
दापोली-हर्णे-मुरुड परिसरात भटकंती करत असताना दुर्गप्रेमी भटक्याला उत्सुकता असते सुवर्णदुर्ग पाहण्याची. पण तिथंच जवळ असलेला गोवा दुर्ग एखादं अपरिचित पण प्रेक्षणीय ठिकाण अचानकपणे गवसल्याचा आनंद देऊन जातो. किल्ल्याची तटबंदी अनेक ठिकाणी शाबूत असून हर्णे बंदराकडे जाताना उजव्या बाजूला ती स्पष्ट दिसते. किल्ल्याच्या पूर्व दिशेला असलेल्या कमानीतून प्रवेश करायचा आणि किल्ल्याचे विविध अवशेष पाहायचे.

किल्ल्यात शिरल्या नंतर उजवीकडे दिसतो तो किल्ल्याचा मुख्य दरवाजा. परंतु तो चिणून बंद केलेला असून आतून तिथल्या देवड्या दिसतात. त्याची पाहणी करायला तटाबाहेर पडून उत्तर दिशेने थोडं चालायला लागते. भरती असेल तर पाणी भरते पण आपण चालत तिथं पोहोचतो. दरवाजाजवळ एक व्याघ्रशिल्प कोरलेलं दिसतं. ते आवर्जून पाहायला हवं आणि इथं मारुतीरायाला नमनही करायला हवं.

किल्ल्याच्या दक्षिणेकडील टोकावर १५-१६ मीटर उंचीची टेकडी आहे आणि या उंच भागात बालेकिल्ला सदृश बांधकाम आहे. काही बांधणी ही ब्रिटिशांच्या काळातील असून तिथं पूर्वी सरकारी विश्रामगृहे होती असं इतिहासकार सांगतात. यापैकी एक कलेक्टर साठी आणि दुसरे सामान्य प्रवाशांसाठी होते असे समजते. इथल्या बांधीव तलावात पाणी असले तरीही ते पिण्यायोग्य नसल्याने आपल्याला सोबत पाणी घेऊनच यावे लागते.
चुना न वापरता दगडी चिरे एकमेकांवर रचून बुरुजांची बांधणी केली आहे. किल्ल्यावरील सात बुरुज चांगल्या स्थितीत खंबीरपणे उभे असलेले दिसतात. तटबंदीचे बांधकाम जरी काही ठिकाणी ढासळले असले तरीही त्याची भव्यता आजही जाणवते. निळ्या सागराजवळ या बुरुजांचे रांगडेपण अधिकच खुलून दिसते.

गोवा दुर्गाचे बांधकाम नक्की कोणी केले याबद्दल काही ठाम माहिती इतिहासकार देऊ शकत नाहीत. सुवर्णदुर्ग बांधत असताना त्याला संरक्षण म्हणून किनाऱ्यावर हा किल्ला शिवकाळात बांधला गेला असावा असा काही इतिहास तज्ज्ञांचा कयास आहे. (रत्नागिरी जिल्ह्याची दुर्गजिज्ञासा – सचिन विद्याधर जोशी पृष्ठ क्रमांक १४) पुढे आंग्रे, पेशवे अशा विविध शासकांनी किल्ल्याची डागडुजी आणि नवीन बांधकामे केली असतील.

१७५४ च्या आसपास आंग्रे आणि डचांच्या मध्ये झालेल्या संघर्षात आंग्रेंची काही जहाजे जळली आणि त्यावरील आग डच जहाजांवर जाऊन डचांची दोन जहाजेही जळली आणि तिसरे नष्ट झाले. १७५५ मध्ये रामाजी महादेव बिवलकर याने गोवा दुर्ग तुळाजी आंग्रेंकडून जिंकून घेतला. त्यानंतर झालेल्या पेशवे-इंग्रज तहाला धरून हा किल्ला पेशव्याकडे राहिला. पुढे १८१८ मध्ये कर्नल केनेडीने हा किल्ला इंग्लिशांना जिंकून दिला. ऐतिहासिक नोंदींप्रमाणे १८६२ मध्येही किल्ल्याची परिस्थिती उत्तम होती आणि त्यावर ६९ तोफा आणि १९ सैनिकांची शिबंदी होती.. आजमितीला मात्र तिथं एकही तोफ दिसत नाही.

किल्ल्याच्या तटाभोवती एखादा पाया रचलेला असावा तसा पाषाणाचा थर आहे. त्यावर लाटांचा मारा होऊन झालेल्या घर्षणातून विविध आकार निर्माण झाले आहेत. त्यावर भरलेल्या समुद्री वनस्पती, त्यांचा हिरवा रंग आणि फेसाळणाऱ्या लाटांची शुभ्र दुलई हे सगळं सौंदर्य निरखत तिथं निवांत बसायचं. किल्ल्यात मला ही जागा महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची आहे असा बोर्ड दिसला. तिथं पर्यावरण पूरक पर्यटन केलं जाणार असेल तर त्यात मराठी आरमाराचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे अशा विषयांबद्दल लोकांना माहिती मिळेल अशी सोयही करता येईल.

फोटोग्राफीच्या दृष्टीने भटकंती करायची असेल तर वेळेला खूप महत्व आहे. वेळेची शिस्त जितकी पाळू तितकी निसर्गाची साथ आपल्याला मिळते. या रांगड्या खडकाळ किनाऱ्यावरून सुवर्णदुर्ग पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो. पण जसजशी दुपार होत जाते प्रकाश तीव्र होतो, पाण्यावरील परावर्तित प्रकाश डोळे दिपवतो, समुद्राची निळाई नीट दिसत नाही. सूर्योदयानंतर दोन तासात मात्र निसर्गाने केलेली रंगांची मोहक उधळण पाहण्याचा योग जुळून येतो. आपल्या घड्याळाला फिल्टर लावला की फोटोला फिल्टर लावण्याची गरज भासत नाही.

निळा सागर आणि स्वच्छ निळं आकाश यातला फरक सहज समजेल इतकं वैविध्य निळेपणाच्या छटांमध्ये आपण इथं पाहू शकतो. निसर्गाच्या पॅलेटमध्ये छटांची कमतरता नाही. क्षितिजरेषेजवळ सुवर्णदुर्गाची तटबंदी स्पष्ट दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ जलदुर्ग बांधले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि कुलाबा .. या साक्षेपी राजाच्या दूरदृष्टीला सलाम करायला इथं यायला हवं. इतिहास आणि पुरातत्व प्रेमींना ही अशीच तीर्थस्थळे खुणावत असतात. देवतुल्य छत्रपती शिवाजी महाराज या पंढरीतले पांडुरंग असतात आमच्यासाठी. सुवर्णदुर्गाचं म्हणाल तर मराठ्यांच्या इतिहासातील अजून एका तेजस्वी व्यक्तिरेखेचा उदय या ठिकाणी झाला. त्याबद्दल लवकरच लिहितो. कोकणातील इतिहास भ्रमंतीत सहभागी होण्यासाठी दर्या फिरस्ती ब्लॉगला भेट देत रहा.