
अलिबागच्या कुलाबा किल्ल्याचा हा उपदुर्ग. मुख्य किल्ल्याला संरक्षण देणारा. दगडांच्या चिऱ्यांच्या राशी रचून पाच बुरुजांचे हे बांधकाम केले गेले आहे. आज्ञापत्रात सांगितल्याप्रमाणे कुलाब्याजवळचा खडकाळ भाग तटबंदी उभारून सुरक्षित केला गेला आहे. जेणेकरून या जागेचा वापर करून किल्ल्यावर हल्ला करता येऊ नये. दगडांच्या पुलाने किंवा आजच्या भाषेत कॉजवे बांधून सर्जेकोट आणि कुलाब्याला जोडले गेले आहे. हे बांधकाम छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात झाले आहे असे इतिहासकार मानतात.



हा किल्ला छोटासाच आहे. सुमारे २७ मीटर x २७ मीटर च्या चौरस भागात हे बांधकाम केलेलं आपल्याला दिसतं. पाच बुरुजांच्या तटबंदीला उत्तरेकडून प्रवेश आहे. तिथं आता दाराची चौकट तेवढी शिल्लक असल्याचे दिसते. दारात दगडांची रास असल्याने काळजीपूर्वक आत जावे. दगड ओले असतील किंवा शेवाळे असेल तर घसरण्याची शक्यता असते. आत गेल्यानंतर एक विहीरही आपल्याला दिसते. तिथं खूप झाडोरा माजला आहे. पायऱ्या वापरून तटबंदीवर गेलं की पूर्वेला अलिबाग शहर पश्चिमेला अथांग समुद्र, दक्षिणेला कुलाबा किल्ला आणि तिथं असलेलं कांदळवन आणि उत्तरेला दूर क्षितिजावर खांदेरी आणि उंदेरी किल्ल्याचे ठिपके आपण पाहू शकतो.

भरती ओहोटीच्या वेळा सांभाळून सर्जेकोट आणि कुलाबा किल्ले पाहायचे आहेत. हल्ली बोटीने भरतीच्या वेळेला किल्ल्यावर सोडले जाते. ओहोटी असेल तर चालत जाता येते. पण स्थानिकांना विचारून जाणे केव्हाही उत्तम. सोपे गणित म्हणजे तिथीच्या पाऊण पट वेळ ही पूर्ण भरतीची वेळ असते. त्यानंतर ३ तासांनी ओहोटी लागते. आणि पुढचे साधारण दोन तास किल्ला पाहता येऊ शकतो.


कुलाबा किल्ल्यावरील सर्व ठिकाणे आणि सर्जेकोट एकाच खेपेत पाहायचे असेल तर मात्र वेळेचे नियोजन पाळून ही ठिकाणे पाहावी लागतील. कुलाबा किल्ल्याची सविस्तर माहिती तुम्हाला या स्वतंत्र ब्लॉगमध्ये पाहता येईल. कोकण किनाऱ्यावरील विविध ठिकाणांची माहिती आणि फोटो पाहण्यासाठी दर्या फिरस्तीला भेट देत रहा हे अगत्याचं आमंत्रण.
मला कुलाबा या किल्ल्याचा नकाशा भेटल का भेटल्यास मला सांगा