
मराठ्यांच्या स्वराज्याचे चिलखत म्हणजे दुर्ग … मग ते सह्याद्रीच्या दुर्गम शिखरांवर तैनात डोंगरी किल्ले असोत किंवा अथांग सागरावर निधड्या छातीने पहारा देणारे जलदुर्ग … आणि या जलदुर्गांपैकी एक प्रचंड, अभेद्य आणि विशाल दुर्ग म्हणजे विजयदुर्ग. भारताच्या पश्चिम किनारपट्टीचे व्यापारी आणि सामरिक महत्त्व फार मोठे. वाघोटण नदीच्या मुखाशी गिर्ये गावाजवळ हा किल्ला आजही मोठ्या दिमाखात उभा आहे… शिलाहार राजांच्या काळात १२ व्या शतकाच्या अखेरीस या दुर्गाची बांधणी झाली असे इतिहासकार मानतात… डोम जो कॅस्ट्रो आणि तावर्निए सारख्या प्रवाशांनी आदिलशाहीचा भक्कम किल्ला म्हणून याला वाखाणले. टॉलेमी आणि पेरिप्लस ने विजयदुर्गाचा उल्लेख बायझंटियम असा केला आहे

विजयदुर्गाची चित्रकथा व्हिडीओ रूपात पाहायची असेल तर या लिंकला जरूर भेट द्या.

तीन बाजूंनी समुद्राने घेरलेला म्हणून घेरिया असे नाव असलेला हा किल्ला. छत्रपती शिवरायांनी १६५३ मध्ये विजय संवत्सरात जिंकला आणि त्याचं बारसं झालं – विजयदुर्ग … आणि मग तिहेरी तटबंदी आणि २७ भक्कम बुरुज बांधून शिवरायांनी किल्ला बळवंत केला … मारुतीच्या मंदिराकडून किल्ल्यात प्रवेश करायचा … जीबीच्या दरवाजातून या दुर्गशिल्पात दाखल व्हायचे. तटबंदीवर युद्धात झेललेल्या जखमांचे व्रण आजही दिसतात … मूळ किल्ला ५ एकरांचा होता … शिवरायांनी त्याचा विस्तार १७ एकर क्षेत्रफळात केला

गोमुख दरवाजा पटकन दृष्टीस पडत नाही, आणि संरक्षक बुरुजांच्या धाकाखाली शत्रूला इथं प्रवेश करणे सोपे नसे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर दिसते ती सदर … सरखेल कान्होजी आंग्रेंच्या काळापासून .. तुळाजी आंग्रे व सरदार धुळपांपर्यंत विविध लढवैय्यांनी इथं कामकाज पाहिले असेल … खूबलढा बुरुज हा सदरे समोरचा एक मोठा बुरुज … वाघोटण नदी वर नजर ठेवणारा …

इथं दारूचं कोठार पाहून मग भुयाराकडे जायचं … शस्त्रे अन दारुगोळा लढत्या बुरुजाकडे नेताना या भुयाराचे संरक्षण सैनिकांना मिळत असे.. पूर्व दिशेच्या झरोक्यातून या भुयारात येणारा प्रकाश पाहणे हा एक अद्भुत अनुभव असतो… खूबलढा बुरुजावरून दिसतात बंदुका आणि तीरांचा मारा करण्यासाठीच्या जंग्या … आणि समुद्राला भिडलेल्या बुरुजांची मालिका … जांभा दगडात बांधलेली ही तटबंदी मराठा दुर्गबांधणीचे वैभव दाखवते.. तटबंदी च्या पायाशी असलेल्या दगडांच्या राशी … लाटांचे प्रहार झेलतात .. पूर्वेकडील तटावरून सकाळच्या वेळेला वाघोटन नदीचे चंदेरी पाणी दिसते… निळ्या सागरात मासेमारीला निघालेली होडी दिसते जैतापूरचा डोंगरकडा सागराला जाऊन भिडलेला दिसतो आणि माडबन-बाकाळे चा सुंदर समुद्र किनाराही दिसतो…

विजयदुर्गाच्या वायव्य दिशेला समुद्रात पाण्याखाली बांधलेली भिंत आहे … या शिवकालीन भिंतीला धडकून शत्रूची कैक जहाजे रसातळाला गेली. कमांडर विजय गुपचुप आणि डॉ शील त्रिपाठी यांनी या अनोख्या भिंतीबद्दल संशोधन केले आहे. या ठिकाणी दगडी नांगर, हत्यार म्हणून वापरल्या जाणाऱ्या लोखंडी बेचक्या आणि काही मातीची भांडी असे अवशेष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या संशोधनात सापडले आहेत.पश्चिमेकडे दूर समुद्रात आंग्रे बँक नावाची प्रवाळांची उंची आहे, जिथं समुद्राची खोली अचानक कमी होते.. विजयदुर्गाच्या वायव्य दिशेला समुद्रात पाण्याखाली बांधलेली भिंत आहे … या शिवकालीन भिंतीला धडकून शत्रूची कैक जहाजे रसातळाला गेली. कमांडर विजय गुपचुप आणि डॉ शील त्रिपाठी यांनी या अनोख्या भिंतीबद्दल संशोधन केले आहे. या ठिकाणी दगडी नांगर, हत्यार म्हणून वापरल्या जाणाऱ्या लोखंडी बेचक्या आणि काही मातीची भांडी असे अवशेष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या संशोधनात सापडले आहेत.पश्चिमेकडे दूर समुद्रात आंग्रे बँक नावाची प्रवाळांची उंची आहे, जिथं समुद्राची खोली अचानक कमी होते.. यावरही एनआयओ च्या संशोधकांनी डायविंग करून बरीच माहिती घेतली आहे.
या अभेद्य किल्ल्याला इंग्लिश आरमाराने पूर्वेकडील जिब्राल्टर असा किताब दिला होता…
आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरता आरमार अवश्यमेव करावे
या शब्दांत छत्रपती शिवरायांनी आरमाराचा संकल्प मांडला. सरखेल कान्होजी आंग्रेंच्या काळात मराठा आरमाराचा दरारा पश्चिम किनाऱ्यावर निर्माण झाला… १७१८ साली चार्ल्स ब्राऊन आणि मॅन्युअल डी कॅस्ट्रो च्या इंग्लिश आरमारी हल्ल्याला २०० माणसे गमावून पराभव पत्करावा लागला. पुढे १७२० मध्ये ब्राऊनने पुन्हा विजयदुर्ग मोहीम काढली… किल्लेदार रुद्राजी अनंतांनी ब्रिटिशांना पुन्हा एकदा पराभूत केले. १७५३ साली डचांच्या प्रबळ आरमाराचा तुळाजी आंग्रेंनी विजयदुर्गाजवळ पराभव केला.. १७५६ साली मात्र आंग्रेंच्या आरमारावर इंग्रजांशी संधान बांधून हल्ला करण्याचा नानासाहेब पेशव्याने निर्णय घेतला. आंग्ऱ्यांचे आरमार नष्ट केले गेले आणि विजयदुर्ग काही काळ इंग्रजांच्या ताब्यात गेला… विजयदुर्ग किल्ल्याच्या आणि मराठ्यांच्या इतिहासातील आत्मघाताचा एक कलंकित क्षण म्हणून ही घटना नोंदली गेली आहे..

सदरेजवळच खलबतखाना आहे… कितीतरी मोहिमांचा साक्षीदार … माडीच्या बुरुजातून समुद्र किनाऱ्याची पुळण आणि गाव दिसते… तीन मजली बुरुजांचे रूप भव्य आहे.. या भग्न अवशेषांतूनही विजयदुर्गाचे वैभव आजही दिसते.. गर्द झाडीत पाण्याची टाकी आणि एखादं तुळशी वृंदावन नजरेस पडते … भवानी आईला नमन केल्यानंतर समोर दिसते ती जखिणीची तोफ … ही बांगडी पद्धतीची तोफ आहे

आणि हेलियम वायूबद्दलचे संशोधन करण्यासाठी निरीक्षणे केली गेली ते साहेबाचे ओटे ..१८६८ साली झालेलं खग्रास सूर्यग्रहण निरीक्षण करण्यासाठी नॉर्मन लॉकियर ने या ठिकाणाची निवड केली होती.

किल्ल्यातील उंचवट्यावर ब्रिटिश काळात बांधलेलं विश्रामगृह आहे … तिथंच खोदून काढलेला एक प्रचंड तलावही आहे … या चिरेबंदी हौदात आज पाण्याचा एक थेंबही दिसत नाही

गणेश हनुमंत शिखरा सर्जा मनरंजन अशा नावाच्या बुरुजांची पाहणी करायला एक किलोमीटर लांब गडफेरी केली पाहिजे …तिन्ही बाजूने सागराची विविध रूपे आपल्याला खुणावत राहतात … सागर निळाई कितीही पाहिली तरीही मन तृप्त होत नाही.. वाघोटन नदीवर दीस मावळतीला येतो … आणि दांडेवाडीच्या किनाऱ्यावरून घेरीयाच्या पलीकडे सूर्य अस्ताला जाताना दिसतो …

विजयदुर्ग किल्ला नीट पाहण्यासाठी किमान दोन दिवस तरी हवेत. किल्ल्यासमोरील जेटीवरून फायबर बोटीतून व्यवस्थित सुरक्षा जॅकेट घालून किल्ल्याला पाण्यातून फेरी मारून पाहता येते. हा अनुभवही अवश्य घ्यावा. जवळच गिर्ये गावात वाघोटन नदीच्या किनारी असलेली आंग्रेकालीन जेटी आवर्जून पाहण्यासारखी आहे. रामेश्वर मंदिरही जरूर पाहायला हवे. कोकण किनाऱ्याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आमच्या दर्या फिरस्ती संकेत स्थळाला भेट देत रहा.
Good info
विजयदुर्ग मनात साठवून ठेवलेला, रामेश्वर मंदिर तर खासच!
या मंदिर परिसरात एक समाधी देखिल आहे.