
सुवर्णदुर्ग किल्ल्याचे तीन उपदुर्ग हर्णे बंदराच्या जवळपास बांधले गेले. कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवा दुर्ग. यापैकी फत्तेदुर्गाची जागा जरी आपल्याला माहिती असली तरीही त्याठिकाणी किल्ल्याच्या बांधकामाचे किंवा तटबंदीचे कोणतेही अवशेष आता सापडत नाहीत. कोळी बांधवांच्या वस्तीने हा भाग व्यापून टाकला आहे. सकाळच्या वेळेला हर्णे बंदरावर गेलं की कनकदुर्ग अवशेषांच्या पायऱ्यांवरून फत्तेदुर्गाचे ठिकाण दिसते. कनकदुर्ग आणि फत्तेदुर्ग यांना जोडणारा दगडी पूल पूर्वी होता आता तिथं मोटर रस्ता आहे. समुद्राच्या बाजूला जुन्या भिंतींचे अवशेष दिसतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या काळात हा भाग सिद्दीच्या ताब्यात गेला असता सिद्दी खैरियतखानाने फत्तेदुर्ग बांधला असे म्हणतात. नंतर कान्होजी आंग्रे, मानाजी आंग्रे व शेवटी तुळाजी आंग्रेंच्या ताब्यात हा किल्ला होता. पेशवे आणि इंग्रजांनी तुळाजीला पराभूत केल्यानंतर हा किल्ला पेशव्यांकडे कमोडोर जेम्सने सोपवला १८१७ मध्ये इंग्लिशांनी फत्तेदुर्ग पेशव्याकडून जिंकला.

फत्तेदुर्ग आणि गोवा दुर्गाच्या मध्ये असलेल्या खडकाळ किनाऱ्यावरून समुद्रातील सुवर्णदुर्गाचे अतिशय मोहक दृश्य दिसते. कोकणातील अशा ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी दर्या फिरस्ती वेबसाईटला भेट देत रहा.