कुडे-मांदाडच्या शिल्पवैभवाचं वर्णन करणाऱ्या या मालिकेत आपण पहिल्या भागात लेणी क्रमांक १ ते ६ चा आढावा घेणार आहोत.
इसवी सनाच्या 500 वर्ष पूर्वीपासूनचा इतिहास आपल्याला रायगड जिल्ह्याच्या बाबतीत लिखित स्वरूपात किंवा कोणत्या ना कोणत्या साधनांच्या स्वरूपात सापडतो. अपरांत या नावाने प्रसिद्ध असलेल्या या भागामध्ये चौल, महाड, घोडेगाव, राजपुरी, घारापुरी, अशी अनेक प्रसिद्ध ठिकाणे होती. पेरीप्लस सारख्या ग्रंथामध्ये या नावांचे उल्लेख सापडतात. सातवाहन, मौर्य, त्रिकुटक, कलचुरी, कोकणचे मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, बहामनी, आणि गुजरातचे सुलतान; तसेच अहमदनगरची निजामशाही, पोर्तुगीज, सिद्धी, स्वराज्य आणि नंतर ब्रिटिश राजवटी या भागांमध्ये सत्ताधीश होत्या. या इतिहासाचा मागोवा घेत असताना बौद्धकालीन लेण्यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. कुलाबा गॅझेटच्या 1883 आणि 1964 मध्ये प्रकाशित आवृत्यांमध्ये कुडा मांदाड, आंबिवली, ठाणाळे, कोंडाणे अशा विविध लेण्यांची माहिती सापडते. त्यापैकी कुडे-मांदाड लेण्यांची चित्रकथा आज आपण पाहणार आहोत. या ब्लॉग मधील ऐतिहासिक माहिती रायगड जिल्हा गॅझेट मधून घेण्यात आली आहे.

जंजिऱ्या जवळील दंडा-राजपुरी पासून काही अंतरावर आणि मांदाड खाडीच्या एका उपखाडी जवळ साधारणपणे 70 मीटर उंचीच्या डोंगराच्या पश्चिम उतारावर ही लेणी आहेत यामध्ये 26 बौद्ध गुफा आणि अकरा पाण्याची टाकी आहेत. 200 मीटर अंतराच्या व्याप्तीत ही लेणी असून, पहिली पंधरा खालच्या रांगेत तर 16 ते 26 वरच्या रांगेत आहेत इथून समोरच खाडीचा सुंदर देखावा दिसतो. अनेक शतके समुद्रावरून येणारे वारे आणि कोकणात पडणारा मुसळधार पाऊस यांचे तडाखे झेलत ही लेणी उभी आहेत त्यामुळे काही शिलालेख थोडेसे अस्पष्ट झाले असले तरीही बरेचसे शिलालेख वाचता येतात आणि या लेण्यांचा इतिहास उघड करतात. 2018 सालात एका सकाळी मी तिथे प्रथम गेलो तेव्हा कोकणातून रिक्षाने भ्रमंती करणारे एक पाश्चात्त्य टोळके आम्हाला भेटले होते.

हे भिक्षुकांसाठी एक महत्त्वाचे ज्ञान साधना आणि विश्रामाचे ठिकाण होते प्राचीन काळी राजपुरी बंदरात येणाऱ्या जहाजांचा आणि या लेण्यांचा संबंध असावा इथून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कदाचित या लेण्यांना आर्थिक मदत दिली असावी असा कयास आहे. लेण्यांपासून साधारणपणे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मांदाड गावात 1981 मध्ये डॉक्टर एस नागराजूंना लाल व काळी भांडी तसेच लाल पॉलिश असलेल्या मातीच्या भांड्यांचे काही पुरातत्त्व अवशेष मिळाले. त्यामुळे पुढे लेणींना इथल्या बंदराचा आश्रय असावा असे प्रतिपादन त्यांनी केले.

लेणे क्रमांक एक मध्ये आयताकृती चैत्यगृह आहे. स्तूपाचे गर्भगृह, अंतरदीर्घिका, सभागृह आणि सभागृहासमोर दीर्घिका असा त्याचा विन्यास आहे. प्रवेशाच्या जवळ दोन्ही बाजूला भग्न अवस्थेतील दोन अष्टकोनी स्तंभ आहेत त्यांच्यावर डमरू सारख्या प्रतिमा आहेत अशा प्रतिमा इतर लेणीतही आढळतात दीर्घिकेच्या डाव्या बाजूला देवळी आहे. बाह्यदीर्घिकेच्या भिंतीवर ती आणि सभागृह प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला प्राकृत ब्राह्मणी लिपीतील एक शिलालेख आहे


महाभोजीय सडगेरीय विजयाय पुतस महाभोजस मांदवस खंडपालीतस लेखकस सुलसदत उतरदता पुतसच सीवभूतीस स: भयाय नंदाय देयधम्मम् – म्हणजे महाभोज मांदव स्कंदपालीत महाभोजी सडगेरी विजया यांच्या राजवंशातील राजांचा तसेच शिवभूती दान देणारे नंदा म्हणजे शिवभूतीची पत्नी सुलसदत म्हणजे शिवभूतीचा पिता उतरदता म्हणजे शिवभूतीची माता या नावांचा समावेश देणगीदार म्हणून करतो आहे. या लेण्याचा काळ इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या शेवटचा असावा असा अभ्यासकांचा कयास आहे.

लेणी क्रमांक दोन मध्ये प्रवेशद्वारांना लाकडी चौकटीसाठी खोबणी आहेत खोलीच्या बाहेरच्या भागात काही ठिकाणी भिंतीवर गिलाव्याचे अवशेष दिसतात लेणी क्रमांक तीन मध्ये इसवीसन 230 नंतरचा झिजलेला ब्राह्मणी शिलालेख आहे लेणी क्रमांक चार मध्ये भोजनगृह किंवा विश्रांतीगृह असावे असा अभ्यासकांचा अंदाज आहे येथील मतपा म्हणजेच मंडप हे कान्हेरी व जुन्नर शिल्प परंपरेतील असून त्याचा निर्मितीचा काळ तिसऱ्या शतकातला असावा मात्र म के ढवळीकर मानतात की इथे चैत्यगृहाची योजना असावी आणि मग नंतर ती सोडून दिली गेली असावी
लेणी क्रमांक पाच मध्ये प्राकृत ब्राह्मी तील तीन शिलालेख आहेत. पाण्याच्या टाक्यावर असलेला शिलालेख कुंडाच्या देणगी बाबत आहे शिवदत्त आणि स्वाती मित्रा यांच्या शिष्याने ही देणगी दिल्याचे नमूद केले गेले आहे. तिसरा शिलालेख दीर्घिकेच्या डाव्या भिंतीवर आहे त्याचा सारांश पुढील प्रमाणे भदंत पातीमित व भदंत आगीमित यांच्या बहिणीची मुलगी भिक्षणी नागनिका हिची मुलगी पदुमनीका तिची शिक्षा बोधी व तिची शिष्य असाल्हमिता यांची नावे देणगीदार म्हणून नमूद केली आहेत.

लेणी क्रमांक सहा वास्तू रचनेच्या दृष्टीने सगळ्यात मोठे भव्य आणि भरपूर कोरीव काम असलेले हे एक चैत्यगृह आहे. समोर मोठे अंगण आहे. दर्शनी भागात दोन हत्ती दिसतात. ते तुटले असले तरी प्रमाणबद्ध उंची आणि स्थापत्यातील कसब या दोन्हीच्या कोरीव कामात दिसते. प्रांगणातून दीर्घिकेत आपण प्रवेश करू शकतो. इथे आपल्याला दोन बाजूंना चौरसाकृती पाया असलेले दोन अष्टकोनी स्तंभ दिसतात. त्या स्तंभांच्या दोन्ही बाजूंना दोन चौरसाकृती अर्धस्तंभ आहेत आणि स्तंभ व अर्धस्तंभांच्या मध्ये समोरच्या बाजूला पाठ असलेले दोन बाक आहेत ज्यांच्या बाहेरच्या बाजूला वेदिका पद्धतीचे नक्षीकाम आहे अर्धस्तंभांवर आपल्याला डमरू सारख्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात.


डाव्या बाजूच्या हत्तीच्या मागे सुमारे 54 cm उंचीची सिंहासनावर बसलेली आणि कमळावर पाय ठेवलेली बुद्धाची मूर्ती आहे. हे कमळ एका चक्राच्या वर आहे आणि त्याच्या तीनही बाजूला तीन हरणे आहेत. कमळ नागांनी उचलून धरल्यासारखे दिसते. बुद्धाच्या दोन्ही बाजूंना कमळावर उभे असलेले दोन चामरधारी आहेत. त्यापैकी डाव्या बाजूचा अवलोकितेश्वर असून त्याने आपल्या डाव्या बाहू वर कमळाचा लांब देठ धारण केला आहे. बुद्धाच्या डोक्यावर दोन विद्याधरांनी मुकुट धरले असून त्यावर दोन्ही बाजूंनी मकरांची खंड युक्त कमान आहे. त्यावर दोन झेपावणाऱ्या आकृत्या दिसतात. डाव्या बाजूस खाली मिश्र ब्राह्मणी लिपीतील पुसट शिलालेख आहे परंतु तो नीट वाचण्याजोगा नाही असे वर्णन आपल्याला रायगड जिल्ह्याच्या गॅझेट मध्ये सापडते.

समोरच्या बाजूला 32 cm उंचीची पद्मासनात बसलेल्या गौतम बुद्धाची मूर्ती आहे तिच्या दोन्ही बाजूंना कमळावर उभे असलेले चामरधारी आहेत तिथे किन्नरांच्या ही प्रतिमा दिसतात ज्यावर बुद्ध विराजमान आहेत ते आसन साधारणतः 1.2 मीटर उंचीचे असून आसनाच्या दोन्ही बाजूच्या पायांमध्ये कमळ कोरलेले दिसते आणि कमळाच्या दोन्ही बाजूंना दोन हरणे ही कोरलेली दिसतात व्याघ्रका व उपासिका या दोन व्यक्तींनामांचा उल्लेख असलेला संस्कृत ब्राह्मणी शिलालेख तिथे दिसतो. दीर्घिकेमध्ये इतरही अनेक बुद्ध मूर्ती आणि त्यांच्या भवताली कमळ व हरणे असलेली शिल्प दिसतात.

दीर्घिकेच्या डाव्या बाजूला आपल्याला सात ओळींचा नेटकेपणाने कोरलेला प्राकृत ब्राह्मी लिपीमधील शिलालेख दिसतो. या लेखांमध्ये महाभोज मंद व स्कंदपालित राजवंशाचा उल्लेख केला आहे. सुलसदत्त व उत्तरदत्ता यांचा पुत्र शिवम आणि त्याची पत्नी विजया यांची देणगीदार म्हणून; तसेच शिवमचे पुत्र – शिवपालीत, शिवदत्त, आणि सर्पील यांची शिल्प कोरण्याची देणगी… आणि कन्या- सर्पा, शिवपालीता, शिवदत्ता व सुलसदत्ता यांच्या स्तंभांच्या देणग्या सुद्धा उल्लेखित आहेत. इथे दिसणारे दोन्ही हत्ती जेव्हा सुस्थितीत असतील तेव्हा या चैत्यगृहाचे छप्पर त्यांनी प्रभावीपणे पेलले आहे… असा आभास निर्माण होत असावा. प्रांगणातून दोनतीन पायऱ्या चढून समोरच्या दीर्घिकेत गेल्यानंतर चौरस पाया असलेले अष्टकोनी स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ दिसतात. तिथे दोन बाक असून त्याला बाहेरच्या बाजूला वेदिका पद्धतीची नक्षी दिसते. हे कोरीवकाम तिथल्या शैलीशी जुळणारे नसून ते कदाचित नंतर जोडले गेले असावे असा अभ्यासकांचा कयास आहे. इथे आपल्याला गुराखी आणि प्राण्यांच्या प्रतिमा दिसून येतात. वेदिकेवरील शिल्पात डीडीकडून उजवीकडे शार्दूलाला हाकणारा बटू दिसतो.. नंतर वाघावर शेपटी धरून बसलेला आणि काठी उगारलेला बटू तर मागे एक वाघ आहे… डाव्या बाजूला वाघाची शेपूट पकडलेला बटू (बुटका गुराखी) हत्ती, हरिण अशा आकृत्या दिसतात.

अर्धस्तंभांवर डमरू सारख्या प्रतिमा दिसतात. डाव्या बाजूच्या अर्धस्तंभाच्या आतमधल्या बाजूस आपण नीट पाहिलं तर आपल्याला कोरीव शिल्पकाम दिसते. त्यात वरती साधारणपणे 22 सेंटीमीटर उंचीची पद्मासनातील बुद्ध प्रतिमा आहे. तिच्या दोन्ही बाजूंना चामरधारी आहेत. खालील भागातही वरच्या सारखीच पण 27cm उंच बुद्ध प्रतिमा आहे खालच्या प्रतिमेच्या मूर्तीत दोन्ही बाजूला गुडघे टेकलेल्या दोन मानवी आकृत्या आहेत.
दीर्घिकेत उजव्या बाजूला स्तंभशीर्षाखाली साधारण 20 सेंटिमीटर उंचीच्या दोन बुद्ध प्रतिमा दिसतात. मूर्तींच्या दरम्यान एक बारीक स्तंभ असल्याने दोन कक्ष झालेले आहेत आणि त्यांच्या खालच्या बाजूस गुडघे टेकलेली दोन माणसे दिसून येतील. या उठावचित्राच्या खाली 33 सेंटिमीटर उंचीची सिंहासनावर आरूढ आणि कमळावर पाय ठेवून बसलेली बुद्धमूर्ती आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना चामरधारी असून त्यापैकी एक पद्मपाणी आहे. त्यावर तीन पदरी अर्धमुकुट धारी दोन विद्याधरांनी तोरण धरलेले दिसते आणि त्यावरच्या कमानीवर चार विद्याधरांनी माळा उचललेली दिसते. बुद्धाचा पाय ज्या कमळावर विसावलेला आहे तिथे अनेक कमळे आहेत. मुख्य कमळाचे देठ निरखून पाहिले तर त्याच्या डाव्या बाजूला हरिण आणि काहीतरी अर्पण करणारा गुडघे टेकलेला माणूस आणि मागे त्याच्यासारखीच गुडघे टेकून बसलेली स्त्री दिसते. उजव्या बाजूला तीन हरणे आणि अर्धस्तंभांच्या पायाशी एक अर्ध वर्तुळाकार जागा आहे. तिथे नक्षीवर संस्कृत ब्राह्मी लिपीतील शिलालेख कोरलेला दिसतो – पिता माता आणि पूर्ण जगाला सर्वोच्च ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने एका शाक्य भिक्षूने दिलेली देणगी नोंदवणे आहे.

अर्धस्तंभांच्या दोन्ही बाजूंना कार्ले आणि कान्हेरी सारखी दिसणारी मिथुन शिल्पे आहेत. त्यांच्या कोरीवकामाचा दर्जा मात्र तुलनेने कमी असल्याचे अभ्यासक मानतात. संशोधकांच्या दृष्टीने गुराखी आणि प्राण्यांची शिल्पे पश्चिम भारतात गौतमीपुत्र सातकर्णी याच्या काळात कोरली गेली असावीत.. इथे मात्र हा आकृतिबंध कमी प्रकाशाच्या ठिकाणी नक्कल म्हणून आल्यासारखा भासतो.


डावीकडील मिथुन शिल्पातील पुरुष 1.6 मीटर उंच तर स्त्री 1.55 मी. उंच आहे. डावीकडील शिल्पातील महिलेचे पाय चेपणार मुलगा दिसतो, त्याच्या डोक्यावर तिचा डावा हात आहे. पुरुषाने उंच पागोटे, कानात मोठी कर्ण कुंडले, हातात कडे, भुजेवर अलंकार, पायघोळ निऱ्या असलेला कटिअंबर आणि कंबरपट्टा परिधान केलेला आहे, ज्याचा सोगाही दिसतो. त्याचा डावा हात उचलेलला आहे तर उजवा कमरेवर आहे. स्त्रीने गोलाकार मुकुट घातला आहे, तिच्याही कानात मोठी कर्णकुंडले दिसतात आणि पायात मोठाले पैंजण. तिचा उजवा हात तिच्या नितंबावर आहे. उजवीकडे असलेल्या मिथुन शिल्पात पुरुष 1.7 मीटर उंच तर स्त्री 1.5 मीटर उंचीची आहे. पुरुषाचे पागोटे आठ पदरी आहे. त्याने कर्णकुंडले, मनगट्या आणि बाहुभूषणे घातलेली दिसतात. कटिअंबर उंची वस्त्राचे वाटते तर आणि कमरबंदाचा सोगा डावीकडे लोंबकळताना दिसतो. महिलेचा मुकुट उच्च दर्जाचा आहे असे अभ्यासक मानतात.. कपाळावर दोन पट्ट्या दिसतात. त्यापैकी एक केसांची वेणी तर दुसरी रिबन सदृश गोष्ट वाटते. स्त्रीचा उजवा हात उंचावलेला असून त्यात तीन कमळे आहेत. हातात आणि गळ्यात दागिने नाहीत पण मोठी कर्णभूषणे, कमरपट्टा आणि पायांत दोन मोठी पैंजणे दिसतात.

सभागृहात दोन्ही बाजूच्या भिंतींवर अर्ध्या टप्प्यापासून पुढे कोरीव शिल्पकाम केलेले दिसते डाव्या बाजूला आपल्याला एकंदरीत तीन शिल्पपट दिसतात. 1) इथे वरच्या बाजूला साधारण 23 सेंटीमीटर उंचीच्या चार बुद्ध प्रतिमा आहेत त्या सगळ्या पद्मासन आणि ध्यानाच्या मुद्रेत आहेत या शिल्पाखाली दोन उठाव चित्रे दिसतात ती एका स्तंभाने विभक्त केली गेली आहेत याच्यात 32 ते 33 सेंटीमीटर उंचीच्या सिंहासनावर बसलेल्या कमळावर पाय ठेवलेल्या बुद्ध प्रतिमा आहेत. बुद्धाच्या दोन्ही बाजूला मुकुटधारी विद्याधर आणि मकराची कमान आहे चार विद्याधरांजवळ पुष्पमाला आहेत बुद्धाचे पाय विसावलेल्या कमळाखाली दोन हरणे व गुडघे टेकलेल्या दहा मानवी आकृत्या आहेत चार डाव्या बाजूला आणि सहा उजव्या बाजूला त्याच्याखाली तावदानांसारख्या चौकटींमध्ये हरणांची जोडी आणि किर्तीमुख प्रतिमा दिसतात 2) दुसऱ्या शिल्पपटात जो पायाजवळ आहे इथे 70 cm उंचीची कमळाच्या आसनावर पद्मासनात बसली बुद्ध प्रतिमा दिसते. हिच्या दोन्ही बाजूला चामरधारी आहेत. डावीकडच्या चामरधाऱ्याने डाव्या हातात उत्तरीय धरले आहे तर उजवीकडचा चामरधारी पद्मपाणी आहे. त्यावर साधी कमान आणि दोन्ही बाजूंना गुडघे टेकलेले दोन विद्याधर आहेत. डाव्या विद्याधराच्या हातात काहीतरी पदार्थ आणि उजव्या विद्याधराच्या हातात फुल किंवा फळ आहे. त्यांच्या खाली दोन्ही बाजूंना नागाच्या प्रतिमा असून त्यांनी ते मुख्य कमळ उचलून धरले आहे यांच्या खाली गुडघे टेकलेल्या पाच आकृती आहेत त्यातला दोन डाव्या आणि तीन उजव्या बाजूला आहेत. 3) तिसरा शिल्पपट मध्यभागी आहे यात बाह्य गोल उठावात कोरलेला एक स्तूप दिसतो. स्तूपाच्या खाली कमळावर 40 सेंटीमीटर आसपास उंचीची ध्यानमुद्रातील बुद्ध प्रतिमा दिसते तिच्या उजव्या बाजूस चामरधारी उभा दिसतो तिन्ही शिल्प पटांवर रंगांचे अवशेष दिसतात.

जवीकडच्या भिंतीतही तीन शिल्पपट दिसतात 1) डाव्या बाजूच्या शिल्प पटात 75 cm उंचीची कमलावर आरुड पद्मासनात बसलेली बुद्ध प्रतिमा असून तिच्या दोन्ही बाजूला कमळांवर दोन चामरधारी उभे आहेत. वरची कमान साधीच असून दोन्ही बाजूला दोन विद्याधरांनी तोरण धरलेले दिसते बुद्धाच्या प्रतिमेच्या खाली मुख्य कमळाच्या दोन्ही बाजूंना एका गुडघ्यावर असलेल्या दोन नागांनी कमळाचा देठ उचललेला दिसतो त्यांच्यामागे गुडघे टेकून बसलेल्या दोन नागकन्या आहेत त्यांच्या मागच्या बाजूस एक महिला आणि तिच्या मागे एक पुरुष गुडघा टेकलेल्या अवस्थेत आहे डाव्या बाजूला खाली उत्कृष्ट मिश्र ब्राह्मणी लिपीतील पाच ओळींचा एक शिलालेख आहे त्याचा सारांश पुढील प्रमाणे – शाक्य भिक्षु बुद्ध सिंह याने पिता माता व पूर्ण जगास सर्वोच्च ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून देणगी दिल्याचे नमूद करणे आहे.

2) मधला शिल्प पटात पहिल्या शिल्पपाटा प्रमाणेच बुद्ध प्रतिमा आणि त्याखालील उठाव चित्रे दिसतात इथे डाव्या बाजूला नागकन्या आणि चामरधारी यांच्यामध्ये मिश्र ब्राह्मी लिपीतील एक शिलालेख असून तो उजव्या बाजूची नागरिकांना आणि चामरधारी यांच्यामधील जागेत सलग कोरलेला आहे त्याचा सारांश शाक्य भिक्खू संघदेव याची मूर्ती व दिवा लावण्यासाठी चेंडित शेत याची देणगी नमूद केली आहे.

3) शेवटच्या शिल्पपटात वरच्या बाजूला सत्तेचाळीस सेंटीमीटर उंचीची कमळावर बसलेली पद्मासनातली बुद्ध प्रतिमा आहे. इथेही प्रतिमे खाली पहिल्या आणि मधला शिल्पपटांच्या प्रमाणेच उठाव चित्रे दिसू शकतात हा पट थोडासा अरुंद आहे

आतली दीर्घिका सभागृहापेक्षा सुमारे 60 सेंटीमीटर उंचावर आहे इथे डाव्या भिंतीमध्ये साध्या खोलीत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे आणि उजव्या भिंती लगत ओट्यावर वस्तू ठेवण्याचा कोनाडा आहे. मागच्या भिंतीत मध्यभागी स्तूपाच्या गर्भगृहात जाण्यासाठी चौकोनी दार आहे. गर्भगृह पाच मीटर रुंद सहा मीटर लांब आणि तीन मीटर उंच आहे इथे मध्यभागी 2.2 मीटर व्यासाचा स्तूप असून तो बारीक तीन स्तरांच्या बैठकीवर आहे. स्तूपाच्या अधिष्ठानाची बाजू सरळ उभी असून त्याची किनार वेदिका पट्टीसारख्या सुशोभित नक्षीने सजवलेली दिसते. स्तूपावरचे अंड गोलाकार असून तिथेही वेदिका नक्षीकाम असलेली चौरसाकृती हर्मिका आहे. हर्मिकेच्या वर पायऱ्यांचे पिरामिडच्या आकाराचे शीर्ष आणि त्यावर छत्राची यष्टि आहे. छत्र वर्तुळाकार आहे आणि ते छतात कोरलेले आहे. पुरातत्व अभ्यासक मानतात की लेणी क्रमांक सहा ची रचना, कुड्याची पहिली गुहा, महाड मधील आठवी आणि नाशिकच्या सातव्या गुफा यांच्याशी साधर्म्य सांगणारी आहे. पाळांसारखे पाठ असलेले बाक, चौरसाकृती पाया असलेले साधे अष्टकोनी स्तंभ, अर्धस्तंभ व डमरूच्या प्रतिमा यावरून हे लेणे यज्ञश्री सातकर्णी या काळातील, किंवा त्यानंतरच्या काळातील असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. अशी वैशिष्ट्ये कान्हेरी आणि नाशिक लेणी समूहात आढळतात. कुड्यातील या लेण्याची रचना तिसऱ्या शतकाच्या शेवटी किंवा चौथ्या शतकाच्या सुरुवातीला झाली असावी. इथल्या इतर लेण्यांची माहिती आपण पुढील काही भागांमध्ये पाहणार आहोत.