रत्नागिरी जिल्ह्याचा समुद्र किनारा अतिशय सुंदर. रत्नागिरी शहर सोडून दक्षिणेला निघालं की भाट्ये, गणेशगुळे, कशेळी, गावखडी अशी मोहक किनाऱ्यांची मालिकाच पाहता येते. या मार्गाने आपण आंबोळगडला येऊन पोहोचतो आणि आणि किल्ला शोधू लागतो.

अर्जुना नदीच्या मुखाजवळ आणि मुसाकाजी बंदराच्या परिसरात बांधलेला हा जलदुर्ग. आज मात्र याचे काही अवशेषच आपण पाहू शकतो. आंबोळगड गावातील बस स्थानकासमोरच एका उंचवट्यावर बुरुजाचे अवशेष आणि जुन्या बांधकामांची जोती दिसतात. पडलेली तोफ दिसते. जुन्या टाक्याचे अवशेषही दिसतात.

आंबोळगड किल्ला केवळ अवशेषरूपात शिल्लक असला तरीही गावाच्या सड्यावरून समुद्राचे जे काही दृश्य दिसते ते अवर्णनीय म्हंटले पाहिजे. लॅटेराइट च्या पठारावरून फेसाळत्या लाटा दगडांना जाऊन भिडताना पाहणे अद्भुत असते. इथं गगनगिरी महाराजांचा आश्रम आणि त्यांची तपस्येची जागा आहे.
सागराची धीरगंभीर गाज ऐकता ऐकता आपण कधी ध्यानमग्न होतो आपल्याला कळतही नाही. मी या स्वर्गीय अनुभवाचा आनंद जेमतेम १५ मिनिटे घेतला असेल तेव्हा एक शहरी टोळके गाडीत भरून इथं आले आणि पार्टी स्पीकर लावून गोंगाट सुरु केला! कोकणात पर्यटन वाढावे पण त्याला एक डोळस जबाबदार दृष्टी असावी असे मनापासून वाटते ते अशाच अनुभवांमुळे.

आंबोळगड गावात एक छोटासा चंद्रकोरीच्या आकाराचा समुद्र किनारा आहे. तो स्थानिक पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेला असतो. तिथून जैतापूर परिसराचे दृश्य फार छान दिसते. कोळी बांधवांची लगबग आणि वाळूत खेळणारे लहानगे पाहताना मन रमून जातं. पण इथं जवळच अजून तीन अप्रतिम समुद्रकिनारे आहेत. गावाला लागूनच असलेला छोटासा बंडवाडीचा किनारा पाहताना सागराचा एकांत अनुभव घेणे विलक्षण असते.
गावाला लागूनच थोडासा दुर्लक्षित असा गोडिवणे किनारा आहे. तिथं जाण्यासाठी साई मंदिर कुठं आहे असं विचारायचं आणि काही पावले चालत गेलं की आपल्याला एक सुंदर अस्पर्श किनारा अचानक खजिना सापडावा तसा आपल्याला गवसतो, ओहोटीच्या वेळेला इथून चालत वेत्येला जाता येत असलं पाहिजे असा माझा कयास आहे. पर्यटकांची गर्दी आणि गोंगाट यापासून अजूनतरी अलिप्त असलेला. सकाळी लवकर इथं येऊन ३-४ किलोमीटरची समुद्र फेरी करायला इथं यायला हवं.

आंबोळगडाहून नाटे कडे जाणाऱ्या रस्त्यावर उजवीकडे एक फाटा मुसाकाज़ी नावाच्या ठिकाणी जातो. अर्जुना नदी जिथं समुद्राला जाऊन मिळते तिथं हे अप्रतिम ठिकाण आहे.

इथल्या धक्क्यावर बसून लाटांची शांत आवर्तने आणि खळाळत्या प्रवाहाचा निनाद ऐकताना भान हरपते.

कोकणातील भटकंतीचा अनुभव घ्यायला पर्यावरण पूरक पर्यटन केंद्रांची निर्मिती व्हायला हवी. आंबोळगड जवळच नाटे येथे असलेलं गणेश रानडे यांचं गणेश ऍग्रो टुरिझम यासाठी एक उत्तम उदाहरण मानता येईल. आंबोळगड ला निवांत सुट्टीसाठी जाणार असाल तर इथंच राहण्याचा अनुभव घ्या! ही शिफारस कोणत्याही प्रायोजनाबद्दल किंवा देणगी घेऊन करत नसून इथलं नियोजन आणि दृष्टी मला आवडली म्हणून करतोय. गणेश रानडेंचा संपर्क 94224 33676, 92263 40546