शीतल कोटणीस आणि रश्मी चेंदवणकर या ब्लॉगपोस्टचे प्रायोजक आहेत. त्यांच्या सहकार्याने पद्मदुर्ग फोटोग्राफीचे काम पूर्ण होऊ शकले.

काही ठिकाणे अशी असतात जी आपण काही अंतरावरून पाहिलेली असतात. आपल्याला ती खुणावत असतात. निमंत्रण देत असतात. पण तिथं पोहोचण्याचा योग सहज येत नाही. दरवेळी ही जागा पाहण्याची उत्सुकता वाढतच राहते. असेच एक ठिकाण म्हणजे मुरुड-जंजिऱ्याच्या किनाऱ्यावरून समुद्रात दिसणारा पद्मदुर्ग किंवा कांसा किल्ला. २००१-०२ पासून मी अनेकदा मुरुडला गेलो आहे. तिथं दंडा-राजपुरी जवळ पाण्यात असलेला प्रबळ जलदुर्ग जझिरा-ए-मेहरूब म्हणजे सिद्दीचा जंजिरा सुद्धा पाहिला आहे. पण या सिद्दीच्या उरावर त्याला आव्हान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग मी पाहिला २०१८ मध्ये. पूर्वी पद्मदुर्ग कस्टम विभागाच्या ताब्यात होता असे मी काही पुस्तकांमध्ये वाचले होते. शिवाय ज्याप्रमाणे जंजिरा किंवा सिंधुदुर्ग पाहायला सतत होड्या उपलब्ध असतात तसं पद्मदुर्ग किल्ल्याचं नाही.

पण मुरुडमधील कोळी बांधवांच्या मदतीने हे घडून आलं. सकाळी दंडा-राजपुरीच्या धक्क्यावर जाऊन मी बोट पकडली. भरतीच्या लाटा उसळत होत्या. आमची बोट हळूहळू पश्चिमेकडे निघाली. डावीकडे जंजिरा किल्ल्याची भिंत किल्ल्याच्या भव्यतेची जाणीव करून देत होती. आमच्या बोटीचे नाव होते गणाधीश आणि आमचे नावाडी पक्के गणेशभक्त. त्यांचं म्हणणं असं की विघ्नहर्त्याच्या कृपेने समुद्रप्रवास निर्विघ्न होतो.

जसे जसे आम्ही खोल समुद्रात जाऊ लागलो लाटा उसळू लागल्या पाणी बोटीच्या पुढच्या भागाला आदळून आत येऊ लागले. पण आमचे नावाडी अगदी बिनधास्त होते. हा त्यांच्यासाठी रोजचा प्रवास असावा. काही वेळाने मलाही या आंदोलनांची सवय झाली आणि क्षितिजावर पद्मदुर्ग स्पष्ट दिसायला लागला. अशा प्रकारे सुमारे पाऊण तासाचा प्रवास करत आम्ही पद्मदुर्ग गाठला. किल्ल्याचा पडकोट डावीकडे आणि मुख्य भाग उजवीकडे दिसत होता. दोहोंच्या मध्ये असलेल्या भरतीच्या पाण्यात आमची होडी जाऊन थांबली. या क्षणाची काही वर्षे मी वाट पाहिली होती.

गुडघाभर पाण्यात उडी मारून उतरल्यानंतर सगळ्यात आधी ज्या गोष्टीने लक्ष वेधून घेतलं ते या किल्ल्याच्या वास्तुरचनेतील वैशिष्ट्य आहे. काही शतके लाटांच्या तडाख्याने दगडाचे चिरे झिजले आहेत पण त्या चिऱ्यांमध्ये भरलेला चुना मात्र तसाच आहे. किल्ले पाहत असताना असे बारकावे पाहणं महत्त्वाचं असतं आणि महाराष्ट्रात अनेक दुर्गभटक्यांनी विविध किल्ल्यांच्या बाबतीत अनेक गोष्टी नोंदवून ठेवलेल्या असल्याने हे रसग्रहण सोपे जाते. प्र. के घाणेकर, भगवान चिले, डॉ मिलिंद पराडकर आणि दुर्गमहर्षी गो नि दांडेकरांनी या बाबतीत किल्ले प्रेमींवर मोठीच कृपा केलेली आहे. कोकणात भटकंती करायला ज्यांना आवडते त्यांच्यासाठी पराग पिंपळे यांनी साद सागराची या नावाची काही पुस्तकांची मालिका प्रकाशित केली आहे. त्यातून कोकणातील अनेक अनवट ठिकाणांची माहिती मिळते. अशा विविध पुस्तकांतून पद्मदुर्गाचे शब्दचित्र मी वाचले होते. आज हा महत्त्वाचा जलदुर्ग याची देही याची डोळा पाहणे हा खासच अनुभव होता.

किल्ल्यावर उतरल्यानंतर डावीकडे कमळाचा आकार असलेला पडकोटाचा बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. या बुरुजावर काही तोफा पाहता येतात. या आकाराच्या रचनेमुळे किल्ल्याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे असा काही इतिहासकारांचा कयास आहे. सिद्दीचा जंजिरा जिंकण्याचे छत्रपती शिवरायांनी अनेकदा प्रयत्न केले परंतु हे त्यांचे अपूर्ण स्वप्न राहिले. पण सिद्दीच्या आरमारी शक्तीवर वचक ठेवता यावा म्हणून कांसा नावाच्या या बेटावर शिवरायांनी पद्मदुर्ग उभा केला.

हा बुरुज सोडला तर पडकोटाचे बरेचसे बांधकाम आता ढासळले आहे. पश्चिमेला एका तटबंदीचे अवशेष दिसतात आणि त्यातून भरतीचे पाणी आत येत राहते. पडकोटात किल्ल्याची मुख्य देवता कोटेश्वरी देवीचे देऊळ आहे. तिथं नमस्कार करून मग मुख्य किल्ल्यात दाखल व्हायचे.

खरंतर हा पर्यटकांना जायला तसा दुर्गम किल्ला, त्यामुळे इथं वर्दळ कमीच. पण तरीही पडकोटात आम्हाला दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या, चिप्स वगैरेची वेष्टणे असा भरपूर कचरा दिसला. आमच्या बोटीत पुष्कळ जागा असल्याने आम्ही ५-६ पोत्यांमध्ये हा कचरा भरला आणि बोटीत ठेवला. नंतर मुरुडमधील कचरापेटीत आम्ही ती पोती रिकामी केली. इतक्या रम्य जागी घाण करून लोकांना काय मिळतं कोणास ठाऊक. कोकणातील विविध विलक्षण जागांचे वर्णन लोकांसमोर आणताना हीच काळजी वाटते की उद्या पर्यटनाच्या नकाशावर ही ठिकाणे प्रसिद्ध झाली तर कचरा आणि गोंगाटाने ती बकाल होतील की काय? त्यांचे पावित्र्य आणि सौंदर्य नष्ट तर होणार नाही ना.

पडकोटाला लागूनच किल्ल्याचा मागचा दरवाजा आहे त्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूला एका ओळीत काही बराकी दिसतात. स्वातंत्र्योत्तर काळात इथं कस्टम कर्मचारी राहत असत, त्यांच्यासाठीच या बराकींची निर्मिती केली गेली असावी.

सुमारे २५ फूट उंच तटबंदीवर चढायला पायऱ्या आहेत, त्यावरून फांजीवर चढलं की संपूर्ण किल्ल्याचे उत्तम दृश्य दिसते. पूर्व दिशेला मुरुडचा समुद्रक्रिनारा आणि जंजिऱ्याच्या सिद्दीचा महाल दिसतो तर दक्षिणेला खोल समुद्रात जंजिरा किल्ला दिसतो. हा किल्ला शिवरायांनी बांधलेल्या ५ जलदुर्गांपैकी एक आहे. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा, खांदेरी आणि सुवर्णदुर्ग हे ते पाच जलदुर्ग होत.

किल्ल्यात काही जुन्या बांधकामांचे अवशेष आणि हौद दिसतात. आम्हाला फोटोग्राफीसाठी किमान दीड-दोन तास तरी लागणार आहेत याची खातरजमा करून सोबत आलेले दोघे नावाडी जरा जाऊन येतो म्हणून बोटीसकट कुठंतरी गायब झाले. आम्हाला सोडून हे कुठं निघाले या कल्पनेनं मी क्षणभर धास्तावलोच पण मोबाईल फोनवर नेटवर्क व्यवस्थित लागत असल्याने काळजी वाटली नाही. इथं एक जुनी भग्न मशिद आणि वाड्याचे अवशेष दिसतात. काही बांधकाम सिद्दीच्या काळात झाले असावे असा कयास आहे. किल्ल्यावर एकूण ४२ तोफा असून काही तोफा करंट्या पर्यटकांनी बुरुजावरून ढकलून दिल्याने किनाऱ्याजवळच्या खडकांवर पडलेल्या दिसतात.
पद्मदुर्गाचा इतिहास – शिवरायांनी सिद्दीला शह म्हणून हा किल्ला बांधायला घेतला. हे बांधकाम पूर्ण होऊ नये म्हणून सिद्दीने प्रयत्न सुरु केले पण महाराजांच्या आरमाराचा प्रमुख दौलतखान आणि त्याची नाविक तुकडी तिथं तैनात असल्याने सिद्दी हे बांधकाम थांबवू शकत नव्हता. दौलतखानाला रसद पुरवण्याची कामगिरी जिवाजी विनायक नावाच्या सरदारावर सोपवली गेली होती, परंतु त्याच्याकडून वेळेत रसद पोहोचती होईना म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची कानउघाडणी करणारे खरमरीत पत्र लिहिले. सिद्दीच्या सागरी सत्तेला आव्हान म्हणून हा दुर्ग बांधला जात असताना तुमच्याकडून जबाबदारीत दिरंगाई होत आहे म्हणजे फितुरीचा मामला तर नाही ना अशी शंका व्यक्त करत पुन्हा चूक घडल्यास ब्राम्हण म्हणून सवलत दिली जाणार नाही अशी ताकीद शिवरायांनी या पत्रात दिली आहे. त्या पत्राचा मजकूर असा.
पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत व्हावी पाणी फाटी आदिकरून सामान पावावे ते होत नाही. पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करीत असतील, आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पडाल! एवढी हरामखोरी तुम्ही कराल न कळे की हबशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हाला केले असतील, त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल तर ऐशा चाकरास ठाकेठिक केले पाहिजेत. ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो? याउपरी बोभाटा आलिया तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनीमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणोन बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे. १८ जानेवारी १६७५
पुढं छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दीला पराभूत करण्यासाठी मोरोपंत पेशवेंच्या नेतृत्वाखाली आरमार आणि फौज पाठवली. पद्मदुर्गावर तैनात कोळी लाय पाटील याने जंजिऱ्यावर छापा मारण्यासाठी साहसी योजना आखली. रात्रीच्या अंधारात लाय पाटील जंजिऱ्याच्या तटबंदीला शिड्या लावणार होते आणि मग मोरोपंतांनी पहाटे अनपेक्षित हल्ला करणारी तुकडी पाठवणे अपेक्षित होते. योजनेप्रमाणे लाय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री जंजिरा गाठून किल्ल्याच्या तटांना शिड्या लावल्या आणि मोरोपंतांच्या सैन्याची वाट पाहू लागले. परंतु सूर्योदय जवळ येऊ लागला तसा तणाव वाढू लागला. तांबडं फुटण्याची वेळ आली तरीही सैन्य न आल्याने लाय पाटीलांनी शिड्या ओढून घेतल्या व ते परतले.

आपली चूक मोरोपंतांच्या लक्षात आली आणि त्यांनी लाय पाटीलांना छत्रपती शिवाजी महाराजांकडे नेले व घडलेले प्रकरण सांगितले. शिवरायांना डाव सफल झाला नाही याबद्दल दुःख वाटले. पण लाय पाटीलांच्या शौर्याचा त्यांनी सत्कार केला व त्यांना पालखीचा सन्मान दिला. पण समुद्रावर हिंडणाऱ्या वीराला पालखीचा काय उपयोग असा विचार करून लाय पाटील सेवकास पावली असे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी पालखी नावाचे एक गलबत त्यांना बांधून देण्याची आज्ञा केली. अशाप्रकारे यश नाही मिळाले तरीही गुणवंत माणसाचा यथोचित सत्कार व्हावा याबद्दल शिवराय जागरूक असत.

किल्ल्याचे बांधकाम किल्ल्याचे बांधकाम १६७८ च्या सुमारास पूर्ण झाले असावे.. १६८४-८५ मध्ये रामाजी नाईक किल्लेदार होते.. सुभानजी मोहिते हे पद्मदुर्गाचे किल्लेदार होते. त्यानंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात पद्मदुर्ग त्यांच्याकडे होता असे दिसते. त्यांच्या पद्मदुर्गच्या किल्लेदाराने मीठाची पोती घेऊन जाणारे एक इंग्लिश जहाज पकडले असा उल्लेख कागदपत्रांमध्ये सापडतो.
१७०४ साली निळोपंत पिंगळे आणि परशुराम त्र्यंबक यांनी बहिरो पंडितांना लिहिलेल्या पात्रात उल्लेख केला आहे की शिवरायांनी पद्मदुर्गाच्या खर्चासाठी जी दोन गावे नेमून दिली आहेत ती पद्मदुर्गाच्या कारकुनाच्या हवाली केली जावीत. . पुढे 1710 मध्ये सिद्दी सुरूल खानाने हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर हा किल्ला मराठ्यांकडे कधी आला हे समजत नाही. पुढे १७६१ साली इंग्लिशांनी पद्मदुर्ग ताब्यात घेतला.

किल्ल्यातील सर्व ठिकाणे मनसोक्त पाहून मी पडकोट आणि किल्ला यांच्यामधील वाळूवर येऊन थांबलो. आमची बोट तिथं नांगरलेली मला दिसली. माझे नावाडी मधल्या वेळेत मस्त खेकडे पकडून आले होते आणि त्यांनी परतीच्या वाटेवर बोटीत हे खेकडे शिजवले आणि मीठ मसाला लावून आम्ही सर्वानी त्यावर ताव मारला. परतीच्या वाटेत भरतीच्या लाटांची आणि आमची दिशा सारखीच असल्याने आम्ही वेगाने जमिनीकडे सरकू लागलो आणि सुमारे २५ मिनिटांत आम्ही राजपुरीच्या धक्क्याला पोहोचलोही. इथं पुन्हा एकदा येण्याचा निश्चय करून मुरुडचा समुद्रकिनारा गाठला आणि गरमागरम चहा आणि मॅगी नूडल्स ची मेजवानी करता करता पद्मदुर्गाच्या जवळ होणाऱ्या सूर्यास्ताचा अनुभव घेतला. कोकणातील अशा अनेक ठिकाणांची चित्रकथा पाहायला दर्या फिरस्ती साईटला भेट देत रहा. कान्होजी आंग्रेंच्या आरमाराचे मुख्य स्थान असलेल्या कुलाबा किल्ल्याची चित्र-भ्रमंती करण्यासाठी या ब्लॉगला भेट द्या.

शीतल कोटणीस आणि रश्मी चेंदवणकर या ब्लॉगपोस्टचे प्रायोजक आहेत. त्यांच्या सहकार्याने पद्मदुर्ग फोटोग्राफीचे काम पूर्ण होऊ शकले.
Khup sundar i am proud of you brother.