
शुभ्र स्वच्छ वाळू …त्या वाळूचा मखमली स्पर्श अनुभवणारी आपली पावले .. त्यांना अलगद स्पर्श करून परत जाणाऱ्या लाटांचे पाणी… क्षितिजावर दिसणारी विजयदुर्ग किल्ल्याची आकृती.. दुसऱ्या बाजूला दिसणारा जैतापूरचा सडा आणि अशा अद्वितीय ठिकाणी निसर्गाने दिलेला अलौकिक अनुभव .. कोणताही गोंगाट नाही.. कानावर पडतो फक्त सागरघोष .. सागराची गाज ऐकताना आपण इतके तल्लीन होऊन जातो की त्या नीरव शांततेत आता आपल्याच श्वासाचा तालही आपल्याला ऐकू येऊ लागतो. रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या बाकाळे गावातील समुद्र किनाऱ्याची ही गोष्ट. रेवसपासून तेरेखोलपर्यंत कोकणात नितांत सुंदर समुद्र किनाऱ्यांची मालिकाच आहे. इथल्या प्रेक्षणीय समुद्र किनाऱ्यांची संख्या मोजली तर शंभरी पार होईल. पण बाकाळे, माडबन, गोडीवणे, वेत्ये अशा खास समुद्र किनाऱ्यांची रेलचेल आंबोळगड ते दांडेवाडी या भागात आहे.

गेल्या वेळी संध्याकाळी दिवस मावळता मावळता मला माडबनचा किनारा पाहता आला होता पण या बाकाळेच्या किनाऱ्यावर जायचा रस्ता मला सापडेना आणि सड्यावरून गाडी घेऊन एकटा किनाऱ्याकडे निघालो तर गावकऱ्यांनी मला परावृत्त केलं. यावेळी विचार केला की एवढा एक किनारा कशाला सोडायचा प्रयत्न करूया. गुगल मॅप वर शोधलं तर पवन परांजपे असा दुवा सापडला. सहजच फोन केला आणि Pavan Paranjape मला किनाऱ्यावर जाण्याची वाट दाखवायला लगेच कामातून वेळ काढून आले. या गावात अनेक परांजपे मंडळी आहेत. त्यापैकी काही आता मुंबईत राहतात.

विजयदुर्गाच्या बाजूने दांडेवाडीचा पूल ओलांडून थोडं उत्तरेकडं आलं की बाकाळे गाव लागते. गाव मुख्य रस्त्याला लागून जरी असलं तरी हा समुद्र किनारा मात्र पटकन सापडत नाही. पण यावेळी काही झालं तरी इथं पोहोचायचं असं ठरवून आलो होतो. पवन परांजपे त्यांची स्कूटर घेऊन आले होते. मी आपला माझी टाटा नॅनो घेऊन त्यांच्या मागे निघालो. एक अरुंद, कच्चा आणि चढणीचा रस्ता आम्हाला विस्तीर्ण पठाराकडे घेऊन निघाला. त्याच्या पलीकडे हा समुद्र किनारा आहे. सड्यावर रस्ता बांधलेला नाही पण सपाट जागा पाहून दगडांची ओळ करून गाडी नेता येईल असा मार्ग आहे. पवन परांजपेंनी मला हा रस्ता दाखवला आणि सड्याच्या टोकापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवून ते आपल्या कामाला निघाले. इथवर टाटा नॅनो मला घेऊन आली होती. जिथं उतार सुरु होतो त्याच्या अलीकडेच आपण थांबायचं. समुद्राला जाऊन भिडलेल्या टेकाडावरून आधी सागरदर्शनाचा अनुभव घ्यायचा.

इथून समुद्र किनाऱ्यापर्यंत एक पायवाट जाते. फक्त ५-६ मिनिटे चालत किनाऱ्याच्या दिशेने गेले की आपण सडा उतरून समुद्रसपाटीला जाऊन पोहोचतो. मी इथं कच्चे रेखाचित्र गुगल मॅप वापरून काढलं आहे. साधारण त्या दिशेने वाट सापडेल.

किनाऱ्याच्या उत्तर टोकाला खडकांची मालिका दिसते. त्याच्या पलीकडे माडबन किनारा आहे. ओहोटी असताना कदाचित पलीकडे जाता येत असावं. पण स्थानिक जाणकारांना विचारल्याशिवाय असा प्रयत्न करू नये.

अशा ठिकाणी उत्तम फोटोग्राफी करायची असेल तर पुरेसा वेळ हवा. निसर्गाच्या सहवासात त्याची विविध रूपे पाहण्यासाठी थांबण्याची तयारी हवी. संध्याकाळच्या वेळेला सूर्य पश्चिमेला कललेला असताना शुभ्र वाळूवर चंदेरी चमक दिसू लागते.

दर्या फिरस्तीच्या प्रवासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्याच समुद्र किनाऱ्यांचं चित्रण आम्ही केलं. त्यापैकी काही किनारे हे समुद्र सौंदर्य अनुभवण्याच्या दृष्टीने अद्वितीय आहेत. वाळूची पुळण, समुद्राच्या लाटांनी धरलेला ताल, निळ्या आकाशाशी क्षितिजरेषेला भिडणारी सागर निळाई. प्रत्येक किनाऱ्यावर या सगळ्या गोष्टींचा एक वेगळा अनुभव आपल्याला मिळतो. कुठं पर्यटकांचा गजबजाट तर कुठं अस्पर्श किनाऱ्यावर मिळणारा एकांत अनुभव. कोकण भ्रमंतीत गवसलेली अनेक ठिकाणं मी या पोस्टद्वारे तुमच्या पर्यंत आणणार आहे. पण तुम्ही सुद्धा एक वचन द्यायला हवं. किनाऱ्यावर स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यावरण यांचा विचार करून एक जबाबदार पर्यटक म्हणून प्रवास करण्याचं वचन. काही गोष्टींची काळजी नक्की घ्या – १) प्लॅस्टीक नेऊ नका, न्यावं लागलंच तर परत घेऊन या २) पाण्याच्या बाटल्या, खाण्यापिण्याचा किंवा इतर कोणताही कचरा किनाऱ्यावर टाकू नका ३) शांत नीरव ठिकाणी आरडाओरडा, शिवीगाळ, गाणी लावून गोंधळ करणे अशा गोष्टी जाणीवपूर्वक टाळा ४) भरती-ओहोटीचा अंदाज घेऊन स्थानिकांचे मार्गदर्शन घेऊनच पाण्यात उतरा ५) सेल्फी काढायला स्वतःचा किंवा तुमच्या स्नेह्यांचा जीव धोक्यात घालू नका. ६) जर गाडी किंवा वाहन घेऊन जाणार असाल तर परत येताना कचरा गोळा करून किनाऱ्यापासून दूर त्याची विल्हेवाट लावा.
सुंदर वर्णन
माझा सिंधूदुर्ग जिल्हा राहिलाय भटकायचा