
कोकण किनाऱ्यावरील एक छोटंसं गाव कोंडुरा. चिं. त्र्यं. खानोलकर म्हणजे आरती प्रभू यांच्या कादंबरीतून अजरामर झालेलं, त्यावर आधारलेला शाम बेनेगल यांचा चित्रपटही आहे. खानोलकरांच्या गूढ लेखनातून उभ्या राहणाऱ्या विश्वाचा नायक म्हणजे रौद्र, गंभीर, रम्य असलेला निसर्ग. साहित्यातून वाचलेली, कथांमधून ऐकलेली गावांची नावं आपल्याला आमंत्रण देत असतात. एखादी कथा कादंबरी वाचत असताना जे चित्रविश्व आपण मनात उभे करत असतो, त्याला प्रेरित करणारं खरं ठिकाण कसं असेल हे पाहण्याची स्वाभाविक उत्सुकता आपल्याला असतेच. जिम कॉर्बेटच्या शिकार कथा वाचताना रुद्रप्रयाग, ठाक, काठगोदाम, चौगड अशा ठिकाणांबद्दल आकर्षण आणि उत्सुकता निर्माण झाली. कोंडुराच्या समुद्रकिनाऱ्याबद्दलही माझ्या मनात हीच भावना होती. कसं असेल हे ठिकाण? माझ्या मनात रंगवलं आहे त्या चित्रात दिसतं तसंच असेल का? हा विचार करत करत मी कोंडुराची वाट शोधत निघालो होतो. वेंगुर्ल्याच्या उत्तरेला दाभोळी-वायंगणी नावाचा अतिशय सुंदर, स्वच्छ, शांत सागरतीर आहे. आणि त्याच्या उत्तरेला एका डोंगराच्या पल्याड आहे कोंडुरा गाव. आणि तिथून कच्च्या वाटेने पाव किलोमीटर उतरून गेलं की आपल्याला हे सागररत्न गवसते.

अनेक पुस्तकांमधून या ठिकाणी जाण्याची वाट दुर्गम आहे असं लिहिलं आहे. हा अतिशय छोटा समुद्रकिनारा दोन टेकड्यांच्या मध्ये आहे त्यामुळे तिथं पोहोचण्यासाठी तीव्र उताराची वाट शेवटच्या २०० मीटर मध्ये पार करावी लागते. पण हल्ली अगदी शेवटपर्यंत वाहन जाऊ लागले आहे. रस्त्यातील शेवटचा टप्पा मी गेलो तेव्हा कच्चा आणि खूप उतार असलेला होता, तसेच डांबरीकरण झालेले नसल्याने दगडधोंडे आणि लाल माती असलेली घसाऱ्याची वाट यावर गाडी घालण्यापेक्षा मी ती वर गावात पार्क केली आणि सुमारे पाव किलोमीटर अंतर चालत गेलो. दहा मिनिटांपेक्षा कमी वेळात मी कोंडुरा किनाऱ्यावर पोहोचलो होतो.

तिथं महादेवाचं मंदिर आहे. नुकताच जीर्णोद्धार झाल्याने शहरी धाटणीचे दिसणारे हे मंदिर त्या ठिकाणी कालसुसंगत वाटेना. कोकणात हा anachronism चा त्रासदायक अनुभव पुन्हा पुन्हा येत राहतो. पण त्याकडे जमेल तितकं दुर्लक्ष करून पुढे जायचं. अशा ठिकाणी गाडीवाट असणे हे गावकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक जरी असलं तरीही पर्यटक जर इथं गाड्या भरून आले तर इथं जी काही गोंगाटमय जत्रा भरेल आणि कचऱ्याची जी काही रांगोळी होईल ती कल्पना करूनच कापरं भरलं. मी तुम्हाला इथं नेतोय खरा पण मला वचन द्या की तुम्ही सुजाण विवेकी पर्यटक असलं काहीही करणार नाही.

कोकणातील तीन जिल्हे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग… पण प्रत्येक जिल्ह्यात निसर्गाचं, समुद्राचं रूप निराळं. रायगड जिल्ह्यातले समुद्र किनारे साधेपणाने लक्ष वेधून घेणारे.. रत्नागिरीत निळ्याशार समुद्राच्या जोडीने आपण भेटतो राकट डोंगरकड्यांना आणि गर्द वनराईला.. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र निसर्गाच्या किमयेची विविधता ही शब्दांनी वर्णन करण्याच्या आवाक्याबाहेरची आहे. मी काढलेल्या फोटोंमधून, व्हिडिओंमधून मी तुम्हाला या विश्वाचं भौतिक रूप दाखवू शकेन. पण अनुभवाची चौथी मिती ना लेखनातून साध्य होते ना फोटोंतून. कदाचित एखाद्या कसलेल्या चित्रकाराने तिथं काही दिवस राहून करामत केली तर इथं असण्याच्या अनुभवाची झलक तरी मिळेल. मंदिरासमोर माझं सामान ठेवून मी अनवाणीच किनाऱ्यावर उतरलो.

किनारा अगदी छोटासाच. नजरेच्या कोनात मावेल असा.. अथांग सागराला भरभरून मिठी मारता येईल असं मला क्षणभर वाटलं. ओहोटी लागली होती. आणि वाळूतला ओलेपणा पावलांना थंडावा देत होता. रेशमी पांढऱ्या साडीला मोत्यासारखी चमक असते.. कोंडुऱ्याच्या पुळणीला हीच मोतिया चमक आहे. या किनाऱ्यावर असलेल्या माडांपैकी काही उंच ताठ उभे आहेत, तर काही वाकून जमिनीच्या दिशेने वळलेले आहेत. मी गेलो होतो तेव्हा सकाळचे दहा वाजले असतील. सूर्य माझ्या मागेच होता. नारळाच्या झावळ्यांतून झिरपणारी किरणे किनाऱ्यावर ऊन-सावलीची नक्षी रेखत होती. सूर्य जसजसा हळूहळू वर येत होता, तसतशी ही नक्षी नवीन आकार, नवीन रूप धारण करत होती.

या किनाऱ्याजवळ दगडांमध्ये एक कोंड आहे. कोंड म्हणजे गुफा. इथं खळाळत जाणारं भरतीचं पाणी धीर गंभीर आवाजात केलेल्या मंत्रोच्चारांची आठवण करून देत होतं. या किनाऱ्यावर अनेक लॅटेराइट खडक आहेत.. त्यातून वाट काढत भरतीचे पाणी किनारा भरून टाकते. आणि परत जाताना सखल भागाच्या ओंजळीत थोडे पाणी साठून राहते. किनाऱ्याला एक वेगळे सौंदर्य देते.

माझ्या मनातला कोंडुरा थोडा वेगळा होता. पण मी जे प्रत्यक्ष पाहिलं ते कल्पनेतून जास्त मोहक होतं. दर्या फिरस्ती करत असताना रेवसपासून तेरेखोलपर्यंत मी जवळजवळ सव्वाशे समुद्रकिनारे पाहिले आहेत. या सगळ्यांबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात. असं वाटतं की आपल्या शब्दांतून कोकणातील निसर्गसौंदर्याची विविधता मांडणे अशक्य आहे. माझं प्रवासवर्णन फक्त साक्ष आहे माझ्या अनुभवाची. आणि तुम्हाला हाक आहे ही अपरान्तभूमी अनुभवण्यासाठी येण्याची