
The grand elephant at Gharapuri recreated by Amol Thakur
पावसाळा यावेळी खूपच उशीरा संपलाय आणि गुलाबी थंडीचे (मुंबईत जितपत थंड असू शकते) दिवस अजूनही दूर आहेत. त्यामुळे कोकणात लांबच्या प्रवासाला निघायला अजून दीड महिना तरी वेळ आहे … पण आपली मुंबई कोकणातच आहे की! आणि मुंबईच्या परिसरात पुरातन वास्तूंच्या टाइम मशीनमध्ये बसून प्रवास करण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. एके काळी मुंबई शहर मुंबई म्हणून प्रसिद्ध नव्हतं … टॉलेमीने त्याला सात बेटांचे शहर म्हणून हेप्टानेशिया असे नाव ठेवले होते … मुंबईपासून काही मैलांच्या अंतरावर समुद्रात श्रीपुरी म्हणून प्रसिद्ध असे एक बेट होते … व्यापाराची समृद्ध बाजारपेठ म्हणून या शहराची कीर्ती युरोप पर्यंत पोहोचली होती … इथल्या गजांत लक्ष्मीचे प्रतीक म्हणून कदाचित बांधलेला एक प्रचंड दगडी हत्ती अनेक शतके या बेटाची ओळख होता. आजही आपण त्या बेटावर सफर करायला जाऊ शकतो .. विश्व वारसा स्थळांच्या यादीत जागा पटकावलेलं बेट घारापुरी म्हणजेच एलिफंटा … दगडात खोदून काढलेल्या लेण्यांच्या या बेटावर आज मी तुम्हाला नेणार आहे.

Elephanta seen from ferry
एलिफंटा लेण्यांची निर्मिती जोगेश्वरी नंतर ५० वर्षांनी म्हणजे सहाव्या शतकाच्या सुरुवातीला झाली (स्टोरीज इन स्टोन – डॉक्टर सूरज पंडित) सातवाहन आणि वाकाटक काळातील महत्वाचे व्यापारी ठाणे इथे होते. उत्तर कोकणची राजधानी म्हणून पुढे प्रसिद्ध झालेल्या या पुरी बेटावर इसवीसनपूर्व दुसऱ्या ते चौथ्या शतकात रोमन जहाजे येत असत हे इथं सापडलेल्या रोमन कुंभावरून सिद्ध झाले आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या जेटीवरून सकाळची पहिली बोट पकडून आम्ही निघालो … सोबतीला अनेक सीगल पक्षी होतेच … मुंबई बंदरातून बाहेर पडलेल्या आणि नांगर टाकायला जागेची वाट पाहणाऱ्या अनेक अजस्त्र बोटी सभोवार दिसत होत्या … एका प्रचंड बोटीने माझं लक्ष वेधून घेतलं! आम्ही नशीबवान कारण काहीच दिवसात नौदलातून निवृत्त केल्या जाणाऱ्या आयएनएस विराटचं दर्शन आम्हाला झालं.

INS Virat
बोटीने सुमारे सव्वा तास प्रवास केल्यावर जवाहर द्वीपाला वळसा घालून घारापुरी बेटाच्या जेट्टीला आपली लाँच पोहोचते. कांदळवनांनी म्हणजे मॅन्ग्रोव्हजनी या बेटाला वेढले आहे. विमानातून मुंबईत येत असताना कधीकधी न्हावा-शेवा बंदराच्या शेजारीच या बेटाचे दर्शन होते. बेटाच्या मध्यभागी दोन टेकड्या आहेत त्यापैकी पश्चिमेकडील टेकडीच्या पायथ्याशी लेणी आहेत. जेटीपासून सुमारे १०-१२ मिनिटे चालत गेल्यावर आपण गुफांपाशी पोहोचतो. वाटेत दुतर्फा दुकानांच्या रांगा आहेत. सुमारे १२०० कोळी समाजातील लोक इथले रहिवासी असून फक्त त्यांनाच इथे मुक्काम करता येतो. पर्यटकांना राहण्याची परवानगी नाही.

Elephanta and JNPT port, clicked from a flight about to land in Mumbai
या गुफांची निर्मिती नक्की कोणी केली हे नक्की सांगता येत नाही. काही इतिहासकार कोकण मौर्यांना एलिफंटाचे निर्माते मानतात. पण इतक्या मोठ्या शिल्पाच्या निर्मितीसाठी लागणारी समृद्धी कोकण मौर्यांकडे असणे शक्य नसल्याने जोगेश्वरी गुफांची निर्मिती करणारे कलचुरी घराणे एलिफंटाचेही निर्माते असावेत असे वॉल्टर स्पिंक सारखे तज्ज्ञ मानतात. कलचुरी राजे पाशुपत पंथीय होते आणि शिवाच्या लकुलीश रुपाची मूर्ती एलिफंटात सापडल्याने इथे पाशुपत पंथाशी नातं असल्याचं स्पष्ट होतं. जोगेश्वरी लेण्याशी रचनेत आणि शिल्पांच्या बातबीत साम्य असल्याने या दाव्याला बळ मिळते असे अनेक इतिहासकार मानतात. वॉल्टर स्पिंक आणि कार्ल खंडाळावाला यांच्यात एलिफंटाच्या निर्मात्यावरून झालेला वाद रंजक आहे. ब्लॉगच्या शेवटी आपण त्याचा आढावा घेऊच. एलिफंटाच्या मुख्य गुंफेत शंकराची पिंडी असलेला एक चौकोनी गाभारा जरी असला तरीही एकंदर रचना व आराखडा एखाद्या म्युझिअमच्या गॅलेरीप्रमाणे आहे. खांबांच्या सभामंडपातून चालताना एक एक शिल्प विशिष्ट ठिकाणी उभे राहून पाहायचे. मध्ययुगीन काळात जेव्हा युरोपियन लोकांनी ही लेणी पाहिली तेव्हा त्यांना हे अपौरूषेय आणि जादुई वाटलं. डोम जोआओ दि कॅस्ट्रो म्हणतो की हे हिंदू लेणे इतके सुंदर आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी शिल्पे बनवणं माणसाच्या कुवतीपलीकडची गोष्ट भासते.
वेरूळच्या दुमार लेण्याशीही साम्य असल्याचे आपल्याला एलिफंटाच्या मुख्य गुहेत जाणवते. ढवलीकरांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे इथली शिल्पशैली वाकाटक-गुप्त प्रभावाखाली निर्माण झालेली असून तिच्यावर गांधार शैलीचेही संस्कार आहेत. सिंध मधील मिरपूरखासला असलेल्या चौकोनी स्तूपाप्रमाणेच एलिफंटाच्या मुख्य गुफेचा आराखडा असल्याचे दिसते. कान्हेरीच्या बाबतीत सिंध प्रदेशही संपर्क प्रस्थापित झाल्याचे पुरावे असल्याने हे शक्य वाटते.

Fluted columns with cushion capitals
सगळ्यात आधी माझं लक्ष वेधून घेतलं ते इथल्या खांबांनी. सुंदर भौमितीय रचना असलेले हे खांब बऱ्याच प्रमाणात जोगेश्वरी लेण्याशी साधर्म्य दाखवतात हे खरं आहे. कदाचित त्याच कारागिरांनी हे बांधकाम केलं असण्याची शक्यता असेल. चौकोनी पाया त्यावर गोल रेखीव स्तर आणि मग कॉलम कॅपिटल … या खांबांच्या टोकावर असलेल्या गणेशमूर्ती त्यांना एक वेगळे सौंदर्य देतात.

Sadashiva – the eternal Shiva
महाराष्ट्र टुरिझमचं बोधचिन्ह असलेली इथली महेशमूर्ती हे या लेण्यातील सर्वात प्रसिद्ध शिल्प आहे. अनेक जण याला ब्रम्हा-विष्णू-महेश समजतात पण खरंतर ही शिवाचीच विविध रूपे आहेत. पाहणाऱ्याच्या दिशेने विचार केला तर डावीकडची मूर्ती भैरवाची आहे … हे शिवाचं उग्र संहारक रूप आहे. तर मधला चेहरा शांत, ध्यानस्थ तत्पुरुषाचा आहे. उजवीकडील चेहरा वामदेवाचा म्हणजे सृष्टीचं पोषण करणाऱ्या शिवरुपाचा आहे. शिवाचं चौथं रूप मागील बाजूस आहे असा विचार करून कोरलेलं नाही तर पाचवं रूप पाहण्याची कुवत सामान्य माणसात नाही अशी मान्यता आहे.

Door keepers with dwarfs
१२ फुटांपेक्षा जास्त उंचीचे द्वारपाल या ठिकाणी दिसतात, त्यांच्याबरोबर उंचीने खुजे आयुधपुरुष दिसतात. हत्यार जेव्हा मानवी रूप घेते तेव्हा त्याला आयुधपुरुष म्हटले जाते.

Kalyanasundara
शिव-पार्वतीच्या विवाहाचा क्षण चितारण्यात आला आहे कल्याणसुंदर शिवाच्या देखाव्यात. उमा किंवा पार्वती विवाहासाठी तयार असून लाजऱ्या वधूला वडील राजा हिमवान धीर देत असलेला दिसतो. विवाहासाठी ब्रह्म पुरोहिताच्या भूमिकेत आहे शिवाय विष्णू, पार्वतीचा भाऊ मैनाक आणि इतर देवताही तिथं आहेत.

Ardhanarishvara
ब्रम्हाने ब्रह्मांडाची निर्मिती करताना प्रथम फक्त पुरुषच तयार केला पण प्रजनन काही पुरुषाला जमेना. आख्यायिका अशी आहे की शंकराने ब्रम्हाला स्त्रीत्वाचे माहात्म्य पटवून देण्यासाठी अर्धनारीश्वराचे रूप घेतले. जवळजवळ १७ फूट उंचीचे हे शिल्प उभा अक्ष रेखला तर स्त्री आणि पुरुष या दोन भागात विभागलेले दिसते. नाजूक स्त्री, कमनीय बांधा तर नाग धारण केलेला राकट सशक्त पुरुष जो एक हात नंदीवर टेकून उभा आहे. सभोवताली इतर अनेक देवी-देवता दिसतात. कमळावर स्वार ब्रम्हा, विष्णू, कार्तिकेय आणि गणेश. ऐरावतावर स्वार होऊन आलेला वज्र धारण केलेला इंद्र इत्यादी.

Gangadhara
शिवाचे गंगेला धारण करणारे गंगाधर रूपही इथं फार सुंदर रीतीने चितारण्यात आले आहे. एक एक शिल्प म्हणजे काळाची एक फ्रेम नसून सगळी गोष्ट उलगडणारा संच आहे हे आपल्याला लक्षात येते. सोळा फूट उंच शिव तर १२ फूट चार इंच उंचीची पार्वती. शिव आपल्या जटांतून गंगा नदीला धारण करत आहे. राजा भगीरथ प्रणाम करायला झुकला आहे. गंगेचं येणं न आवडलेली पार्वती नजर फिरवून अलिप्त उभी आहे तर शिव एका हाताने तिला अलगद स्पर्श करून आश्वस्त करत आहे… असा हा देखावा. इथंही ब्रह्म, विष्णू, इंद्र हा सर्व देखावा पाहताना दिसतात.

Andhakasura Vadha
शिव-भैरवाचे उग्र रूप आपल्याला दिसते ते अंधकासूर राक्षसाच्या वधाचा प्रसंग दाखवणाऱ्या शिल्पात. आठ हातांची शिवमूर्ती हत्यारबंद आहे आणि लढाईत दिसणारी क्रोधीत मुद्रा आपल्याला दिसते. या राक्षसाला ब्रम्हाने असा वर दिला होता की याला मारू पाहताना याच्या रक्ताचा थेंब जोवर जमिनीवर पडत राहील तोवर त्याला जीवन मिळत राहील. त्यामुळे त्याचे रक्त जमिनीवर पडू नये यासाठी एका हातात वाडगा शिवाने धारण केलाय आणि देवी चामुंडा हे रक्त पिण्यासाठी तयार आहे. एकूण आठ हातांपैकी पाच तुटले आहेत. एका हातात मोठी तलवार आहे, एका हातात युद्धाची वर्दी देणारी घंटा तर एका हातात अंधकासुराचा साथीदार असलेल्या नील हत्तीचे डोके पकडले आहे. शिवाच्या मस्तकावरील नाग-मुंडके आणि चंद्रकोर हे पाशुपत पंथातील रचनेचे वैशिष्ट्य मानले जाते. इथं खांद्यावर मुंडक्यांची मालिकाही दिसते.

Natesha
नटेश किंवा नटराज हे शिवाचे एक लोभस रूप .. इथं तांडव करणारा शिव आपल्याला पाहायला मिळतो. त्याबरोबरच शिवाला तांडव करताना कौतुकाने पाहणारी पार्वतीही सोबत आहे.

Ravananugraha
नवरा बायको म्हणजे भांडणं तर होणारच, रुसवे-फुगवे तर असणारच. अशाच एका क्षणी पार्वती रुसलेली असताना उन्मत्त रावणाने कैलास उचलण्याचा प्रयत्न केला. कैलास पर्वताला हादरे बसल्याने शिवाचे आसन डळमळले आणि पार्वती गोंधळून गेली पण शिवावर याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याने शांतपणे रावणाला चिरडून टाकायला सुरुवात केली. गर्वहरण झालेल्या रावणाने शिवाचे आशीर्वाद मिळवून जीव वाचवला आणि शिव-पार्वतीचे भांडण सोडवल्याने त्यावर शिवाची कृपा झाली अशी आख्यायिका आहे. आपल्याकडे पाठ केलेला रावण जोर लावतोय आणि शिव अतिशय शांतपणे चलबिचल न करता त्याला विफल करतोय असं हे बोलकं शिल्प.

Kartikeya & Ganesh
पूर्वेकडील भागात गणेश आणि कार्तिकेय यांची शिल्पं आहेत शिवाय अजून एक गर्भगृह आहे ज्यात शिवलिंग आहे आणि बाहेर सिंहशिल्पे दिसतात. जुन्या तटबंदी सुद्धा सापडल्या आहेत. काही गुंफांमध्ये स्तंभांची लयबद्ध कविता अजूनही शाबूत आहे तर काही ठिकाणी पडझड होऊन कातळाचे अंतरंग दिसू लागले आहेत. ही सारी शिल्पं कोणत्या राजवटीने बनवली, कोण कारागीर या कामात होते, रचना कोणी केली असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत … ज्यांच्याबद्दल अनेक कयास मांडले गेले आहेत. शैली पाहता हे काम सहाव्या शतकाच्या सुरुवातीला झालेले असावे. इथं असलेला एक शिलालेख अर्थ लावण्यासाठी पोर्तुगालला नेण्यात आला अशी नोंद सापडते पण पुढे त्याचा काही पत्ता लागत नाही. इथल्या एका शिवमूर्तीवरून मात्र पाशुपत पंथाशी संलग्नतेला बळ मिळते. ती म्हणजे योगीश्वर किंवा लकुलीश रूपातील शिवमूर्ती.
कमळाच्या आसनावर योगमुद्रेत बसलेला शिव आणि त्या आसनाला तोलून धरणारे नाग असं धीर-गंभीर दृश्य या शिल्पात आपल्याला दिसतंय. गौतम बुद्धाचीही अशी अनेक शिल्पं आहेत. कान्हेरीत श्रवस्तीच्या चमत्कारावरील देखाव्यात असा बुद्ध आपल्याला दिसतो. ही लकुलीश मूर्ती हे पाशुपत पंथाचं खास वैशिष्ट्य मानलं जातं. अभोणच्या ताम्रपटावर सापडलेल्या उल्लेखाप्रमाणे कलचुरी राजा कृष्णराजा हा पाशुपत पंथाला मानणारा राजा होता. त्याचा कृष्णराज रूपक नावाचा चांदीचा रुपया होता त्याची तांब्याचीही नाणी होती. ही नाणी मोठ्या संख्येत घारापुरीला सापडली. शोभना गोखलेंच्या मते ही खास कारीगरांना वेतन देण्यासाठी पाडलेली होती. वॉल्टर स्पिंकच्या मते कलचुरींचे राज्य या भागात सातव्या शतकापर्यंत होते तेव्हा एलिफंटाचे निर्माते कलचुरी ठरतात. जोगेश्वरी लेणेही त्यांचेच असल्याने या थियरीला पुष्टी मिळते.
कार्ल खंडाळावाला आणि हिरानंद शास्त्री यांच्यामते एलिफंटाची बांधणी कोकण मौर्यांनी केली. घारापुरीचे मौर्य बंदर किंवा मोराबंदर याच नावाने प्रसिद्ध झाले. ६३४ CE मध्ये कोरलेल्या ऐहोळे येथील मेगुती मंदिरातील शिलालेखानुसार – पुलकेशी दुसरा याचा पिता कीर्तिवर्मन (५६७-५९८CE ) याने कोकण मौर्यांचा पुरी बेटाला नाविक वेढा घालून पराभव केला असे आपल्याला समजते. याआधारे कोकण मौर्यांना एलिफंटाचे निर्माते मानलं गेलं आहे. तेव्हा ही लेणी नक्की कोणी बांधली या वादावर काही निर्णायक पडदा पडलेला नाही. पण पाशुपत पंथाशी नातं आणि एलिफंटाची भव्यता पाहता; वॉल्टर स्पिंकची कलचुरी थियरी मला तरी जास्त मजबूत वाटते.

Canon on West Hill

fortification
पुढे हे ठिकाण पोर्तुगीजांच्या ताब्यात आले १५३४CE ला तेव्हा इथं वस्ती नव्हती. त्यांनी इथं बरीच नासधूस केली. अनेक शिल्पांवर बंदुका डागून त्यांना विद्रुप केलं गेलं. जॉन फ्रायर, ओविंग्टन सारख्या अनेक ब्रिटिश प्रवासी बखरकारांनी पोर्तुगीजांना इथे विध्वंस करण्यासाठी जबाबदार धरले आहे. डे कूटो ने सुद्धा याची पुष्टी केली आहे. सहाव्या गुंफेचं चर्चमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचीही नोंद सापडते. मंडपेश्वरला तसं झालंही आहे. १५५०CE ला इथं गुरांचे गोठे आणि साचलेले पाणी दिसले असं गारचिया दि ओर्टाच्या लिखाणात सापडतं. घारापूरीला सतराव्या शतकात शिवाजी महाराज आणि संभाजी येऊन गेल्याचं सांगितलं जातं.

View from Gun Hill
आम्हाला गन हिलवर दोन प्रचंड मोठ्या तोफा दिसल्या. दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तिथून राजबंदर आणि पुरी गावाचं सुंदर दृश्य दिसतं. मागे लगेचच नाव्हाशेवा बंदराच्या क्रेनही दिसतात. या बेटाला गोड्या पाण्याचा पुरवठा एका प्राचीन झऱ्याने केला जातो जो आजही वाहता आहे आणि त्यावर बांध आहे. तोफांच्या खाली त्यांना फिरवता यावे म्हणून काही जागा आहे. ती पाहावी म्हणून पायऱ्या उतरलो तर आम्हाला कुतूहल जागृत करेल असे काही सापडले.

opening for light

Passage under cannon
या भुयारांबद्दल अधिक अंदाज तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. शत्रूवर भडिमार करताना दारुगोळा आणायला आणि दोन मोर्चाच्या मध्ये ये जा सुरक्षितपणे करता यावी म्हणून कदाचित ही भुयारे बांधली गेली असावीत. मुंबईच्या आसपासच्या समुद्रावर टेहेळणी करायला या ठाण्याचा उपयोग होत असावा असं वाटतं. तेव्हा एलिफंटा कसं असेल याची थोडीफार कल्पना काही ब्रिटिश चित्रकारांच्या चित्रांतून येते. ही सर्व लेणी आज भग्न असली तरीही त्यांचं सौंदर्य आपल्याला मोहित करतं. त्या कारागिरांनी काय हत्यारे आणि संदर्भ वापरून हे सर्व घडवलं असेल असा विचार करून स्तिमित व्हायला होतं.

Drawn by Sir Harry Francis Colville Darell

Elephant at Raj Bandar
या द्वीपाचे नाव ज्या हत्तीवरून पडले तो हत्ती इथून नेण्याचा प्रयत्न केला गेला. क्रेन तुटली व मूर्ती पडून भंगली. या अजस्त्र दगडी हत्तीला जमेल तसे जोडून भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या आवारात राणीच्या बागेजवळ ठेवण्यात आले आहे. पुरी बंदरात हा हत्ती कसा दिसत असेल याचा अंदाज आपल्याला ब्रिटिशकालीन चित्र पाहून काही प्रमाणात येतो.
मुंबईच्या इतिहासात आपण सहाव्या शतकापर्यंत मागे गेलो आहोत. मंडपेश्वर आणि जोगेश्वरी लेण्यांचा आढावा घेताना आपण काही वर्षे अजून मागे जाऊ … आणि नंतर कान्हेरीच्या आणि सोपाऱ्याच्या शोधात आपण पोहोचू इसवीसनपूर्व काळात. उत्तर मुंबईत बौद्ध लेणी आहेत तर एलिफंटा व परळला सापडलेली शिवमूर्ती पहिली तर दक्षिण मुंबईत शैव मंदिरे जास्त होती असं लक्षात येतं. शिलाहार कालीन बाणगंगा तलाव आणि पुढं १७-१८ व्या शतकात पुनरुज्जीवन केलेली मंदिरे पाहताना आपल्याला टाइम मशीनमध्ये बरंच मागे-पुढे फिरायचं आहे. अजून मुंबई सोडलीही नाही पण संस्कृती आणि इतिहासाच्या बाबतीत आपण मोठा प्रवास करूनही आलो नाही का?
संदर्भ –
भारताचे संस्कृती वैभव – शोभना गोखले,
Stories in Stone – Dr. Suraj Pandit,
Cultural Heritage of Mumbai – Dr. M K Dhavalikar,
Elephanta – George Michell