
” सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करीत आहात त्याविषयी अनुकूल अभिप्राय देण्याची ही संधी घेत आहे . जर अस्पृश्य वर्ग हिंदू समाजाचा अभिन्न भाग व्हायचा असेल तर नुसती अस्पृश्यता जाऊन भागणार नाही . चतुर्वरण्याचे उच्चाटन झाले पाहिजे . ज्या थोड्या लोकांना ह्याची आवश्यकता पटली आहे त्यापैकी आपण एक आहात हे सांगावयास मला आनंद वाटतो .” संदर्भ :- पुस्तक – स्वातंत्रवीर सावरकर ; लेखक – धनंजय कीर , प्रकरण – सामाजिक क्रांती पान क्र.२०२
हे शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सावरकरांना पतित पावन मंदिर उद्घाटन समारंभाचे निमंत्रण मिळाल्यावर पाठवलेल्या अभिप्रायातील आहेत. रत्नागिरीतील १९२४ ते १९३७ या स्थानबद्धतेच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जातिभेदांविरोधात हत्यार उगारले. पतित पावन मंदिर हे त्याच संघर्षाचं फलित आहे. भागोजीशेठ कीर यांच्या मदतीने ३ लाख रुपये खर्च करून सर्व जातीतील लोकांना खुले असे हे पतितपावन मंदिर निर्माण केले गेले. मंदिरात लक्ष्मीनारायणाची अतिशय सुंदर मूर्ती आहे. इथं कोणत्याही जातीच्या माणसाला अगदी गर्भगृहापर्यंत जाऊन पूजा करता येते.

मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकर, शंकराचार्य कुर्तकोटी, समर्थ रामदास आणि गाडगेबाबा यांची सुंदर चित्रे आहेत. सणासुदीला इथं भक्त रांगोळ्यांनी उत्तम सजावटही करतात. २० हजार चौरस फूट जागेत बांधलेलं हे मंदिर २२ फेब्रुवारी १९३१ रोजी भागोजीशेठ कीर आणि त्यांच्या पत्नीने लोकार्पण केलं. सर्व ज्ञातीतील लोकांचे इथं क्रांतिकारी सहभोजन झाले. यात दीड हजार लोक सामील झाले. काळाराम मंदिर सत्याग्रहानंतर एका वर्षाने ही घटना घडली. इथं सर्वजातीय महिलांचेही सहभोजन झाले. कोल्हापूर येथील सत्यशोधक समाजातील श्री माधवराव बागल यांच्या पत्नीने त्याचे नेतृत्व केले.

जातीभेद नष्ट करणे हा केवळ तात्विक मुद्दा नसून आचरणात आणण्याचा मुद्दा आहे असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे परखड मत होते.
उलटपक्षी ज्या निर्बंधामुळे (संविधानातील कलम १७ मधील अस्पृश्यतेवरील निर्बंध) वरील प्रकारच्या संघर्षाचा संभव जरी उत्पन्न झालेला असला, तरीही अस्पृश्यता निवारण्याचे कार्य लोकांची मने वळवूनच करण्याचे प्रयत्नही पूर्वीपेक्षा या निर्बंधामुळे अनेक पटीने अधिक यशस्वी होणारे आहेत. हा निर्बंध होण्यापूर्वी अस्पृश्यता निवारक आंदोलनाला नैतिक बळावर काय ते अवलंबावे लागे. अस्पृश्यता पाळणे दूषणीय आहे, इतके सांगूनच काय जे घडेल ते मतपरिवर्तन घडविता येते होते. पण आता अस्पृश्यतानिवारक आंदोलनाला केवळ नैतिक नव्हे, तर नैर्बंधिक (कायद्याचे) पाठबळही मिळाले आहे. आता अस्पृश्यता पाळणे हे केवळ दूषणीयच नसून दंडनीयही आहे असे सुधारक प्रचारकांना ठासून सांगता येईल. नैतिक उदेशाने अस्पृश्यता पाळू नये असे कोणाला जरी पटले तरी आजवर त्यांना ही भीति वाटे की, आपण जर आपल्या मताप्रमाणे प्रत्यक्ष आचारात अस्पृश्यता पाळीनासे झालो, तर आपले भाईबंद नि जात आपल्याला वाळीत टाकतील, जात पंचायत दंडही करील. यांचे उदाहरण म्हणून न्हावी, धोबी अशा जातीचे देता येईल. यांच्यातील कित्येकजण व्यक्तिश: अस्पृश्यांची दाढी करावयास किंवा कपडे धुण्यास सिद्ध असताही आजपर्यंत त्यांना त्यांच्या भाईबंदांच्या भीतीमुळे तसे करता येत नसे. पण आता ह्या निर्बंधामुळे त्यांना आजवर वाळीत टाकण्याचा किंवा दंड करण्याचा धाक दाखविणार्या जात पंचायतींनाच तसे काही केले तर स्वत:लाच दंड होईल ही भीति पडेल. ” भीक नको पण कुत्रा आवर’ ह्या मनुष्याच्या नि विशेषत: समाजसंस्थाच्या स्वभावाप्रमाणे ज्या ज्या न्हाव्याधोब्यांना अस्पृश्यता पाळू नये असे केवळ न्यायत:च वाटेल, त्यांना तसे आचरण निर्भयपणे करता येईल. या निर्बंधाच्या केवळ अस्तित्वानेच त्यांच्या दंडशक्तीचा प्रत्यक्ष उपयोग न करताही नुसत्या उपदेशाने अस्पृश्यता निवारणाचे कार्य असे अधिक सुसाध्य होणारे आहे. – जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युलेख
या मंदिराच्या बाबतीतील एक महत्त्वाची घटना स्वातंत्र्यवीर सावरकरांची धर्म समीक्षा भूमिका स्पष्ट करते. डॉ शेषराव मोरेंच्या पुस्तकातील या घटनेबद्दल मला सावरकर अभ्यासक विक्रम एडकेंनी सांगितले .. काय घडले ते थोडक्यात पाहू.
श्री भागोजी शेठ कीर हे भंडारी समाजातील एक सधन गृहस्थ. ते शिवभक्त होते आणि त्यांना सामान्य मंदिरात प्रवेश नसल्याने त्यांनी भागेश्वर मंदिर नावाचे खासगी शिवमंदिर स्वतःसाठी बांधून घेतले होते हे त्यांनी सावरकरांना सांगितले. सावरकरांनी कीरांना उपदेश केला – आपण धनवान, स्वतंत्र देऊळ बांधलेत, हे महार निर्धन, त्यांना देव नाही, देवालय नाही, देवदर्शन नाही. त्यांच्यावरचा अन्याय दूर व्हावा म्हणून सर्व हिंदू लोकांकरिता एक स्वतंत्र मंदिर आपण बांधावे. कीरांनी ही सूचना मान्य केली. या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शूद्राच्या हस्ते म्हणजे भागोजी शेठ कीरांच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने करायची असे ठरले आणि त्यासाठी काशीहून पंडितांना बोलवण्यात आले. आयत्यावेळेला शूद्राला वेदोक्ताचा अधिकार नाही त्यामुळे विधी पुराणोक्त पद्धतीने करू असं सांगून काशीच्या ब्राम्हणांनी अडचणीचा प्रसंग उभा केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे मान्य नव्हते. मुहूर्त टळेल त्यामुळे पुराणोक्त पद्धतीने विधी करू असा प्रस्ताव कीर व शंकराचार्य कुर्तकोटी यांनी मांडला. तो अमान्य करत स्वातंत्र्यवीर म्हणाले –
“शेटजी, देऊळ आपले, धनी आपण, त्यामुळे समारंभ आपण करालच. पण प्रत्येक हिंदूस वेदोक्ताचा अधिकार आहे. मग तो महार असो की महाराज. या तत्त्वास आपण सोडाल तर मलाही सोडल्यासारखे होईल. जुनी देवळे थोडी नाहीत. नवीन तत्वाचे अधिष्ठान म्हणून हे नवीन देऊळ हवे होते. ते साधत नसेल तर आपण मलाही सोडावे. पण आपण जर तत्वास सोडणार नसाल तर ह्याही परिस्थितीत समारंभ मी पार पाडीन. पण आमच्या नव्या अखिल हिंदू स्मृतीच्या आधारे.”
काशीच्या ब्राम्हणांना उद्देशून सावरकर म्हणाले –
“तुम्ही मंडळींनी वेदोक्त विधी करू म्हणून मान्य केल्याचे पत्री आम्हाला कळविले. मी माझ्या पत्रात वेदोक्ताचा अर्थ स्पष्ट कळवला होता. त्यावर आक्षेप न घेता आपण काशीसारख्या अंतरावरून इथं आलात. मला जन्माने ब्राम्हण तो पुरोहित हे तत्वही मान्य नाही. पण कीर शेठजींची इच्छा ब्राम्हण हवेत म्हणून अडलो. पण आपण जर आता नाकाराल तर आजचा मुहूर्त टळून कार्य रद्द होईल असे जर कोणी अडवू म्हणत असेल तर ते कदापि घडणार नाही… हा जो इथं मराठा, महार, चांभार, भंडारी, ब्राम्हण, भंगी अखिल हिंदुसमाज दाटलेला आहे त्या शतावधी धर्मबांधवांसह आम्ही ही देवमूर्ती अनंत हस्ती उचलून जय देवा असे गर्जून स्थापणार. हाच आमचा विधी! हिंदू धर्म की जय असे हजारो कंठांतून निघणारे जयघोष हाच आमचा वेदघोष आणि भावे हि विद्यते देव: हाच आमचा शास्त्राधार. पण तरीही काशीच्या पंडितांनी हे कार्य पार पाडले नाही. मसूरकर महाराजांच्या आश्रमातील वेदशास्त्र संपन्न गणेश शास्त्री मोडक यांनी वेदोक्त विधीने यथाशास्त्र पूजा सांगून कीरांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
कोणतेही ठिकाण पाहत असताना त्याचे स्थानमहात्म्य कळावे यासाठी अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी ससंदर्भ जाणणे आवश्यक ठरते. दर्या फिरस्तीच्या माध्यमातून आमचा हाच यत्न आहे.
संदर्भ – स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र – धनंजय कीर, सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग – शेषराव मोरे, जात्युच्छेदक निबंध – स्वातंत्र्यवीर सावरकर