
हर्णे बंदरापासून जवळच पाजपंढरी नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात गर्दी आणि गोंगाटापासून दूर एका ठिकाणी एक छोटेसे पण सुंदर चर्च आहे. स्थानिक लोकांमध्ये हे ठिकाण फिरंगी चर्च म्हणून ओळखले जाते. हे चर्च दोनशे वर्षे तरी जुने असावे असा स्थानिक अभ्यासकांचा कयास आहे. थोडी माहिती घेतली असता चर्चचे नाव सेंट ऍन्स चर्च आहे असे कळले.
मी गेलो तेव्हा दोन्ही वेळेला चर्च बंद होते त्यामुळे मला ते आतून पाहता आले नाही. परंतु तिथल्या सेवकाशी गप्पा मारून माहिती मिळाली ती अशी – सुवर्णदुर्ग किल्ल्यावर पेशवेकाळात दुरुस्तीचे काम केले जात असताना काही पोर्तुगीज इंजिनियर या भागात बोलवले गेले होते. त्यांना प्रार्थनेसाठी जागा हवी होती. म्हणून हे चर्च बांधले गेले येशूची माता मेरी ची आई सेंट ऍन हिच्या स्मरणार्थ चर्चचे नामकरण करण्यात आले. १९९६ ला इथं नियमितपणे प्रीस्ट ची नेमणूक झाली आणि शेवटची माहिती मिळाली तेव्हा फादर बेनिटो फर्नांडीस इथले प्रीस्ट होते. दारात मदर मेरीची प्रतिमा आहे. मी अनेक भव्य चर्च पाहिली आहेत पण माडांच्या सावलीत असलेल्या या टुमदार चर्चच्या साधेपणात मला एक वेगळं सौंदर्य जाणवलं. दापोली परिसरात अजून एक सुंदर चर्च आहे. त्याची कहाणी घेऊन येऊ अजून एका अशाच चित्रभ्रमंती ब्लॉग मध्ये.