
तुम्ही भावे म्हणजे कोकणातले ना? तुमचे गाव कोणते? हा प्रश्न मला अनेकदा विचारला गेला आहे. माझे बहुतेक नातेवाईक पुणे, गोवा या ठिकाणी आहेत. गावात एखादे घर किंवा छोटी जमीन आहे असं नाही. भाव्यांचे कुलदैवत कोळेश्वर जे दाभोळजवळ कोळथरे नावाच्या गावात आहे. पण मग आमचे मूळ गाव कोणते असेल बरं? रत्नागिरीहून गणपतीपुळेला जात असताना गुगल मॅप पाहत होतो. तिथं मला अचानक माझे आडनाव दिसले! भावे नावाचे गाव वरंध घाट उतरल्यानंतर लागते हे मला माहिती आहे. पण इथं कोकणात भावे अडोम नाव वाचून माझ्या मनात कुतूहल उत्पन्न झाले. काळबादेवीहून एक रस्ता आरे वारे पुलाकडे जातो तर उजवीकडे वळून एक छोटासा घाट चढून भावे अडोम गाव येते. हे गाव भावे कुलोत्पन्नांचे मूळ गाव मानले जाते. तिथं जवळच असलेलं दांडे अडोम दांडेकरांचे मूळ स्थान आहे. हे ठिकाण रत्नागिरीपासून फार दूर जरी नसलं तरीही अतिशय रम्य परिसर आहे. हिरव्यागार झाडीतून वाहणारा झरा.. त्याच्या पाण्याचा खळखळाट आणि पक्षांची किलबिल अनुभवत गावात प्रवेश करायचा.

काही अंतर पायवाटेने चालत गेलं की एका देवळाच्या दगडी दीपमाळा लक्ष वेधून घेतात. हाच सप्तेश्वर. शंकराचे हे रूप कोळथरे जवळ पंचनदी गावातही आहे पण ते सप्तेश्वराचे देवस्थान मात्र वेगळे.

मंदिराला बाहेरून रंगरंगोटी आणि गिलावा केलेला असला तरीही मंदिर जुने आहे. पेशवेकालीन दीड दोनशे वर्षे जुने बांधकाम तरी असेल. मंदिराच्या सभागृहात शांतपणे बसून ध्यानस्थ व्हायचे. क्षणभर विश्रांती व मनःशांती अनुभवायची. इथला गारवा, स्वच्छता, नीरव शांतता खरोखरच अध्यात्मिक अनुभूती देणारी आहे. वर्तमानात जगा, मनातील विचारांची गर्दी काढा.. हे सगळं करण्यासाठी… आपल्या श्वासाशी एकरूप होण्यासाठी जी निवांत जागा हवी असते ती मी इथं अनुभवली.

कधीकधी नियोजित पर्यटनाच्या पलीकडे जाऊन भटकंती केली, डोळस असलं, काहीतरी नवीन शोधण्याची इच्छा असली तर अशी रम्य ठिकाणे अचानकपणे गवसतात.कोकणातील ऐतिहासिक स्थळांची ससंदर्भ माहिती आणि चित्र भ्रमंती करण्यासाठी आमच्या दर्या फिरस्ती ब्लॉगला नियमितपणे भेट देत रहा आणि तुमच्या कोकणवेड्या मित्रांबरोबरही हा ब्लॉग शेयर करा ही विनंती.