
पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सम्मानित श्री दशरथ पटेल हे अभिकल्पना (डिझाईन) व कलेच्या क्षेत्रातील एक फार मोठे नाव. या दिग्गज कलाकाराच्या कामाची झलक पाहायची असेल तर अलिबागजवळ असलेलं रेवस रोडवरील हे संग्रहालय पाहायलाच हवं. गायतोंडे, तय्यब मेहता, एम एफ हुसेन अशा थोर कलाकारांचे समकालीन असलेल्या दशरथ पटेलांनी हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, चार्ल्स एम्स, हेन्री कार्तिए ब्रेसॉ, लुई कान, फ्रेई ऑटो अशा अनेक मान्यवर कलाकारांबरोबर काम केलेलं आहे.

दशरथ पटेलांनी अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन येथे संस्थापक सचिव म्हणून अनेक वर्षे महत्वाची कामगिरी पार पाडली. पटेलांचा जन्म १९२७ साली गुजरात मधील सोजित्रा येथे झाला आणि पुढे चेन्नई मधील शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी प्रशिक्षण घेतले. तिथं श्री देबी प्रसाद रॉय चौधरी हे पटेलांचे गुरु होते. पुढे फ्रान्समधील इकोल दे ब्यू आर्टस् मध्ये त्यांनी पदव्युत्तर अभ्यास केला. चित्रकला, फोटोग्राफी, शिल्पकला, प्रोडक्ट डिझाईन अशा अनेक कलाशाखांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले.
NID मध्ये जवळजवळ दोन दशके काम केल्यानंतर दशरथ पटेलांनी वाराणसी जवळ सेवापुरी येथे रुरल डिझाईन स्कूल ची स्थापना केली. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे दशक त्यांनी अलिबागजवळ काम करण्यात व्यतीत केले आणि म्हणूनच त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे संग्रहालय रेवस अलिबाग रस्त्यावर बांधण्यात आले आहे. दशरथ पटेलांच्या कलात्मक निर्मितीची विविध उदाहरणे येथे आहेतच शिवाय एक छान कॉफी शॉप आणि भेटवस्तूंचे दुकानही या ठिकाणी आहे.