरचा सभामंडप मात्र हल्लीच बांधलेला असावा. फार पूर्वीपासून इथं शिव-पार्वतीचे देऊळ असावे पण आजचे बांधकाम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी दिलेल्या निधीतून १७७०-८० च्या सुमारास झाले असा उल्लेख केला जातो. उत्तर कोकणात नागावजवळ असलेले श्री वंखनाथ मंदिरही त्यांनीच दिलेल्या देणगीतून जीर्णोद्धारित झाले – त्याची गोष्ट इथे वाचता येईल.

जेव्हा जेव्हा मी या भागात भटकंतीला गेलो आहे तेव्हा तेव्हा ऊन-पाऊस यांच्यापासून संरक्षण मिळावं म्हणून किंवा थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून इथं शांत बसलो आहे. इथला छोटेखानी नंदी आजच्या भाषेत खूपच क्यूट दिसतो. मंदिरामागे एक झरा आहे ज्यातून नैसर्गिक मिनरल वॉटर येत असतं. इथून पुढं भरतीच्या वेळेला खडकांतून वाट काढत गेलं की बामणघळ येते आणि निसर्गाचा अविष्कार पाहता येतो. शिवशंभो समोर नतमस्तक झाल्यानंतर समुद्राची गाज ऐकत बसलं की खूप छान वाटतं. सभामंडपाच्या सावलीत बसून लाटांची आवर्तने पाहता येतात.

या भागातील दशभुज गणपतीचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. पण उमामहेश्वर आणि दशावतारी कैलास लक्ष्मीनारायण ही दोन सुंदर मंदिरे इथं पाहता येतात. पुढं नरवण ला व्याघ्राम्बरी देवीचे दर्शन घेता येते. रोहिले चा छोटासा किनारा पाहता येतो. उन्हाळा पावसाळा हिवाळा प्रत्येक ऋतूत निराळा साज घेऊन हेदवी सजत असते. पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या नीलिमा देशपांडे या मैत्रिणीचे हेदवी गावावर खूप प्रेम आहे. हेदवीबद्दल बोलत असताना अनेक हृद्य आठवणींमध्ये ती रंगून जाते. कोकणावर निस्सीम प्रेम असलेले असे लोक भेटले म्हणजे लई भारी वाटतं.