Darya Firasti

शिवलंका सिंधुदुर्ग

आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले असे हे बरे जाणणे. अवघे काम चखोट करणे. माणसे नवी आहेती त्यास सांभाळोन इत्येकांचा उपेग करून घेणे. पाया भला रुंद घेणे. खाली अवघा कातळ तरी वर थोर इमारत. तस्माद दो बाजूंस दो हात जागा सोडून तट उभारला इतकी रुंदी घेणे, तट कोठे रुंद तर कोठे जाग जागा अरुंद येणेप्रमाणे धरावा लागतो. अनुकूल दिसेल त्याप्रमाणे करणे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पाच जलदुर्गांपैकी सगळ्यात विशाल आणि मजबूत किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग. एक कोटी होन खर्च करून महाराजांनी हा किल्ला बांधून घेतला. हिरोजी इंदुलकरांची रचना असलेल्या या दुर्गाच्या बांधकामात ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० पोर्तुगीज कारागीर आणि ३००० मजूर यांनी जवळपास ३ वर्षांत किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. मालवण या अतिप्राचीन बंदर असलेल्या ठिकाणाहून बोटीने प्रवास करून आपण सिंधुदुर्गाजवळ पोहोचतो.

किल्ल्याजवळ पोहोचलो की गोमुख बांधणीच्या महादरवाजाचे दर्शन होते. अगदी जवळ पोहोचेपर्यंत आपल्याला दार दिसत नाही. महादरवाजावर आता द्वारशिल्पे नाहीत. पण चौकट आणि महिरपी कमानीचे सौंदर्य खुलून दिसते. गोमुख बांधणीचे दरवाजे हे शिवकालीन दुर्गबांधणीचे वैशिष्ट्य. महाराज सांगतात –

दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून पुढे बुरुज देऊन येतिजाती मार्ग बुरुजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे.

दाराजवळच आपल्याला दक्षिणमुखी हनुमानाचे दर्शन घडते. तिथं नतमस्तक होऊन किल्ल्याच्या आत गेले की जरीमरी देवीचे स्थानही दिसते. १८९२ साली तुकाराम आयरेकरांनी या देवळाचा जीर्णोध्दार केला असे इतिहासकार सांगतात. कमानीतून दिसणारे मंदिर आणि माडांचे दृश्य सकाळच्या वेळेला अतिशय ताजेतवाने असते. स्वच्छ निळ्या आकाशात ढगांचे पुंजके आपलं लक्ष वेधून घेतात.

आत आल्यानंतर आपल्याला महादरवाजावर बांधलेली मेघडंबरी दिसते. तीन कमानींची अतिशय प्रमाणबद्ध रचना साधी असली तरीही आकर्षक दिसते. तिथं आत पहारेकऱ्यांसाठी बांधलेल्या देवड्याही आहेत.

सिंधुदुर्गाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथं असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पावलाचे ठसे इथं पाहता येतात. किल्ल्याचे बांधकाम सुरु असताना छत्रपती शिवराय इथं आले आणि ओल्या ठिकाणी त्यांच्या पायाचा व हाताचा ठसा उमटला आणि तिथल्या गवंड्याने तो तसाच ठेवला असं सांगितलं जातं. या गोष्टीची सत्यता एका पत्रावरून स्पष्ट होते. छत्रपतींची नातसून कोल्हापूरच्या महाराणी जिजाबाई यांनी १७६३ मध्ये पाठवलेल्या पत्रावरून हे समजते. किल्लेदार येसाजी शिंदेंना पाठवलेल्या या पत्रात शिवरायांच्या ठसा आहे तिथं कोनाडा बांधून प्रार्थना व नैवेद्याची सोय करावी असा उल्लेख आहे.

किल्ल्यात दगडी पायवाटेवरून थोडं पुढे गेलं की एक अनोखं मंदिर दिसतं. हे आहे श्री शिवराजेश्वर मंदिर. १६९५ साली छत्रपती राजाराम महाराजांनी मंदिराचा गाभारा बांधला आणि त्यापुढील सभामंडप छत्रपती शाहू महाराजांनी १९०५ च्या सुमारास बांधून घेतला. दगडी बांधकामावर चुन्याचा गिलावा देऊन हे मराठा शैलीचं देऊळ बांधलं गेलं आहे.

मंदिरातील मूर्ती ही शिवरायांची वीरासन घातलेली मूर्ती आहे. विशेष म्हणजे या मूर्तीत छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमीप्रमाणे दाढी नाहीए. मुल्हेरी मूठ असलेली शिवरायांच्या वापरातील तलवारही इथं ठेवण्यात आली आहे असं दिसतं. सतराव्या शतकापासून इथं ग्रामस्थ किल्ला न सोडता काळजी घेण्यासाठी थांबले आहेत. ग्राम पंचायत इथली देखभाल करण्यासाठी देणग्या स्वीकारते, तिथं यथाशक्ती मदत करावी.

रविवार हा शिवरायांच्या पूजनाचा वार आहे. शाहू महाराजांनी आपल्या दिवाण रत्नाकर आप्पा यांना शिवराजेश्वराची देखरेख करण्यासाठी दरवर्षी १५२२ रुपयांची नेमणूक करून दिलेली दिसते. मंदिरासमोरच एक तोफही पाहता येते.

शिवराजेश्वरांचे दर्शन घेऊन डावीकडील वाटेने पुढे जायचे आणि मग आपल्याला महादेवाचे दर्शन घेता येते. तिथूनच पुढे दूधबाव, दहीबाव, साखरबाव या नावाच्या गोड पाण्याच्या विहिरी आहेत. किल्ल्याच्या स्थानी मुबलक पिण्याचे पाणी असल्याशिवाय बांधकाम करू नये अशी छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञाच होती.

विहिरींच्या पलीकडे त्याच रस्त्याने चालत गेल्यावर तटबंदीच्या आत बांधलेला एक बुरुज दिसतो. त्याला निशाणकाठीचा बुरुज असे म्हणतात. या बुरुजावरून किल्ल्याच्या परिसराचे सुंदर दृश्य दिसते.

इतका प्रचंड किल्ला उभा करण्यासाठी दगड कुठून मिळाले असतील? काही इतिहासकार सांगतात की फोंडाघाट सारख्या ठिकाणांहून इथं बांधकामासाठी दगड आणला गेला असावा. काही प्रमाणात असा दगड जरी आणला गेला असेल तरीही मुख्य वापर हा कुरटे बेटावरील कुरुंदाच्या दगडाचा केला गेला आहे. भूशास्त्रीय दृष्टीने हे क्वार्टझाइटचे रूप असावे असं मला वाटतं.

सागराच्या अथांग गहिऱ्या निळाईबरोबर या कुरुंदाच्या खडकाच्या पिवळ्या, नारिंगी, हिरव्या छटा एक वेगळाच दृश्य परिणाम निर्माण करतात. मी प्रशिक्षित दुर्ग अभ्यासक नाही पण तरीही मला असे वाटते की आज आपण सिंधुदुर्ग किल्ल्याचे जे रूप पाहतो ते अंतिम रूप नसावे. संकल्पित काम अजूनही बरेच असेल. पण दुर्दैवाने शिवरायांना आणि नंतर शंभूराजेंना हा विशाल किल्ला त्याच्या पूर्णत्वाकडे न्यायला सवड मिळाली नसावी.

अजूनही किल्ल्यात अनेक ओबडधोबड कुरुंदाच्या खाणी दिसतात. भगवतीचे मंदिर आणि महाराजांच्या वाड्याचे अवशेषही आहेत. पश्चिमेला बुरुजात एक छोटा चोर दरवाजा आहे त्यातून वाळूच्या पुळणीवर बाहेर जाता येते. महाराणी ताराबाई इथं समुद्रस्नान करण्यासाठी येत असत अशी आख्यायिका सांगितली जाते. कदाचित त्यामुळेच या जागेला राणीचा वेळा असं नाव पडलं असावं.

१६६८ मध्ये रायाजी भोसले येथे किल्लेदार होते असं इतिहासकार सांगतात. १६७१ च्या सुमारासचे इंग्लिश दस्तऐवज असे सांगतात की शिवरायांनी किल्ल्यांच्या देखरेखीसाठी पावणेदोन लाख होनांच्या रकमेची तरतूद केली होती. त्यापैकी दहा हजार होन सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी होते.

इतिहास म्हणजे फक्त तारखांची जंत्री आणि तहाची कलमे घोकण्याचा कंटाळवाणा विषय अशी आपल्यापैकी बहुतेक लोकांची धारणा असते. त्याचा आजच्या जीवनाशी काहीच संबंध नाही आणि उगाचच निरुपयोगी माहिती डोक्यात कोंबून परीक्षेत ओकण्याचा हा विषय असावा या पद्धतीने तो बहुसंख्य शाळांमध्ये शिकवला जातो. पण इतिहास आपल्याला सांगत असतो की आपण आजवर कोणती वाट चालून इथं पोहोचलो, या वाटेवर काय चुका केल्या, कोणत्या गोष्टी चांगल्या प्रकारे केल्या. आता सिंधुदुर्गाचे पहा ना, किल्ला बांधायला सुरुवात झाली नोव्हेंबर १६६४ मध्ये आणि किल्ला पूर्ण झाला १६६७ च्या सुमारास. २९ मार्च १६६७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग पाहण्यासाठी इथं आले. या तारखा आपल्याला काय सांगतात बरं?

या मधील काळात पुरंदरचा तह झाला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज आग्ऱ्याला जाऊन अडकले होते. तरीही ठरलेल्या नियोजनाप्रमाणेच सिंधुदुर्ग बांधणी सुरु राहिली आणि वेळेवर पूर्णत्वालाही गेली. मराठ्यांच्या स्वराज्यातील शासन आणि शिवरायांच्या पदरी असलेल्या लोकांची अढळ निष्ठा हे पाहून लक्षात येते.

शिवरायांनी कुरटे बेट पाहून म्हंटले चौऱ्याऐंशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही, इथं बंदरी नूतन जंजिरा वसवावा. चित्रगुप्ताच्या बखरीत सिंधुदुर्गाबद्दल आणि त्याच्या महतीबद्दल अतिशय सुंदर वर्णन केलं आहे –

चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा जगी अस्मानी तारा. जैसे मंदिराचे मंडन श्री तुलसी वृंदावन, तैसा महाराजांचे राज्याचा भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकी पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले.

१७१० च्या सुमारास किल्ला चाच्यांचे स्थान झाला होता असे काही इतिहासकार म्हणतात पण १७१३ ला किल्ला कोल्हापूरकरांकडे होता असे लक्षात येते. १७३२ च्या आसपास चंद्रजी घाटगे सिंधुदुर्गाचे किल्लेदार होते. १७६३ ला येसाजी शिंदे किल्लेदार असताना इथल्या आरमाराने पोर्तुगीजांचे मोझाम्बिकहून आलेले जहाज पकडले ज्यावर ५८८ हस्तीदंत होते आणि त्याची विक्री ४०७१९ रुपयांना झाली. संतापलेल्या पोर्तुगीजांनी आरमारी हल्ला केला आणि मालवण बंदर लुटले. येसाजी शिंदेनी कडवा प्रतिकार केला व युद्धात ४००-५०० पोर्तुगीज ठार केले. या घटनेबद्दल पेशव्यांच्या आरमाराचे प्रमुख धुळपांना पत्र लिहून माधवराव पेशवे सांगतात –

सिंधुदुर्ग हा जागा महाराज छत्रपतींचा खासगी. आज पर्यंत टोपीकर व इतर यांनी स्थळाची अमर्यादा कोणी केली नाही. पेठ जाळली, किल्ल्यावर तोफा मारल्या… तुम्ही येकनिष्ठ राज्यातील लोक समीप असता त्याचे पारपत्यास अंतर जाहाले.

सिंधुदुर्गावरील शिबंदीचे पगार थकलेले होते. पुढे १७६५ मध्ये इंग्लिशांनी मेजर गॉर्डन आणि कॅप्टन वॉटसन च्या दिमतीखाली आरमारी फौज पाठवून किल्ला सहज जिंकला. यावेळी किल्ल्यातून विशेष प्रतिकार झाला नाही. इंग्लिशांनी किल्ल्याला फोर्ट ऑगस्टस असे नाव ठेवले. करवीरकरांनी नुकसान भरपाई देऊन किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. त्यानंतर १७८८ च्या सुमारास सावंतवाडीकरांनी सिंधुदुर्गावर हल्ला केला परंतु त्यांचा पराभव झाला. शेवटी १८१२ मध्ये कर्नल लियोनेल स्मिथने सिंधुदुर्ग पुन्हा ब्रिटिशांच्या राज्यात आणला.

सिंधुदुर्ग परिसरात किनाऱ्याला लागूनच पद्मगड हा उपदुर्ग आहे. जिथं पूर्वी शिवरायांची आरमारी गोदीसुद्धा होती. मालवण शहराच्या किनाऱ्यावर राजकोट या दुसऱ्या उपदुर्गाचे अवशेष आहेत. आणि काही अंतरावर उत्तरेला कोळंबजवळ गड नदीच्या (या नदीला कालावली सुद्धा म्हणतात) सर्जेकोट नावाचा उपदुर्ग आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीवर सहा ठिकाणी जलदुर्ग बांधले. ही मालिका दक्षिणेत सिंधुदुर्गाने सुरु होते आणि विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा असा उत्तरेकडे प्रवास करत मुंबई पासून ३० किलोमीटर अंतरावर खांदेरीला संपते. ऐन पावसाळ्यात शिवरायांच्या आरमाराने चिवटपणाने इंग्लिशांचा विरोध मोडून काढत बांधलेल्या खांदेरी किल्ल्याची गोष्ट या ब्लॉगवर वाचा. कोकणातील ऐतिहासिक स्थळांची ससंदर्भ माहिती आणि चित्र भ्रमंती करण्यासाठी आमच्या दर्या फिरस्ती ब्लॉगला नियमितपणे भेट देत रहा आणि तुमच्या कोकणवेड्या मित्रांबरोबरही हा ब्लॉग शेयर करा ही विनंती.

One comment

  1. Pingback: पद्मगड, सिंधुदुर्गाचा पहारेकरी | Darya Firasti

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: