Darya Firasti

अंजनवेलचा गोपाळगड

वसिष्ठी नदीच्या मुखाजवळ दक्षिण तीरावर डोंगरसडा आहे. अंजनवेल गावच्या या डोंगरावर असलेला पहारेकरी म्हणजे किल्ले गोपाळगड. इथं दाभोळहून फेरी बोटीने पोहोचता येतं आणि गुहागरहून कातळवाडी मार्गे थेट किल्ल्याच्या दारापर्यंत रस्ताही आहे.

जवळच गोपाळगडाच्या पश्चिमेला बाजूला सड्यावर अंजनवेलचे दीपगृह आणि टाळकेश्वराचे शिवमंदिर सुद्धा आहे. प्राचीन काळी नदीच्या पात्रांचा उपयोग व्यापारी वाहतूक करण्यासाठी होत असे. वसिष्ठी नदीतून पूर्वेला चिपळूण पर्यंत जहाजे जाऊ शकत असत. या दळणवळणावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोपाळगडाचा उपयोग होत असे.

इतिहास – आज दिसणारा गोपाळगड हे सतराव्या शतकातील विजापुरी म्हणजे आदिलशाहीतील बांधकाम असावे. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला १६६० च्या सुमारास नव्याने बांधून बळकट केला. त्यानंतर मराठेशाहीवर मुघलांनी औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली निकराचे आक्रमण केले. स्वराज्यरक्षणाचे व्रत हाती घेतलेल्या छत्रपती संभाजी महाराजांनीही (१६८०-८९) इथं बांधकामाला बळकटी आणली. पुढे हा किल्ला जंजिऱ्याच्या सिद्दीने जिंकला. गोपाळगडावरील एक फारसी शिलालेख याबद्दल काहीतरी सांगताना दिसतो. त्या शिलालेखाचा आशय असा –

ज्या कोणी एखादी इमारत बांधली आहे तो स्वर्गवासी झाल्यावर ती दुसऱ्याची होत नाही का? केवळ अल्ला कालातीत आहे बाकी सारी माणसे मर्त्य आहेत. ज्या कृपाळू राजाने हा किल्ला बांधण्याचा संकल्प केला तो राजा हे बांधकाम पूर्णत्वाला गेलेलं पाहू शकला नाही. सिद्दी सात याने हा दुर्ग बांधला आहे. हिजरी सन ११०९ म्हणजे इसवीसन १७०७ चा शिलालेख

१६९९ साली सिद्दी खैर्यतखानाने हा किल्ला जिंकला. सिद्दी खैर्यत खानाने पडकोटाचे बांधकाम केले. पुढे १७४४ साली तुळाजी आंग्रे यांनी गोपाळगडावर निशाण फडकवले. १७५५ साली तुळाजी आंग्रेंच्या पराभवानंतर इथं पेशव्याचे शासन आले. रामजी महादेव बिवलकर याने ही कामगिरी बजावली. आणि १८१८ साली गोपाळगड इंग्लिशांच्या ताब्यात गेला. इंग्लिशांच्या वतीने २१व्या मरीन बटालियन ने सेनापती कर्नल केनेडीच्या नेतृत्वाखाली गोपाळगडावर विजय मिळवल्याचे इतिहासकार सांगतात.

रचना – किल्ल्याच्या भोवती खंदक आहे. हल्ला करणाऱ्या सैन्याला सहजपणे तटबंदीला जाऊन भिडता येऊ नये यासाठी ही रचना उपयुक्त ठरते. आज आपण जिथून किल्ल्यात प्रवेश करतो ते प्रवेशद्वार नाही. दगड आणि चुन्याने बांधलेली तटबंदी साधारण २० फूट उंच आणि ८ फूट रुंद आहे. किल्ल्याच्या आत तीन विहिरी, जुन्या बांधकामाची जोती, कोठार असे अवशेष आपण पाहू शकतो.

किल्ल्याच्या पूर्व दिशेला दरवाजा असून पहारेकऱ्यांच्या देवड्या इथं दिसतात. बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. हे किल्ल्याचे खरे प्रवेशद्वार.

महाराष्ट्र शासनाच्या बेफिकिरीमुळे हा किल्ला खाजगी मालमत्ता म्हणून घोषित केला गेला आणि आत आंब्याच्या कलमांची लागवड केली गेली. या विरोधात विविध संघटनांच्या लोकांनी आवाज उठवला. गिरिमित्र प्रतिष्ठान आणि शिवतेज प्रतिष्ठान च्या यांनी याविरोधात रान उठवल्याचे वर्तमानपत्रातील बातम्यांवरून दिसते. शेवटी या सर्वांच्या लढ्याला यश मिळाले आणि गोपाळगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केला गेला. आता किल्ल्याचे संवर्धन सुरु होऊ शकेल अशी आशा करूया.

गोपाळगड किल्ल्याबद्दल एक दंतकथा प्रसिद्ध आहे. जी मी भगवान चिले, पराग पिंपळे आणि प्र. के. घाणेकर या तिघांच्या पुस्तकात वाचली. कोणे एके काळी अंजनवेल गावात एक घोड्यांचा व्यापारी आला आणि त्याने गावातील लोकांना त्याच्याजवळ असलेल्या एका आक्रमक घोड्याला काबूत आणण्याचे आव्हान दिले.

हे आव्हान सिदनाक नावाच्या एका महार वीराने स्वीकारले आणि त्याने आपली शक्ती व कौशल्य वापरून घोड्यावर नियंत्रण मिळवले. पण त्याचा यथोचित सन्मान झाला नाही. तिथं जात आडवी आली. सिदनाकाला अपमानास्पद वागणूक मिळाली. हा घोड्यांचा व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीचा हस्तक होता आणि त्याने गोपाळगड जिंकून देण्यात इंग्लिश सैन्याला मदत केली. या कथेला ऐतिहासिक आधार नाही, पण आपल्याकडे अनेक गोष्टी मौखिक परंपरेने जपलेल्या आहेत त्यामुळे त्याची दखल घेणे आणि अंतर्मुख होऊन त्याबद्दल विचार करणे गरजेचे ठरते.

किल्ल्याच्या मुख्य तटबंदीपासून बंदराकडे जाणाऱ्या भागात पडकोट बांधला गेला आहे. समुद्राच्या दिशेने शत्रूकडून धोका पोहोचू नये म्हणून अनेक जलदुर्गांमध्ये असं पडकोटाचं बांधकाम केलेलं आपल्याला दिसतं

किल्ल्याचे बांधकाम समतल जमिनीवर न करता डोंगराच्या उतारावर केलेले असल्याने बुरुजांना जोडणाऱ्या तटबंदीवर पायऱ्यांची रचना केलेली आहे. बांधकामावर माजलेल्या झाडोऱ्यातून वाट काढत गडफेरी करायला अर्धा तास लागतो.

गोपाळगड किल्ल्यावर भटकंतीचा अनुभव घेत असताना अचानकपणे आजच्या आधुनिक जीवनाची आठवण करून देणारे दृश्य आपल्याला दिसते. ते म्हणजे एनरॉन कारखान्याची धुरांडी.

पश्चिमेकडील तटबंदीवरुन अथांग सागराचे दृश्य मोहक दिसते. इथं बसून सूर्यास्त पाहणे ही एक खास पर्वणीच असते. निळ्याशार सागरावर दिवस मावळतीला येतो तेव्हा सूर्यबिंबाचे तेज सौम्य होत जाते आणि तांबड्या नारिंगी रंगाची तबकडी क्षितीजावर अस्ताला जाते. आपला इतिहासातील प्रवास संपवून आपण गुहागर किंवा दाभोळच्या दिशेने निघतो.

टाळकेश्वर मंदिरा शेजारीच अंजनवेलचे दीपगृह आहे. तिथून सभोवताली सुंदर देखावा दिसतो. जवळच डॉल्फिन पॉईंट नावाचा कडा आहे. तिथं रुंद पायवाटेने जाऊन उंच कडे आणि फेसाळता समुद्र मनसोक्त पाहावा! या अनुभवाचे वर्णन दर्याफिरस्तीत पुन्हा कधीतरी! जयगड किल्ल्याची अशीच चित्रभ्रमंती करायची असेल या ब्लॉगला भेट द्या. कोकण किनाऱ्यावरील विलक्षण ठिकाणांची माहिती आणि फोटो पाहायला दर्या फिरस्ती साईटला भेट देत रहा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: