
महाबळेश्वराच्या पवित्र भूमीत पाच नद्यांचा उगम होतो असे मानले जाते. त्यापैकी एक म्हणजे सावित्री नदी. उगमापासून पश्चिमेकडे १०० किमी प्रवास करून ही नदी बाणकोट आणि हरिहरेश्वर यांच्या दरम्यान अरबी समुद्राला जाऊन मिळते. सावित्री नदीचे पाणलोट क्षेत्र २२१५ वर्ग किलोमीटर आहे आणि रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांच्या मध्ये सावित्री नदी सीमा आखते.

सह्याद्री उतरून सावित्री पोलादपूर येथे पोहोचते आणि मग उत्तरेकडे वळते. तिथं तिला काळ नावाची महत्त्वाची उपनदी येऊन मिळते. महाड ते दासगाव हा प्रवास सावित्री नदी खडकाळ प्रदेशातून नागमोडी वळणे घेत करते. आजही या ठिकाणी नदी जलवाहतूक करण्यासाठी उपयुक्त आहे असे दिसते. पुढे नागेश्वरी नावाची नदी सावित्रीला येऊन मिळते. महाडच्या आसपास सावित्री नदीच्या दोन्ही तीरांवर शेतीसाठी उपयुक्त असा प्रदेश आहे. पुढं ३२ किमी प्रवास करत बाणकोट येथे नदी सिंधुसागराला जाऊन मिळते. गांधारी, घोड, जोगधर, चोला, काळ आणि नागेश्वरी अशा एकूण ६ उपनद्या सावित्रीच्या प्रवाहात समरस होतात. इंदापूर, माणगाव, टोळ, गोरेगांव, आंबेत अशा ठिकाणी सावित्री आणि तिच्या विविध उपनद्यांवर पूल बांधलेले आहेत. यापैकी एक पूल वरंध घाटाच्या पायथ्याशी असलेल्या ‘भावे’ नावाच्या (माझं आडनाव भावे) गावात आहे.

रायगड जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या हरिहरेश्वर जवळ असलेलं बागमांडला आणि रत्नागिरीत बाणकोट जवळचे वेश्वी या दोन गावांच्या दरम्यान मोठ्या फेरी सेवेने नदी पार करता येते. दुचाकी गाड्या, चारचाकी गाड्या, टेम्पो, रिक्षा, मिनीबस वगैरे वाहनेही या फेरीचा वापर करून नदी पार करतात. श्रीवर्धन हरिहरेश्वर परिसर बाणकोट केळशी वगैरे भागाशी या फेरीने जोडला गेला आहे. या www.carferry.in संकेतस्थळावर श्री मोकल यांनी चालवलेल्या सुवर्णदुर्ग शिपिंग च्या फेरीची अधिक माहिती मिळते.

सावित्रीच्या मुखापाशी विस्तीर्ण विशाल असे स्वरूप नदी धारण करते. वरकरणी हे पात्र जरी अतिशय शांत दिसत असले तरीही भरती-ओहोटीच्या गणिताप्रमाणे प्रवाह गतिमान होऊ शकतो. जलसंपदा आणि जलजीवनाच्या बाबतीत सावित्री अतिशय समृद्ध आहे. इथं पूल बांधला जात असून खांबांचे बांधकाम झालेले दिसते. सावित्री नदीच्या दोन्ही तीरांना असलेली डोंगरांची मालिका डोळ्यांना निववणाऱ्या हिरवळीने भरलेली असते. कुठं या हिरवळीतून एखादं कौलारू घर, एखाद्या मंदिराचा कळस किंवा मशिदीचा मिनार डोकावताना दिसतो. नदीचे पात्र एखाद्या पैठणीचा रंग असावा तितक्या मोहक निळ्या रंगाचा साज ल्यायलेलं दिसतं. सकाळी किंवा संध्याकाळी मावळतीच्या वेळेआधी या पाण्यावर सोनेरी सूर्य किरणे जरीचा आभास निर्माण करतात.

नदीच्या मुखाशी वेळासच्या किनाऱ्याला सुरुवात होते. पूर्वी पुलाचे बांधकाम सुरु झालेले नव्हते तेव्हा हे ठिकाण जास्त मोकळे दिसत असे. समुद्राची भरती ओहोटी आणि नदीचे वाहत येणारे पाणी यांचा संवाद इतकी वेगवेगळी दृश्ये, रंग यांची अनुभूती देतो की इथं शांतपणे बसून राहावे असेच वाटत राहते. मला वाटतं रात्रीच्या वेळी अवकाशातील चमकत्या ग्रहताऱ्यांची फोटोग्राफी करण्यासाठी हे ठिकाण फारच उत्तम असेल. कधीतरी हा अनुभव घेण्यासाठीही इथं यायला हवं. इथं एक पाणकोट बुरुज आहे. अनेकदा लोक यालाच बाणकोट म्हणतात. हे बांधकाम सिद्दीने केलं अशी नोंद दस्तऐवज सांगतात. साधारणतः खाडीच्या किनारी असलेल्या जलदुर्गाच्या बाबतीत अगदी पाण्याला लागून असलेली तटबंदी अनेक ठिकाणी दिसते. जयगडला लांबलचक तटबंदी शास्त्री नदीच्या पात्राला लागून आहे. नाटेचा यशवंतगड, देवगड या किल्ल्यांना अशी तटबंदी आहे. इथला बुरुज मात्र टेकडीवरील किल्ल्याला जोडलेला नसून एक स्वतंत्र बंदोबस्ताची चौकी असावी असं दिसतं.

बाणकोट किल्ल्याच्या पश्चिम तटावरून खाली किनाऱ्याच्या दिशेने पहिले की एक स्तंभ आणि एक त्रिकोणी बांधकाम दिसते. स्थानिकांना विचारलं तर त्यांना हे काय आहे हे नीटसं ठाऊक नसतं. राजा-राणी पॉईंट वगैरे काहीतरी मोघम उत्तर मिळते. तिथं उतरून जायला पायवाट दिसते. जवळ जाऊन पाहिलं की त्या त्रिकोणी स्मारकातून काढलेला एक श्रद्धांजलीपर कोरीव लेख आपल्याला दिसतो.

ब्रिटिश रेसिडेंट चार्ल्स मॅलेटचा मुलगा आर्थर मॅलेट याची पत्नी सोफिया आणि मुलगी ऍलन हेरीयेट यांच्या स्मरणार्थ बांधलेलं हे स्थळ आहे. मुंबईहून महाबळेश्वरला जाताना तेव्हा मुंबई ते बाणकोट हा प्रवास समुद्रातून आणि नंतर सावित्री नदीच्या पात्रातून महाडच्या दिशेने जावे लागत होते. १८५५ साली आर्थर मॅलेट त्याची २५ वर्षांची पत्नी आणि ३२ दिवसांची मुलगी हा प्रवास करत होते. बाणकोट खाडीत या बोटीला जलसमाधी मिळाली आणि या दोघींसह १३ खलाशी सुद्धा मारले गेले. हे ठिकाणही आवर्जून पाहण्यासारखे आहे.

बाणकोट बंदर व्यापाराच्या दृष्टीने विकसित करण्याचा इंग्लिशांचा विचार होता पण ते जमून आले नाही आणि किल्ला पुन्हा मराठेशाहीत आला. १८२२ साली जिल्हा मुख्यालय रत्नागिरीला हलवण्यात आले आणि तिथं बांधलेली मामलतदाराची कचेरी १८३७ साली मंडणगडला पाठवले गेले. बाणकोटजवळ असलेले वेळास गाव ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे याबद्दलचा दर्याफिरस्ती ब्लॉग नक्की वाचा. वेळास हे नाना फडणवीस यांचे मूळ गाव. गावात रामेश्वर आणि कालभैरवाचे सुंदर मंदिर आहे. बाणकोटला हरिहरेश्वर जवळील बागमांडला हून फेरीने सावित्री नदी ओलांडून पोहोचता येते. माणगावहून आंबेत पूल मंडणगड मार्गेही बाणकोटला पोहोचणे शक्य आहे. बाणकोट मुंबईहून माणगाव-आंबेत मार्गे २२२ किमी अंतरावर आहे तर पुणे-ताम्हिणी-बाणकोट हे अंतर १९६ किमी आहे. मार्च महिन्यात कासव महोत्सवाला जोडून इथं येऊ शकता.
संदर्भ –
रत्नागिरी जिल्हा गॅझेट
रायगड जिल्हा गॅझेट
महाराष्ट्र राज्य पाटबंधारे विभाग