कोकण म्हणजे समुद्र किनारा, एक पर्यटन स्थळ, काजू , आंबा नारळ पोफळ…कोकण हेही आहे आणि अजूनही… त्या पलीकडे खूप काही… किनारपट्टी आणि सह्याद्रीचा अपूर्व मिलाफ असलेला मुंबई पासून गोव्यापर्यंत 700 km चा एक मोठा भौगोलिक पट्टा म्हणजे कोकण… कैलारू घर, भात शेती, तुळशी अंगण, समोर गोठा, पुढचं खळं, मागचं खळं, पडवी, माजघर अशी घराची रचना म्हणजे कोकण.. समुद्र किनाऱ्यापासून थोडी दूरची घर छोट्याशा घाटित वसलेली ही घरं..बहुतांशी एकत्र कुटुंब पध्दती.. एखादा भाऊ मुंबईत पण घरच्या गणपतीला आवर्जून सगळे येणारच.

इकडे राहिलेला माणूस जगाच्या पाठीवर कुठही राहतो. इकडच्या माहेवशीणी तर कुठही संसार करतील, सगळ्यांना आपलंस करतील आणि हो, कोकणातही आता बाहेर सगळीकडून सुना येता आहेत आणि कोकण आपलंसं करता आहेत. गावगावातले उत्सव, कुणकेश्वर आंगणेवाडी इकडच्या जत्रा, खूप प्राचीन देवळं ही आजची स्थानिक संस्कृती जपता आहेत. थोडं खेडवळ असलं तरी तस कोकण मुळात फार दुर्गम नाही. खूप घरामध्ये खूप पूर्वीपासून घरात पाण्याचा पंप, जनरेटर आणि घरापर्यंत गाडी जाईल अशी सोय फार पूर्वीपासूनच आहे. पूर्वी फक्त गोव्याला जाणारे आता देवगड, मालवण, विजयदुर्ग, पडवणे, माडबन, आचरा, वेंगुर्ले इकडेही जायला लागलेत. जस आत जाऊ तस सावंतवाडी, कणकवली, कुडाळ असं कोकण आपल्याला नव्याने उलगडत जाईल.


काही गोष्टी आपल्या असण्याच्या, आपल्या अस्तित्वाच्या अविभाज्य भाग असतात, तसंच कोकण आणि मी आहोत. आधी शिक्षण, मग नोकरी आणि लग्न या निमित्ताने तिथून बाहेर पडून जवळपास १५ वर्षं उलटून गेली. पण काही गोष्टी अंगात भिनून जातात, तसंच हे कोकण. माझा कोकणचा बंध भावनिक असल्यामुळे सामाजिक, राजकीय किंवा वस्तुनिष्ठपणे ह्या विषयावर लिहिणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे मी वैयक्तिक दृष्टिकोनातूनच ह्या विषयाला हात घालू शकते. देवगड जामसंडे येथील वळकूवाडीतील गोगट्यांचं घर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कै. श्री अप्पा गोगटे हे जवळपास २५-३० वर्षं आमदार असल्याने त्या घराने येणाऱ्या-जाणाऱ्यांचा ओघच पाहिलाय. घरात राहणारी ३०-४० माणसं, तेवढीच गडी माणसं, पाहुणे, आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांची उठबस होती. लग्नकार्य, मे महिना म्हटलं की अजूनच घाई-गडबड असायची. पण कितीही लोक असले, तरी सकाळच्या चहापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक माणसाला सर्व काही हातात मिळेल अशी आमच्या आज्जी आणि काकूंनी लावलेली व्यवस्था होती, त्यामुळे घर अगदीच ऑटो-पायलट मोडवर चालायचं. शेवटची पंगत जेऊन उठेपर्यंत पहिल्या पंगतीला जेवलेल्या लोकांसाठी चहाचं आधण ठेवलेलं असायचं. हळूहळू परिस्थितीनुसार बदल घडत गेले, पण आजही आमच्या घरात सण-कार्याला तशीच बिनचूक व्यवस्था आहे.

सगळ्या भावंडांमध्ये शाळा, सुट्ट्या यामध्ये बालपण कधी सरलं कळलंच नाही. आपल्या आधीच्या आणि पुढच्या वर्गांमध्ये सतत कोणी ना कोणी भावंडं असल्याने शाळा म्हणजे एक एक्स्टेंडेड फॅमिलीच होती. दोनच माध्यमिक शाळा आणि एक कॉलेज असल्याने सगळेच सगळ्यांना ओळखायचे. एकत्र कुटुंब पद्धती आणि कोकणातली सामाजिक रचना पाहता, फारसं ते एक Collective upbringing असतं , जिथं शिस्त आणि वागण्याबोलण्याच्या पद्धतीवर जास्त भर होता. तुम्ही नेहमीच एका समूहाचा भाग असल्याने वैयक्तिक मत, व्यक्ती स्वातंत्र्य ह्याला फारशी तुळ कोणी द्यायचा प्रश्नच नव्हता. क्रिकेट मॅच, बातम्या, सिरियल, जे सगळे पाहतील तेच टीव्हीवर पाहायचं (त्या अँटेनावर फिरवत बसण्याची मजा वेगळीच होती). जे दिलंय, पानात आलंय ते खायचं; सगळे जातील त्या लग्नांना ओळख असो वा नसो मोठ्यांबरोबर जायचं. त्यामुळे आपलं मत ह्या विषयाला फारशी किंमत नव्हती आणि त्यामुळेच एक व्यवस्था म्हणून कोकणातली घरं उत्तम चालली . फार हॉटेल्स आणि बेकऱ्या नसल्याने आम्ही लहानपणापासून मुंबईतून कोणीतरी येईल आणि आवडता खाऊ आणेल याची वाट पाहायचो. सगळ्यांना काकू फरसाण देत असताना आपल्याला जास्त गाठी याव्यात, अशा साध्या सोप्या इच्छा असायच्या आमच्या. वडा पाव आणि उसळ पाव ह्या ‘बाहेर’ खायच्या आवडत्या डिशेश!

हो, कितीही भावंडं असली तरी त्या एका आईवर लोड नसायचा आणि कुठलंच मूल ‘मला आईच हवी आंघोळ घालायला, भरवायला’ असा हट्ट करू शकत नसे, कारण जी असेल तिच्याकडून गपचूप सगळं करून घ्यावं, ही लहानपणापासून तिकडची मूलं समजून चालली होती. शिस्त असली तरी लाड खूप व्हायचे. कुणी दादा/काका सतत आवडता खाऊ देत राहायचे. आणि me time असं काही प्रश्न नव्हताच, कारण सगळ्यांचं अंगण, परिसर, बागा हवं तेवढं मोठं असल्याने सगळा वेळ तुमचाच असायचा.
मी २००५ साली कोकण सोडलं तेव्हा बदलाचे वारे वाहत होतेच. एकत्र कुटुंबपद्धती कमी होत होत्या, नागरीकरणाचा वेग वाढत होता. आम्ही लहानपणी ओस पाहिलेले किनारे, देवळं आता पर्यटनस्थळं होऊ लागली होती. ग्रामपंचायती नगरपालिका/परिषदा होऊ घातल्या होत्या. आता काळानुसार कोकण बदलतंय आणि बदल अनिवार्य आहे, पण काही स्थानिक/सामाजिक प्रश्नांना हात घालावा लागेलच.
सध्या कोकण चर्चेत आहे, अनेक कारणांसाठी! मुंबई-पुणेच नाही तर भारतातील अनेक भागांमधील लोक तिकडे आता गोवा सोडून पर्यटनासाठी येत आहेत. त्यामुळे तिकडच्या सुविधांबाबत चर्चा होत राहील. नशिबाने लोक त्यांना माहित असलेल्या किनाऱ्यांवर आणि देवळांवरच जातात, त्यामुळे गाडीतून दूर अशी अनेक ठिकाणं अजूनही आहेत. आता बदल दोन्ही बाजूंनी दिसायला हवा. येणाऱ्या पर्यटकांनी भान ठेवावं की शहरातील हॉटेल्स नाहीत जिथे पैसे देतोय म्हणून सगळ्या सुविधा मिळतील. तसेच स्थानिक व्यावसायिकांनी थोडासा प्रोफेशनल दृष्टिकोन ठेवायला हवा. पुन्हा प्रश्न आहे वाढणाऱ्या कचऱ्याचा आणि सांडपाण्याचा! काही नगर पालिका/परिषदा सोडल्या तर तिकडे अजूनही ग्रामपंचायतीच कारभार पाहतात आणि वाढणारा कचरा आणि सांडपाणी ह्याचा निचरा करणे स्थानिक संस्थानच्या आवाक्याबाहेरचं आहे. मोठा ऐरणीचा प्रश्न म्हणजे तिकडची ओस पडणारी गावं आणि भाऊबंदकीत अडकलेली घरं. हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एखाद्या दैवी चमत्काराची वाट पाहतो किंवा एखाद्या राजकीय नेत्यावर अवलंबून असतो. आपले स्थानिक आणि कौटुंबिक प्रश्न आपल्यालाच संघटितपणे सोडवावे लागतील. एक नमूद करावंसं वाटतं की कोकणातला माणूस कधीही आपल्या मातीत एकरूप वाटत नाही. अनेक लोक शहरी महत्त्वाकांक्षा घेऊन जगत आले आहेत, आणि आपल्या भूमीबद्दल एक सुप्त न्यूनगंड सतत जाणवतो. बाहेरचे लोक येऊन आपल्या जमिनीवर, घरावर हक्क सांगत आहेत तेव्हा आपलं काहीतरी निसटून जातंय याची थोडीशी जाणीव होतेय. काळानुसार बदल आणि सुविधा हव्यातच, पण त्यासाठी आपल्यालाही बदलावं लागेल.

मी स्वतः सांगू शकते की मी मराठी माध्यमात शिकल्याचा न्यूनगंड कधीही बाळगला नाही; उलट, आमच्या शाळेत अनेक उत्तम शिक्षक होते, अगदी हाडाचे शिक्षक होते, त्यामुळे आमच्या आणि आमच्या आधीच्या काही बॅचेस शालेय शिक्षणाबद्दल तक्रार करू शकत नाहीत.
“तू स्वतः बाहेर राहतेस, नोकरी करतेस, तुला बोलायला काय!” असं खूप जण मनात किंवा प्रत्यक्ष बोलतील, पण मी बोलतेय कारण, सतत नाही, पण एकदा तरी बोलतेय, कारण शेवटी मीही आपल्यातलीच…बाहेरच्या लोकांनी एक साधी नोंद घ्यावी की कोकण हे एक गाव नसून मुंबईपासून गोव्यापर्यंतचा ७०० किलोमीटरचा मोठा प्रदेश आहे. रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग येथे दर ५०-१०० किलोमीटरवर जीवनशैली आणि भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. रायगड खूप मुंबई सारखंच आहे. सिधुदुर्ग आणि तळ कोकण ह्यात बराच फरक आहे.

मला कोकणाने काय दिलं असेल तर निसर्गरम्य ठिकाणं, माणसं आणि असंख्य आठवणी. आमची नारळ पोफळीची बाग, त्यातल तळ ज्याला आम्ही डुरा म्हणायचो…त्याचं डुर्यामध्येच आम्ही भावंड पोहायला शिकलो, आणि दोन सुक्या नारळांची सांगड करून. कोणी नाही म्हणायची हिम्मत कोणी केली की काका सरळ पाण्यात ढकलून द्यायचा. त्याच डुऱ्यात गणपती विसर्जन व्हायचं आणि अक्षरशः आमची अवस्था बाप्पाशिवाय ‘चैन पडेना आम्हाला’ अशी व्हायची. त्या बागेत, चिकू, पेरू झाडावरून पाडणं, पोफळीला झोपळे बांधणे हे त्या त्या वेळी अनुभवलं. मे माहिन्यात आंबे खाणे, करवंद तोडणे, छोटीशी घाटी चढून वर जाणे, मांडवात पकडापकडी, क्रिकेट, लगोरी, खांब खांब खांबोली खेळण्यात कसे दिवस गेले कळले ही नाहीत. फुल आणि गजऱ्याची बहिणींमध्ये स्पर्धा आणि मारामारीच असायची. जाई जुई मोगऱ्याचा बहर आला की वार ठरवून घेऊन फुल आणि गजरे यांच्या पाळ्या ठरवून घेतल्या होत्या.
भर पावसात लाईट जाणे अगदी नेहमीचं. कौलावरचा पावसाचा आवाज अजूनही निनाद करत राहतो.
कोकणातली देवळं सुंदर. मग ते जामसंडे येथील दिरबादेवी रामेश्वर, ब्राह्मणदेव, पोखरवावं किंवा कुणकेश्वर. कुणकेश्वर तेव्हा समुद्रा काठच साधं पण सूंदर देवस्थान. त्यावेळच्या शांततेत समुद्राचा आवाज जास्तच गहिरा वाटायचा.

नवीन पूल होण्यापूर्वी देवगड ते कुणकेश्वर मिठमुंबरी किनाऱ्यावरून आम्ही अनेकदा 5 ते 7 km चा चालत प्रवास केलाय. पोखरवावं ची शांतता तर अंतर्मन पोखरून टाकेल अशीच होती. अगदीच वर्दळ नसल्याने कोणीही सहज ध्यानस्थ होईल अशी शांतता आम्ही अनुभवलीये. मे महिन्याच्या सुट्टीत सोडलं तर समुद्र हे एरवी वर्षभर फिरायला किंवा भिजायला जायचं ठिकाण नव्हतं. कॉलेज मध्ये असताना पवनचक्की वर मी आणि मैत्रीण जायचो तेव्हाही अगदी निर्जन असायचं. मोबाईल नव्हते म्हणून घरचे एखाद्या भावाला पाठवायचे, ‘ मुली गप्पा मारत राहिल्या तर वेळ समजणार नाही’ म्हणुन.. मी शहरात येऊन शिकून नोकरी मिळवली नाही तर भाषा आणि विचार समृद्धी मला कोकणानेच दिली. लहाणपणी मी खूप कविता लिहायचे आणि त्याच खरंच कौतुक व्हायचं☺️
ह्या निसर्गात मी तरल विचार करायला शिकले. घर, भावंड आणि मैत्रिणींमुळे नाती आणि माणसं जोडायला आणि टिकवायला शिकले. माझ्या लिखाणाची प्रेरणा आणि उगम हे दोन्ही कोकणच्या निसर्गरम्यतेतच दडले आहेत. माझी सगळ्यात जवळची मैत्रिण कोकणातलीच. कुटुंबात सगळ्यांनी आमच्या मैत्रीला प्रोत्साहन आणि वेळ दिला. ती इकडेच फुलली.
हो, आणि मी कोकणची असूनही टिकल्या, बांगड्या, स्वयंपाक, रांगोळ्या, फुगड्या ह्यात रमणारी नव्हते. वेळ पडली तर गडीमाणसाचं काम करेन पण ‘typical मुली सारख’ जमणार नाही हा माझा attitude कोकणाने अगदी आपलासा केला.
आजही कोकणाने हे भावनिक बंध जपून ठेवले आहेत. अंगण, फुलं, आंब्यांची डेरेदार झाडं आजही पाय रोवून आहेत. मातीचा सुगंध तसाच दरवळतो. शाळा, घर, ती ठिकाणं पहिली की आठवणी ताज्या होतातच पण जुन्या आठवणीत रमतं,तेच दिवस छान होते अस राडायला आवडत नाही.पण एक खरय, आजही तिकडे आतून एक हाक येते, एक आर्तता जाणवते. हसून, मिश्कील पणे का होईना, मी म्हणतेच, ते दिवस खरच छान होते.☺️
शेवट एक personal note वरच… कोकण सोडलं असं म्हणत नाही कारण ते अंगात भिनलंय…
पावसाचा आवाज ऐकावा
तो कोकणातल्या कौलारू घरातच
पाणी साचावं ते आपल्या अंगणात…
माझ्या मनातलं कोकण
माझ्या मनात घर करून राहील
कौलावरच्या पावसाचा आवाज
सतत कानात घुमत राहील..
very nicely described .