
सकाळी सहाची वेळ. होळीचे मार्चमधील दिवस म्हणजे हिवाळा जाऊन उन्हाळ्याच्या सुरुवातीचा काळ. पण कोकण किनाऱ्यावरील या निवांत गावामध्ये अजूनही थंडावा आसमंतात दरवळतच होता. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर टोकाला वेळास गाव आहे. सावित्री नदीच्या मुखाशी बाणकोट किल्ल्याजवळ हे गाव आहे. दोन रस्ते आणि दुतर्फा घरे एवढाच या आटोपशीर गावाचा पसारा. गावातील घरे ओलांडून मी बांधावर आलो. रस्ता पुढे टेकडीवरून भारजा नदीच्या मुखाशी जातो त्याला डावीकडे सोडून छोट्या पुलाजवळ खाली उतरून बांधावरून चालत समुद्र किनाऱ्याकडे जायचं. सकाळची वेळ असली तरीही अनेक गाड्या पार्क झालेल्या दिसल्या. काहीजण टॉर्च घेऊन लगबगीने किनाऱ्याकडे निघालेले दिसले. सुमारे अर्धा किलोमीटर चालत गेल्यानंतर वेळासची पुळण येते. काळ्या मातीच्या पुळणीवर आज दीडदोनशे लोकांनी गर्दी केलेली दिसली. ऑलिव्ह रिडले कासवांच्या इवल्याशा पिल्लांना अरब समुद्रात सोडण्याचा सोहळा पाहायला ही पर्यटक मंडळी आलेली होती. तिथं किनाऱ्यावरच जाळी लावून आतमध्ये कासवांच्या घरट्यांतील अंडी सुरक्षित ठेवण्यात आली होती. आणि आज त्यातून किती पिल्ले अंडी फोडून आयुष्याचा श्रीगणेशा करायला तयार आहेत हे पाहायला पर्यटक उत्सुक होते. निसर्ग संवर्धन, पर्यावरण पूरक पर्यटन आणि यांच्या मिलाफातून स्वयंरोजगार याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोकण किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडली कासवांचे संवर्धन आणि त्यामध्ये असलेला स्थानिकांचा सहभाग. वेळासजवळच डोंगरावर बाणकोट किल्ला नक्की पाहायला हवा. बाणकोट किल्ल्याबद्दलचा दर्या फिरस्ती ब्लॉग वाचायला विसरू नका.

ऑलिव्ह रिडले प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे या कासवाच्या अनेक माद्या एखादा किनारा निवडून त्यावर अनेक अंडी घालतात आणि अशी अनेक घरटी एकाच किनाऱ्यावर बांधली जातात. समुद्री कासवांपैकी हे संख्येने जास्त आढळणारे कासव जरी असले तरीही त्यांचा आकडा मासेमारी, प्रदूषण अशा अनेक कारणांनी घटत चालला असून IUCN वर्गीकरणात त्यांना vulnerable म्हणजे धोका असलेली प्रजाती म्हणून सूचित केलं गेलं आहे.

ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या कवचामुळे त्यांना हे नाव दिलं गेलं असावं. पूर्ण वाढ झाल्यानंतर ही कासवे साधारणपणे २ फूट लांब आणि ५० किलो वजनाची होतात. ही कासवे मांसाहारी असतात. यांचे खाद्य म्हणजे जेलीफिश, मासे, त्यांची अंडी, कालवं, गोगलगायी खेकडे इत्यादी. त्यांचे संपूर्ण आयुष्य खोल समुद्रात जाते आणि अन्न शोधणे व प्रजननन यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास ही कासवे आयुष्यभर करतात. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे अंडी घालण्यासाठी मादी त्याच किनाऱ्यावर येते जिथं अंड्यातून ती पिल्लू म्हणून बाहेर पडलेली असते. ५-७ दिवसांच्या कालावधीत अनेक माद्या ठरलेल्या किनाऱ्यावर येतात आणि सुमारे अर्धा फूट खोल खड्डा खणून एकावेळी ८० ते १२० अंडी घालतात. तज्ज्ञ असे मानतात की अंडी फोडून बाहेर पडलेल्या १ हजार पिल्लांपैकी एकच प्रौढ कासव म्हणून जगते. ही पिल्ले ४५-६० दिवसांच्या अंतराने अंड्यांतून बाहेर पडतात आणि मग समुद्र किनाऱ्यावरून काही मीटर्स चा प्रवास करून सागरात आपल्या आयुष्याचा श्रीगणेशा करतात. किनाऱ्यावरून पाण्यात जाणारी पिल्ले कोल्हे, कुत्रे, खेकडे, तरस, शिकारी पक्षी यांच्या भक्षस्थानी पडतात. त्यामुळे अनेकदा मादी एका हंगामात दोनदा अंडीही देते.

ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन खूप मोठ्या प्रमाणावर ओदिशा राज्याच्या किनाऱ्यावर होते. महाराष्ट्रात हे प्रमाण तितकं मोठं नसलं तरीही सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने लावलेल्या संवर्धनाच्या रोपट्याचा आता वृक्ष झाला आहे हे नक्की. आता हे काम गावखडी, आंजर्ले, कोळथरे, केळशी अशा ठिकाणीही वाढले आहे. मादीने अंडी घातल्यानंतर ही अंडी जाळीने संरक्षित केलेल्या हॅचरीत आणून ती दोन महिने जपावी लागतात आणि मग पुढं यातून पिल्ले बाहेर येतील त्याप्रमाणे काळजीपूर्वक समुद्रात सोडावी लागतात. गावकरी हे काम आनंदाने करतात. यासाठी किनाऱ्यावर रात्रभर गस्त घालण्याची मेहनतही घ्यावी लागते. पण यातून पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना मिळत आहे ही एक मोठी सकारात्मक गोष्ट आहे.

भाऊ काटदरे यांच्या सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने कासवेच नव्हे तर गिधाडे, कोकणातील सागरी गरुड, खवलेमांजर अशा इतर प्राण्यांच्या संवर्धनासाठीही भरीव प्रयत्न केले आहेत. मोहन उपाध्येंसारखे तरुण पर्यावरणप्रेमी वेळास, आंजर्ले अशा अनेक ठिकाणी उत्साहाने कार्यरत असल्याने चित्र आशादायी आहे. काही प्रमाणात या प्रयत्नांना वन विभागाकडून साथ मिळते आहे. पण अजून खूप काही करावं लागणार आहे कोकणाची जैवविविधता जपण्यासाठी. खाणकाम, ऊर्जा उद्योग, रासायनिक उद्योग, बंदरे असे अनेक उद्योग कोकणात येऊ घातले आहेत आणि त्यांच्यामुळे कोकणाची निसर्गसंपदा धोक्यात येऊ शकते ही काळजी अतिशय रास्त आहे. त्याचवेळेला औद्योगिक विकास, नोकऱ्यांची उपलब्धता, राष्ट्रीय हित असेही मुद्दे महत्त्वाचे आहेत. या द्वंद्वाकडे पाहताना निसर्गपूरक पर्यटन हा उत्तम पर्याय समोर येतो आहे.

ग्रामस्थांच्या सहभागातून गोष्टी घडत असल्याने हे विकासाचे समाजाभिमुख मॉडेल मानता येऊ शकते. परंतु यावेळी असं लक्षात आलं की जी एकात्म भावना गावात २०१२-१३ ला मी पाहिली होती त्याच्या जागी आता स्थानिक राजकारणाने शिरकाव केला आहे. पर्यटकांची संख्या वाढणे ही चांगली गोष्ट आहे पण त्याबरोबर जबाबदारी आणि काळजीही वाढते. मुंबईतही वर्सोवा किनारा साफ केला गेला त्यानंतर एक वर्ष ऑलिव्ह रिडले कासवाचे एक घरटे बांधले गेले आणि काही कासवांची पिल्लेही सोडण्यात आली पण कचरा पुन्हा परतून आला आणि पुढील वर्षी ऑलिव्ह रिडले कासवांचे प्रजनन इथं सुरु राहिले नाही.

भारतीय पर्यटकांची एकंदर प्रवृत्ती पाहता पर्यावरणाला पर्यटन उद्योगाचा काहीही धोका नाही असं म्हणणं धाडसाचं होईल. जिथं गाड्या पोहोचतात तिथं खूप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, वेफर्स वगैरे गोष्टींची वेष्टणे, दारूच्या बाटल्या यांचा कचरा पसरू लागतो. हा प्रकार मी पद्मदुर्ग सारखा समुद्रातील किल्ला, माडबन बाकाळे सारखे तुलनेने कमी गर्दीचे समुद्रकिनारे वगैरे ठिकाणी वाढलेला पाहिला. वेळासच्या नितांत सुंदर समुद्र किनाऱ्यावर सुद्धा हा प्रकार यावेळेला दिसला. किनाऱ्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्या फेकणाऱ्या लोकांना हटकले तर कचरा उचलण्याऐवजी शिवीगाळ आणि उर्मटपणे वाद घालणे हीच प्रतिक्रिया पाहायला मिळाली. वास्तविक पाहता पुळण सुरु होते तिथंच कचरापेट्यांची सोय आहे. आणि गाड्या घेऊन येणारे लोक स्वतःबरोबर कचरा परतही घेऊन जाऊ शकतात.

समुद्रात सोडलेल्या पिल्लांचे फोटो काढत असताना अनेकदा सूचना देऊनही फ्लॅश सुरूच होते. हल्ली ऑटो मोडमध्ये फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफर लोकांची संख्या इतकी वाढली आहे की आपल्या कॅमेराचा फ्लॅश कसा बंद करायचा हेही यांना समजत नाही. पुण्याहून युनायटेड ट्रॅव्हलर्स ऑफ इंडिया नावाचा एक समूह आला होता. त्यांच्या लोकांनी किनाऱ्यावर आरडाओरडा करून इतका उच्छाद मांडला की वेळासच्या आसमंतातील शांतता, निसर्गाचा आवाज अनुभवताच आलं नाही. दर्या फिरस्ती करत असताना कोकणात अशा प्रकारचे विध्वंसक पर्यटन वाढू नये ही काळजी मात्र सतत भेडसावत राहते.

वेळास म्हणजे फक्त कासवांचेच गाव नाही. मराठेशाहीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व नाना फडणवीस यांचे ते मूळ गाव. तिथं एक पुतळा उभारून या ऐतिहासिक महापुरुषाची स्मृती जपली गेलेली आहे. गावात रामेश्वराचे सुंदर पेशवेकालीन मंदिर आहे. वेळास गावाची आणि मंदिराची गोष्ट पुन्हा केव्हातरी. कोकणातील अशाच विलक्षण अनुभवांबद्दल जाणण्यासाठी वाचत रहा दर्या फिरस्ती.
Pingback: कथा बुलंद बाणकोटाची | Darya Firasti