
गॉथिक बांधकाम म्हंटलं की नजरेसमोर येतात ब्रिटिश रचनेच्या भव्य दिव्य दगडी इमारती. या शैलीशी माझी ओळख इतर कोणत्याही मुंबईकराप्रमाणेच राजाबाई टॉवर, सर्वोच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठाचे दीक्षांत सभागृह अशा इमारती पाहून झाली. आता तर या इमारती विश्व वारसा स्थळांच्या यादीत गेल्या आहेत. गॉथिक बांधकाम असलेला एक राजवाडा मला अगदी अनपेक्षितपणे भूज सारख्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि मी चकित झालो होतो. आश्चर्य म्हणजे हे बांधकाम मुंबईतील गॉथिक बांधकामापेक्षा जुने आहे. तसंच कोकण भ्रमंती करत असताना दापोलीत मी एका चर्च चे भग्नावशेष पाहिले तेव्हा ते गॉथिक शैलीतील आहे हे लक्षात आलं. अनेक वर्षांपासून ही वास्तू वापरात नसली तरीही दिमाखदार वाटली. गॅझेटमधील माहितीनुसार इथं १८१८ साली सैन्य तुकडी ठेवण्यात आली आणि १८४० पर्यंत मुख्य तुकडी आणि १८५७ पर्यंत वेटेरन्स बटालियन इथं होती. ब्रिटिश लोक कॅम्प दापोलीला रत्नागिरीचे महाबळेश्वर म्हणून ओळखत. इथलं थंड आणि कोरडे हवामान त्यांना आरोग्यदायी वाटले.
दापोलीत पूर्वी ब्रिटिश सैन्याची छावणी होती म्हणजेच ब्रिटिश मिलिटरी कॅम्प होता. त्याला स्थानिक लोक काप दापोली म्हणत. इथं स्कॉटिश मिशनरी आले आणि त्यांनी काम सुरु केले. आल्फ्रेड गाडने नावाच्या स्कॉटिश धर्मगुरूच्या नावाने इथं एक प्रसिद्ध शाळाही आहे. या चर्चबद्दल मला पराग पिंपळेंच्या साद सागराची मध्ये संदर्भ सापडला. त्यातील नोंदीप्रमाणे १८१० साली लष्करी अधिकारी आणि सैनिकांच्या उपासनेसाठी रोमन गॉथिक शैलीत ही इमारत बांधली गेली आणि इथं १९३८-३९ पर्यंत उपासना नियमितपणे सुरु होती. हे चर्च इंग्लंडमधील एका चर्चच्या डिझाईनवर आधारित असून सेंट अँड्र्यूज चर्च असं या चर्चचे नाव आहे.
या चर्चच्या बेल टॉवरचे अवशेष आज दिसतात. तिथं ६ फुटी घंटा होती आणि तिचा आवाज खूप दूरवर ऐकू जात असे असं सांगितलं जातं. ही घंटा आता हुबळी येथे आहे असं समजतं. पुरंदर किल्ल्यावर अशाच प्रकारचे एक चर्च आपल्याला दिसते. गॉथिक बांधणीचे वैशिष्ट्य असलेल्या खिडक्या ज्यांना लॅन्सेट विंडो म्हंटले जाते त्या इथं दिसतात. ही वास्तू आता दुर्लक्षित असून तिची निरंतर पडझड सुरु आहे. एकेक अवशेष आणि वस्तू गायब होण्याआधी संवर्धन केलं जाण्याची गरज आहे. दापोलीपासून समुद्र किनाऱ्याच्या दिशेने हर्णेला गेलं की जवळच पाजपंढरीला अजून एक सुंदर छोटेसे चर्च आहे. त्याची गोष्ट या ब्लॉगवर वाचा. कोकणातील अद्भुत ठिकाणांची चित्र भ्रमंती करण्यासाठी दर्या फिरस्तीला भेट देत रहा.
संदर्भ – साद सागराची – पराग पिंपळे – दापोली ते दाभोळ – पृष्ठ क्रमांक २७