कोकणात भटकायला जाऊया असं कोणी म्हंटलं तर डोळ्यासमोर येते सागरनिळाई, स्वच्छ सफेद वाळू, माडांच्या सुपारीच्या बागा.. शांत समृद्ध गावे आणि कौलारू घरे… पण कोकणातील अनुभव आणि कोकणाशी निगडित प्रतिमा इथवर मर्यादित नाहीत. सह्याद्रीच्या पायथ्यापासून सिंधुसागरापर्यंत पसरलेल्या प्रदेशात कोकणच्या कोषागारातील अनेक रत्ने आहेत.. मग नद्या असोत.. किंवा देवराया.. रानातील दुर्ग असोत किंवा मग शेती-भाती बागायतीत लपलेली मंदिरे.. हे सगळंच पाहण्यासारखं आहे.

कोकण ही भगवान परशुरामाने वसवलेली अपरान्त भूमी.. इथली मंडळी साधी, सरळ, काटक, मेहनती आणि कलासक्त सुद्धा.. अशावेळी अद्वितीय शिल्पकलेचे नमुने लोकांनी जपलेल्या, पूजलेल्या गाभाऱ्यांमध्ये कैक शतके टिकून आहेत यात नवल ते काय.. आणि विष्णूच्या केशवरूपाचे आणि कोकणाचे घट्ट अतूट असे नाते आहे.. गुहागर पासून तासाभराच्या अंतरावर शीर गावामध्ये दोन खास विष्णुशिल्पे आपण पाहू शकतो. या ठिकाणची महती पराग पिंपळे, प्रा. प्र. के. घाणेकर इत्यादी भटक्यांनी लिहून ठेवलेली आहे.. पण हे ठिकाण शोधणे तसे सोपे गेले नाही.. कारण इतक्या सुंदर मूर्ती आपल्या पंचक्रोशीत आहेत याचा गुहागरकर मंडळींनाही पत्ता नाही. शृंगारतळीहून कोतळूक मार्गे अबलोली कडे जाणाऱ्या रस्त्यावर शीर गाव आहे. इथं काटदरे मंडळींची घरे आहेत. एका या घरांपैकी एका घराजवळ तटबंदीयुक्त मंदिरात थोरला लक्ष्मीकेशव आहे. सभामंडपाला लाकडी जाळीचे कोंदण आहे.. त्यातून ऊन सावलीचा खेळ सुरु असतो. इथं घटकाभर बसून मग दर्शन घ्यायचं.

गुगल मॅपवर शोध घेत असताना सागर काटदरे असं नाव टाकलं की तिथं जवळच असलेलं लक्ष्मी नारायण मंदिर दिसतं. खरंतर ही मूर्ती लक्ष्मीकेशवाची आहे पण आयुधक्रमाप्रमाणे विष्णूचे रूप ठरते याची कल्पना नसल्याने सरसकट लोक लक्ष्मीनारायण म्हणतात हे मी तुरवडे सारख्या ठिकाणीही पाहिलेले आहे. डॉ. देगलूरकरांनी नमूद केल्याप्रमाणे कोकणातील या गंडकीशिळेत घडवलेल्या विविध विष्णुमूर्ती तेराव्या शतकातील आहेत..

करड्या रंगाची मीटरभर उंचीची ही मूर्ती पचशग या आयुधक्रमाप्रमाणे केशवाची ठरते. सध्या इथं भास्कर काटदरे पूजा व्यवस्था पाहतात आणि समस्त काटदरे कुटुंबीय या देवांना आराध्य मानतात. मूर्तीच्या प्रभावळीत दशावतार कोरलेले आहेत आणि पायाशी लक्ष्मी तसेच इतर सेवक दिसतात. देवळासमोर दीपमाळ आणि आवारात विहीर आहे. खालच्या उजव्या हातात पद्म म्हणजे कमळ, वरच्या उजव्या हातात शंख, वरच्या डाव्या हातात चक्र आणि खालच्या डाव्या हातात गदा म्हणजे पचशग क्रम. या मूर्तीचा मुकुट आणि आभूषणे खूपच सुंदर नाजूक आहेत.. मूर्तीच्या चेहऱ्यावरील शांत ध्यानस्थ भाव आणि मोजक्या पण ताज्या फुलांची रचना पाहून खूप प्रसन्न वाटते.

इथं समोरच काटदरे कुटुंबाच्या खासगी जागेत एक देऊळ आहे. पुरातन मंदिराला आता बाहेरून संरक्षक बांधकाम केले आहे जेणेकरून देवळाचे मूळ रूप गायब होणार नाही परंतु त्याला निसर्गाच्या तडाख्यांपासून संरक्षणही मिळेल. मंदिरावर श्री लक्ष्मी केशव म्हणजेच केसरोबा अशी पाटी दिसते. शेडवईच्या लक्ष्मीकेशवाला सुद्धा श्री केशरनाथ म्हंटले गेले आहे. आम्ही वेळणेश्वर मुंबई परतीच्या प्रवासात असताना इथं गेलो होतो त्यामुळे काटदरे मंडळींनी केलेला चहा- नाश्त्याचा आग्रह आणि पाहुणचार पुढच्या वेळी येण्याचे वचन देऊन post-dated स्वीकारावा लागला. नाहीतर कोकणात राहणाऱ्या मंडळींशी गप्पा मारण्याचा आनंद वेगळाच असतो. काकांनी देऊळाचे दार उघडून आमचे स्वागत केले. ताशीव काळ्या दगडातील शिल्पाने आमचे लक्ष वेधून घेतले.

ही मूर्ती पाऊण मीटर उंच त्यामुळे तिला धाकला लक्ष्मीकेशव म्हणतात.. प्रभावळीत असलेले दशावतार, अगदी खरे वाटतील असे कोरीव दागिने.. पचशग हा आयुधक्रम ही साम्यस्थळे आपल्याला लगेचच लक्षात येतात.. गंमत पहा ना.. एकाच देवाचे एकच मूर्त स्वरूप.. एकाच गावात.. पण वेगळे दगड आणि उंची वेगळी.. चेहरा सुद्धा वेगळा.. थोरला-धाकला होऊन एकाच परिसरात प्रतिष्ठापित झालेला लक्ष्मीकेशव म्हणजे गुहागर तालुक्याचे पुरातन वैभवच


थोरल्या लक्ष्मीकेशवाजवळ शंकराची पिंडी सुद्धा आहे. दोन्ही मूर्तींमध्ये साम्यस्थळे आणि भिन्नता शोधताना मजा वाटते. इथले कोतळूक गाव गोपाळ कृष्ण गोखलेंचे जन्म गाव तर वेळणेश्वरला मी ज्यांच्या कडे राहतो ते गोपाळकृष्ण गोखलेच! फरक इतकाच की गोपाळकृष्ण असे त्यांचे पूर्ण नाव आहे तर नामदार गोखल्यांचे नाव गोपाळ तर वडीलांचे नाव कृष्ण होते..शीर गाव हे कवी माधव काटदरेंचे गाव.. निसर्गकविता आणि ऐतिहासिक कविता हे कवी माधवांचे खास प्रांत.. हिरवे तळकोकण ही त्यांची प्रसिद्ध कविता.. इथं मोठं होत असताना त्यांनी जे काही निरीक्षण केले असेल त्याचा छाप असलेली.. कोकणप्रेमी मंडळींनी ही नक्की वाचायला हवी.. तशी ही ४१ कडवी असलेली दीर्घ रचना आहे.. पण शीर च्या आसमंताचे चित्रण असलेल्या त्यांच्या या ओळी तिथल्या अनुभवाला अगदीच समर्पक वाटतात.. कोकणातील वनस्पती आणि फुलांची त्यांना असलेली माहिती आणि त्यांनी टिपलेली निसर्गाची सौंदर्यस्थाने या कवितेत चित्रमयता, नादमयता, गंधमयता आणतात.
हिरव्या पिवळ्या मृदुल दलांच्या रम्य गालिच्यावरी
स्वप्नीं गुंगत गोकर्णीची फुले निळी पांढरी ।।८।।
वृक्षांच्या राईत रंगती शकुंत मधुगायनी
तरंगिणीच्या तटी डोलती नाग केतकी वनी ।।९।
फूलपाखरांवरुनी विहरती पु्ष्पवनांतिल परी
प्रसन्नता पसरीत वाजवुनी जादूची पावरी ।।१०।।
शिताबाईच्या गोड हातचे पोहे जे काननी
रागाने दे बाइलवेडा कवडा भिरकावुनी ।।११।।
रोपे त्यांची बनुनी पसरली नाचत चोहीकडे
अजुनी पाहा या! मंडित त्यांनी कोकणचे हे सडे! ।।१२।।
कोकणात भ्रमंती करत असताना एक गोष्ट शोधायला म्हणून जावं आणि सोबत चार विलक्षण गोष्टी सापडाव्यात असं नेहमीच होत असतं.. त्यामुळे कोकण दर्शन हे कोणत्याही टूर कंपनीच्या ७ रात्री ८ दिवस वगैरेंच्या पॅकेजमध्ये कधी बसू शकेल असं मला वाटतच नाही. प्रवासातील कर्मयोग साधायला इथं यायचं.. अमुक एक सापडेल अशी घट्ट अपेक्षा न ठेवता निवांतपणे यायचं.. अमेरिकेतील प्रसिद्ध बास्केटबॉल कोच जॉन वूडन म्हणतो त्याप्रमाणे Good things take time, as they should हे लक्षात ठेवूनच कोकणात यायचं.