Darya Firasti

सावंतवाडीचा राजवाडा

मालवणी भाषेचा गोडवा, कोकणी पाहुणचार, शाकाहारी-मांसाहारी मेजवानीचा बेत, मस्त थंडगार हवामान आणि काहीही न करता निवांत पडून राहण्याची पुरेपूर संधी हे सगळं अनुभवायचं असेल तर सावंतवाडीत यायला हवं. कोकण रेल्वेवरील हे ठिकाण. तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी अशा जलद ट्रेन्स मुळे मुंबईहून वीकएंड प्लॅन करावा इतपत जवळ आलेलं. खेम-सावंत घराण्याची राजधानी असलेलं हे एक छोटंसं शहर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुकुटातील शिरपेच आहे असं म्हणता येईल. या सावंत भोसले घराण्यातील कर्तबगार राजांनी इथं अनेक शतके राज्य केलं. आजही या राजघराण्यातील वंशज ज्या राजवाड्यात राहतात तो आपण पाहू शकतो. पाश्चिमात्य वास्तुरचनेला कोकणी साज चढवलेली ही वास्तू आज राहता राजवाडाही आहे आणि पर्यटकांचे अगत्याने स्वागत करणारे संग्रहालयही.

आंबोली घाट उतरून कोकणात प्रवेश केला की सावंतवाडीला पोहोचणे अगदी सोपे. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या भटक्यांसाठी हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणता येईल. इथून तेरेखोल, रेडी, शिरोडा, मोचेमाड ते वेंगुर्ला हा पूर्ण पट्टा भटकणे सोपे पडते. इ-कोकण टूर्स नावाचा ताज्या दमाचा स्टार्टअप चालवणाऱ्या माझ्या प्रसाद नाडकर्णी या मित्राने मला इथं एक उत्तम निवास व्यवस्था शोधून दिली आणि तो आवर्जून भेटायलाही आला. कोकणातील तरुण मंडळी अशाप्रकारे जबाबदार आणि डोळस पर्यटनाला प्रोत्साहन देत आहेत ही उत्साह वाढवणारी गोष्ट आहे. राजवाडा पाहायला गेलं की एक रेखीव बांधणीचे सुंदर प्रवेशद्वार आपले स्वागत करते. नुकतीच रंगरंगोटी केलेली असल्याने इथं एक प्रसन्नता जाणवते.

सावंतवाडीचा हा राजवाडा म्हणजे एकेकाळी किल्ल्याचे किंवा कोटाचे ठिकाण होते. जांभा दगडात इथं केलेलं बांधकाम, कमानी, चिऱ्यांची रचना यातील प्रमाणबद्धता लक्ष वेधून घेणारी आहे. इथं असलेल्या पहारेकऱ्यांच्या देवडीचे बांधकाम आपले वेगळेपण जपून असलेले वाटले.

राजवाड्याचा निवासी भाग सोडला तर इथं अतिशय सुंदर संग्रहालय पाहता येते. राजघराण्यातील लोकांच्या वापरातील वस्तू, इतर सांस्कृतिक वारसा, शस्त्रे, शिल्प-संग्रह अशा अनेक गोष्टींनी हे संग्रहालय समृद्ध आहे. इथं पाऊल ठेवताच चौकोनी रचना दिसते आणि मागे डौलात उभे असलेले माड दिसतात. कोकणी बांधकामातील साधेपणाचे सौंदर्य फारसे परिचित नसले तरीही परिणामकारक आहे हे इथं जाणवते.

राजवाडा पाहत असताना इथला मोकळेपणा, खेळता सूर्यप्रकाश मनाला उल्हसित करतो. खेम-सावंत घराण्याने आपला वारसा जपलेला असल्याने विविध वस्तू पाहताना इथल्या परंपरा, लोकजीवन यांची झलक पाहता येते. सतराव्या शतकापासून खेम-सावंत, फोंड-सावंत, रामचंद्र सावंत अशा शासकांनी इथं राज्य केले, सत्ता गाजवली. युद्धे केली, राजकारण केले, लोकांचे जीवन समृद्ध केले. आजही हे कोकणातील कला संवर्धनाचे केंद्र आहे.

राजवाड्यातील दरबार हॉल अतिशय भव्य आणि देखणा आहे. इथली झुंबरे, लाकडी कोरीवकाम अगदी निरखून पाहिलं पाहिजे. राजचिन्हे, शासकांच्या प्रतिमा, सिंहासन, लोखंडी कमानींवर तोललेला छज्जा, वेगळ्या धाटणीचे छत हे सगळं पाहिलं की अजून एक विलक्षण गोष्ट न विसरता अनुभवली पाहिजे. ही गोष्ट आजही या राजवाड्याला जागृत ठेवत आहे.

सावंतवाडी लाकडी खेळणी, रंगकाम, गंजिफा इत्यादीसाठी प्रसिद्ध आहे. खेम-सावंत राजघराण्याच्या आश्रयाने आजही इथं अगदी पारंपरिक पद्धतीने गंजिफा हा पत्त्याचा खेळ तयार केला जातो. अनेक कलाकारांना इथं काम तर मिळतेच आणि कोकणाचा मानबिंदू असलेल्या हा कलेचे संवर्धनही होते. ही चित्रे कशी काढतात, कशी रंगवतात, नवे कलाकार हे सगळं कसं शिकतात हे आपण इथं पाहू शकतो. निरीक्षण करून, काही प्रश्न विचारून गंजिफा बद्दल जाणून घेऊ शकतो. सावंतवाडी शहरात मोती तलाव नावाचा तलाव आहे. तिथंच बाजारपेठ आहे. राजवाडा पाहून झाला की चहा पीत आणि भजी खात इथं एक निवांत चक्कर मारायला विसरू नका!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: